
>> स्वप्नाली अभंग
बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली दीपक नागरगोजे यांची शांतिवन संस्था ऊसतोडणी कामगार, तमाशा कलावंत यांची मुलं, अनाथ मुलं, विधवा महिला यांच्यासाठी काम करते. कोरोनाच्या संकटात सध्या प्रत्येक घटक जगण्यासाठी लढत आहे. हातावरचे पोट असणाऱया मजूर, ऊसतोडणी कामगारांची परिस्थितीही हतबल करणारीच. या कामगारांसाठी सध्या शांतिवन झटत आहे.
देश लॉक डाऊन झाल्यानंतर अनवाणी पायांनी उन्हातान्हात, पावसात चालणारे मजूर, लहान मुलं पाहून कोरोनाच्या आधी परिस्थितीच यांचा बळी घेईल की काय असं वाटत होतं. मुलाबाळांना दोन वेळचं पोटभर मिळावं म्हणून गावांमधून शहरांकडे, कारखान्यांकडे आलेली ही माणसं घराकडे परतण्यासाठी कधी नव्हे ती इतकी बेचैन झाली होती. कारण भूक इथंही भागणार नाही अन् तिथंही, पण पुढे जे होईल ते किमान आपल्या छपराखाली होईल या विचाराने ही माणसं मैलोन्मैल चालू लागली. ऊसतोडणी कामगारांची व्यथा तर आणखीच वेगळी. कारखाने लवकर बंद होईनात. घरी परतायला वाहनं मिळेनात. बरोबर असलेल्या गुराढोरांना चारा मिळेना तर मुलांना जेवायला मिळेना. अन् इतकी सगळी परवड होऊनही चालत पोहचल्यानंतर गावात प्रवेश मिळेना. गावाच्या बाहेर तळ तर ठोकला खरा, पण खाण्यापिण्याचा प्रश्न होताच.
परप्रांतीय मजूर, भिल्ल, पारधी आदिवासी पाडे, तिरमली, वडार, कोल्हाटी, मदारी, वासुदेव, मसणजोगी, वैदू, बहुरुपी या भटक्या विमुक्तांच्या पालावरील माणसं. बांधकाम तसेच वीटभट्टय़ावर काम करणारे मजूर यांच्याही पोटापाण्याचा प्रश्न होताच. सतत भटके जीवन जगणारी ही माणसं ठिकठिकाणी अडकून पडली होती. अशा अवघड काळात या लोकांना मदतीचा हात दिला तो शांतिवनने. बीड जिल्हय़ातील शांतिवन ही संस्था कोरोना संकटकाळात भरडल्या गेलेल्या अशा अनेक कामगारांसाठी, भटक्या जमातींसाठी आधार बनली आहे.
या काळात शांतिवन संस्थेने 2000 लोकांच्या दोन वेळच्या अन्नाची जबाबदारी स्वीकारली. प्रशासनाने सुरू केलेले कॅम्प तसंच वेगवेगळ्या पालांवरील जमातींना संस्थेमार्फत दोन वेळेचं जेवण पुरवलं. रोजच्या 16000 चपात्या, भात, भाजी असा स्वयंपाक करून तो गरजेच्या ठिकाणी पोहचवण्याच्या कामात कमीत कमी लोकांचा सहभाग ठेवला. सोशल डिस्टंसिंगचे, स्वच्छतचे सर्व नियम पाळून हे सामाजिक काम चालू होतं, असं संस्थेचे संस्थापक दीपक नागरगोजे यांनी सांगितलं. नागरगोजे यांनी कामाचं चोख नियोजन केलं होतं. 15 लोकांच्या तीन टीममध्ये हे काम विभागलं होतं.
शांतिवनने सुरू केलेले हे अन्नदानाचं काम 8 एप्रिल ते 8 जून या दोन महिन्यांच्या कालावधीत सलग सुरू होतं. दोन महिन्यांच्या अविरत सेवेनंतर 8 जूनला या मदत कार्याला पूर्णविराम देण्यात आला. या काळात शांतिवन कम्युनिटी किचनमार्फत सुमारे अडीच लाख जेवणाची ताटं वितरित करण्यात आली. 2000 कुटुंबांना किराणा सामानाचं किट वाटप करण्यात आले. अनेक अडथळे पार करून लॉक डाऊन काळात माणसं जगवण्यासाठी शांतिवन संस्थेने केलेल्या प्रयत्नांनी समाजापुढे एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. शांतिवन संस्थेला आपणही मदतीचा हात देऊ शकता.





























































