
>> दुर्गेश आखाडे
अनेक वेळा पाठय़पुस्तकातील अभ्यासक्रमात विद्यार्थी अडकलेले असतात. पाठय़पुस्तकाच्या अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होणे गरजेचे असते. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास झाल्यास ते समाजात सहज वावरू शकतात आणि व्यक्तिमत्त्व विकासाची जडणघडण ही शालेय स्तरापासून होत असते. हे ओळखून रत्नागिरी तालुक्यातील सेंट्रल स्कूल झरेवाडी या जिल्हा परिषद शाळेने अभ्यासक्रमाबरोबरच विविध अभिनव उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. आज जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलाला पाठवायला पालक तयार होत नाहीत. पालकांना खासगी संस्थांच्या शाळेंचे फार आकर्षण असते. त्यात अलीकडे इंटरनॅशनल स्कूलकडेही पालकांचा कला वाढला आहे. अशा वेळी गोरगरीब कुटुंबातील मुलांसाठी जिल्हा परिषद शाळा हक्काचे ठिकाण ठरतात. सेंट्रल स्कूल झरेवाडीसारख्या शाळा सहशालेय उपक्रम राबवून खासगी शाळांशी ताकदीने स्पर्धा करत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील सेंट्रल स्कूल झरेवाडी या शाळेत अष्टपैलू विद्यार्थी घडत आहेत.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने सेंट्रल स्कूल झरेवाडी ही शाळा नेहमी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. एक उपक्रमशील शाळा म्हणून या शाळेचा जिह्यात नावलौकिक आहे. अभ्यासाबरोबरच सहशालेय उपक्रमात शिक्षक वर्ग तितकेच तन-मन-धन लावून राबतात. या उपक्रमांमुळे स्पर्धात्मक युगात वावरण्यासाठी विद्यार्थी सक्षम होत आहेत. विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती तल्लख होऊ लागली आहे, पाठांतर क्षमता वाढत आहे, एकाग्रतेमध्ये वाढ होते, सभा धीटपणा येतो, आत्मविश्वासात भर पडते, आनंदी राहण्याची सवय लागते, समाजात मिसळण्याची सवय विद्यार्थ्यांना होत आहे. सेंट्रल स्कूल झरेवाडी दरवर्षी शेतातील सहल आयोजित करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचेही शेतीशी नाते जोडले जाते. विद्यार्थी शेती अनुभवतात. शेतकऱ्यांशी संवाद साधतात.
अनेक शेतकरी कुटुंबातील मुले शाळेत शिकत असतात त्यांचाही आत्मविश्वास वाढतो. शाळा केवळ शेतीसहल आयोजित करून थांबत नाही, तर लावणीचा चिखल महोत्सवही आयोजित करते. ढोपरभर चिखलात जाऊन विद्यार्थी स्वतः शेतात लावणी करतात. शेतीचा प्रायोगिक अनुभव विद्यार्थ्यांमध्ये शेतीची आवड निर्माण करणारा ठरतो. आजकाल शेतीकडे कोणीही वळत नाही. शिकलेली मंडळी नोकरीच्या मागे लागतात. त्यामुळे गावातील घरे ओस पडत आहेत. पुन्हा एकदा शेतीकडे वळा असे म्हणण्याची वेळ आली असून विद्यार्थ्यांमध्ये शेतीची आवड निर्माण होणे महत्त्वाचे आहे. हे डोळय़ांपुढे ठेवून सेंट्रल स्कूल झरेवाडी विद्यार्थ्यांना शेतात राबायला शिकवते. त्यामुळे विद्यार्थीदशेतच शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव होते. दरवर्षी होणाऱ्या या लावणीच्या चिखल महोत्सवात विद्यार्थी मोठय़ा आवडीने सहभागी होतात. विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलता निर्माण व्हावी याकरिता मातीकाम शिकवले जाते. केक कसा करावा याची प्रात्यक्षिके शिकवली जातात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भातगिरणीत जाऊन प्रात्यक्षिक दाखवतात. तसेच गिरणीत लाकूड कसे कापतात यापासून सुतारकाम कसे केले जाते याचे प्रात्यक्षिक मुलांना दाखवले जाते.
मातीकामाबरोबरच शिल्पकामाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवून त्यांच्यामध्ये विविध कलेविषयी आवड निर्माण केली जाते. नवरात्रीमध्ये एक विशेष उपक्रमही शाळा राबवत असते. या उपक्रमात विचारमंथन केले जाते, अभिवाचन केले जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाची ओळख व्हावी याकरिता संगणक मार्गदर्शन केले जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीची थोडी भीती असते. ही भीती घालवण्यासाठी विद्यार्थ्यांना विशेष इंग्रजीचे मार्गदर्शन करणारे उपक्रम शाळा राबवते. शाळेच्या मुख्याध्यापिका आशा बगाडे यांच्यासोबत पदवीधर शिक्षक राजेश गोसावी, संतोष पेवेकर, सरिता आलीम, शीतल केळकर, अपूर्वा काळोखे आणि रामनाथ बने ही सर्व टीम मेहनत घेत असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उपक्रमशीलता आणण्याचे काम एक सरकारी शाळा करत आहे.





























































