
>> नयना आपटे (ज्येष्ठ अभिनेत्री)
लॉकडाऊनमध्ये पहिली गोष्ट जी मी केली असेन ती माझ्याकडे ज्या गृहसेविका आहेत त्यांना मी संपूर्ण सात महिने जेवढं अर्थार्जन करता येईल तेवढं केलंच, त्याच बरोबर त्यांना राशनही दिलं. त्यानंतर माझ्या ओळखीच्या बचत गटातल्या काही महिला आहेत त्यांच्याकडून ज्यांना खरोखरच सुरुवातीच्या काळात अन्नाची गरज होती अशा गरीब झोपडपट्टीतील शंभर घरं बघितली. त्यात माझ्या पलीकडे लेबर कॅम्प आहे, 90 फिट रोड आहे, कुंभारवाडा आहे अशा ठिकाणावरून आमच्याकडे कामगार येत असतात. त्यांच्याकडे जेवणाची भ्रांत होती अशा लोकांना खारीचा वाटा घेत मी पोळी भाजीची पाकिटं वाटप केली.
संपूर्ण महिनाभर मला करता आलं नाही पण आठ दिवस मी त्यांना अन्नपुरवठा माझ्या परीने करण्याचा प्रयत्न केला. कारण कपडे वगैरे फार पुढची गोष्ट आहे, आधी पोट महत्त्वाचं आहे. लोकांकडे काम नाही, त्यामुळे हातात पैसे नाहीत. यात आपणही त्यांना आर्थिक मदत करू शकत नाही, पण अन्न देऊ शकतो. ते मी करण्याचा प्रयत्न केला.
दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या बिल्डिंगचे दोघे-तिघे वॉचमन आहेत त्यांना आम्ही येऊ नका म्हणून सांगितले होते. अशा वेळेला सोसायटीने त्यांना अर्धा पगार दिला आणि अर्धा पगार मी दिला. कारण सुरुवातीच्या काळात लोक इतके घाबरले होते की त्यांना कोणीच काम देईनात, अशावेळी त्यांच्या घरची चूल पेटणंही गरजेचं होतं. त्यामुळे त्यांना आम्ही पगार देत होतो. त्याच्यानंतर आमच्या तीन माळ्यांच्या बिल्डिंगमध्ये ज्येष्ठ नागरिक बरेच आहेत, जे खाली उतरू शकत नाहीत. त्यात वॉचमन नव्हते. त्यामुळे दूध, भाज्या खाली ठेवण्यात यायचं.
ज्येष्ठ नागरिक किती वेळा खाली उतरून वर दूध-भाज्या घेऊन जाणार, धान्य घेऊन जाणार. अशा वेळी माझ्यासोबत मी सोसायटीतल्या दोघी-तिघींना तयार केलं आणि त्यांना म्हटलं, आपण चार-पाच महिने त्यांना वरती सामान नेऊन पोहोचतं करूया. हे मी केलं. तसेच आमचा वाहनचालक आहे त्यालाही मी पाच महिने बोलावलं नाही. संपूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे बाहेरच जाणार नाही मग नुसतं बोलावून काय करणार. त्यामुळे त्याला अर्थार्जन काहीतरी पाहिजे मग एक केलं, त्याची बायको लहान-सहान काम करत होती पण तिचंही काम सुटलं. अशा वेळी माझ्या लक्षात आलं की त्याची बायको स्वयंपाक खूप छान करते आणि तिला पापड करण्याचं ज्ञान आहे. तर मी तिला पापड करण्याची कल्पना सुचवली आणि तिला पापड बनवण्याची मशीन घेऊन दिली. तिला घरबसल्या तुझं काम सुरू होईपर्यंत हे कर. परिसरात जी काही लहान-मोठी दुकानं असतील त्यांना तुझे पापड विकायला दे. त्याच्यामध्ये जिथे तिचे पन्नास पापड जायचे आता तिथे पाचशे पापड जातायत. या गोष्टी मी केल्या. तसेच माझ्या बघण्यात जी आजूबाजूला लहान मुलं आली. कुणाला कपडे नाहीत, कुणाला खायला नाहीत या गोष्टी लक्षात आल्यावर त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचे. कारण मीही ज्येष्ठ असल्याने मलाही काळजी घ्यावी लागत होती. त्यामुळे शक्य तेवढी मी माझ्या परीने गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करत होते.





























































