
>> प्र. ह. दलाल
मराठी लेखन नियमांसंदर्भात शासनाच्या आदेशाला ‘बालभारती’ने यंदाही केराची टोपली दाखवली आहे. इयत्ता पहिली मराठी पाठ्यपुस्तकही सदोष आहे. गेल्या 15 वर्षांपासून हेच सुरू आहे.
मराठी भाषेच्या लेखनात एकरूपता येण्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, पाठय़पुस्तक निर्मिती मंडळ इत्यादी सर्व ठिकाणी प्रमाणिकृत मराठी वर्णमाला, अक्षरमाला व अंकांचे काटेकोर पालन करावे असे सुस्पष्ट आदेश महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग यांनी प्रथम दिनांक 6 नोव्हेंबर 2009 आणि नंतर 11 नोव्हेंबर 2022 रोजी काढलेले आहेत. मात्र शासनाच्या अधिनस्त असलेले बालभारती पाठय़पुस्तक मंडळ, राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद, माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ यांनी सदर आदेशाला सोळा वर्षांपासून सातत्याने तिलांजली दिली आहे.
2025-26 या शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता पहिलीच्या मराठी भाषेच्या पुस्तकातही शासनमान्य लेखन नियमांकडे व आदेशाकडे साफ दुर्लक्ष करून मनमानी कारभाराचे प्रदर्शन केले आहे.
नवीन नियमानुसार जोडाक्षर तोडून न लिहिता पारंपरिक पद्धतीनेच लिहिणे आवश्यक आहे मात्र पाठय़पुस्तक निर्मिती मंडळाने सर्वत्र जोडाक्षरे चुकीच्या पद्धतीने लिहिली आहे. द्वारे, पद्धत, खड्डय़ात, समृद्ध असे लिहिण्याऐवजी द्वारे, पद्धत, खड्ड्यात, समृद्ध अशा नियमबाह्य पद्धतीने लिहिली आहेत. तसेच ‘श’ आणि ‘ल’ ही अक्षरवळणे चुकीची असून ती (श, ल) अशी लिहिणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे स्वतः चुकीचे लिहून पान क्र. 13 आणि 45 वर विद्यार्थ्यांनाही हीच अक्षरे (चुकीची असूनही) लिहा, गिरवा असे सांगितले आहे. तसेच ‘द’ हे व्यंजन जोडाक्षरात आधी आल्यास व त्यापुढे ‘य’ आल्यास (द्य) असे न लिहिता (द्य) असे लिहावे हा नियम न पाळता सर्वत्र (विद्यार्थी) असे लिहिले आहे.
पान क्र. 67 वर ‘मुळाक्षरे’ असे म्हटले आहे, तेही नियमात नाही. त्याऐवजी ‘मराठी अक्षरमाला’ हा शब्द सुचविलेला आहे. त्यातही (ऋ) या दीर्घ स्वराचा वर्णमालेत समावेश नाही. फक्त (ऋ) या हस्व स्वराचा समावेश आहे. त्यातही (श) व (ल) चुकीच्या पद्धतीनेच लिहिला आहे. सूचनेत ‘अ ते अः’ हे स्वर, ‘क’ ते ‘ज्ञ’ ही व्यंजने आहेत असे विद्यार्थ्यांना सांगावे असे म्हटले आहे, तेही नियमानुसार नाही. ‘अ’ ते ‘औ’पर्यंत एपूण 14 स्वर, अनुस्वार विसर्ग हे दोन स्वरादी ‘क’ ते ‘ळ’पर्यंत 34 व्यंजने व ‘क्ष’, ‘ज्ञ’ ही दोन विशेष व्यंजन आहेत याची स्पष्ट ओळख प्रथमपासूनच विद्यार्थ्यांना असायला हवी.
आश्चर्याची गोष्ट अशी की, मराठी भाषा समितीत अध्यक्ष व सचिवांसह एपूण 17 तज्ञ सदस्य व प्रस्तावना लिहिणाऱ्या संचालक यापैकी एकाच्याही लक्षात या लेखनविषयक चुका लक्षात का येऊ नये? विशेष म्हणजे काही सन्माननीय सदस्यांच्या नावातही अशुद्ध लेखन आढळते.
अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठी भाषेबद्दल पाठय़पुस्तक मंडळच असे वागत असेल तर भावी पिढी आपण कशी घडविणार आहोत? हा गंभीर प्रश्न आहे.