
>> दयानंद पाटील
डहाणू–विरार चौपदरीकरणाचे काम मार्च 2027 ला पूर्ण होईल आणि सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यावर या मार्गावरून डहाणू लोकलच्या अधिकच्या फेऱ्या उपलब्ध होतील असे मागील महिन्यात मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड MRVC ने आरटीआयअंतर्गत माहिती दिली होती.
पालघर जिह्यात वाढवण बंदर, बुलेट ट्रेन बोईसर स्थानक आणि केळवे रोड येथे टेक्सटाईल पार्क तसेच वाढवण परिसरात विमानतळ हे प्रकल्प होऊ घातले असून विरारनंतर वैतरणा ते डहाणूदरम्यान नागरीकरण मोठय़ा प्रमाणात वाढू लागले आहे. डहाणू विभागातून अनेक नोकरदार, शाळा-कॉलेज विद्यार्थी, भाजीपाला विक्रेते आणि पर्यटक प्रवासी मोठ्या संख्येने मुंबई येथे प्रवास करत असतात. परंतु सध्या या विभागात धावणाऱ्या डहाणू लोकलच्या फेऱ्या येण्या-जाण्यासाठी अपुऱ्या पडत आहेत. प्रवाशांना अत्यंत त्रासदायकरीत्या गर्दीचा सामना करत प्रवास करावा लागत आहे.
कोरोना काळात सफाळे स्थानकात थांबणारी लोकशक्ती एक्स्प्रेस गाडीचा थांबा रद्द करण्यात आला होता, तो आजतागायत पुन्हा सुरू करण्यात आला नाही. तरी या गाडीऐवजी त्या वेळी लोकल फेरी उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची मागणी वाढू लागली आहे. आज डहाणू लोकलच्या किमान 5 अप आणि 5 डाऊन अशा फेऱ्यांची आवश्यकता असून तशा फेऱ्या सुरू करणे शक्य आहे. कारण न्यू उमरगाव ते न्यू सफाळे अशी मालवाहतूक रेल्वे मार्ग सुरू झाला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या मुख्य मार्गावरील अंदाजे 20 मालगाडय़ा dfcc मार्गावर वळवण्यात आल्याने बऱ्यापैकी स्पेस उपलब्ध झाला आहे.
डहाणू लोकलच्या किमान 5 फेऱ्या खालील वेळेत अपेक्षित आहेत.
मुंबईकडे जाण्यासाठी डहाणूहून (अप)
1) पहाटे -3:50
2) सकाळी – 8:30
3) संध्याकाळी – 4:45
4) संध्याकाळी – 6:15
5) रात्री – 11:30
डहाणूकडे जाण्यासाठी विरारहून (डाऊन)
1) सकाळी – 7:30
2) दुपारी – 2:30
3) संध्याकाळी – 5:30
4) रात्री – 8:00
5) रात्री – 10:15
तसेच डहाणू लोकलच्या सर्व लोकल 15 डब्यांच्या असाव्यात जेणेकरून डहाणू ते विरारनंतर या लोकलमध्ये अधिकचे प्रवासी विरार, वसई, भाईंदर, बोरिवली अशा स्थानकांतून समाविष्ट होतात तेव्हा या लोकलमध्ये इतकी गर्दी होते की, डहाणू-वैतरणादरम्यान येथून चढलेल्या प्रवाशांना इच्छित स्थानकात उतरणे शक्य होत नाही आणि प्रवाशा-प्रवाशांमध्ये हमरातुमरी भांडणे नेहमी होत असतात.तसेच महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना प्रामुख्याने जास्त त्रासदायक होत आहे.
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते डहाणूदरम्यानच्या उपनगरीय लोकल गाड्यांचे वेळापत्रकाची नवीन आखणी, जुळवाजुळव जुलैपासूनच सुरुवात करण्यात आली असणार तरी त्यादृष्टीने प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी तसा पाठपुरावा रेल्वे अधिकारी वर्गाकडे करावा अशी प्रत्येक डहाणू विभागातील प्रवाशांची अपेक्षा आहे. अपेक्षा आहे की येणाऱ्या नोव्हेंबर 2025 महिन्याच्या नवीन वेळापत्रकात डहाणू लोकलच्या वरीलप्रमाणे फेऱ्या वाढविण्यासाठी पश्चिम रेल्वे सकारात्मक निर्णय घेईल आणि प्रवाशांना सुखकर प्रवास करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल. पालघर जिह्याचे खासदारसाहेब डहाणू विभागातील प्रवाशांसाठी डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविण्याच्या दृष्टीने नक्कीच आग्रही आहेत आणि त्यांच्या प्रयत्नात नक्कीच येणाऱ्या नवीन वेळापत्रकात डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढलेल्या दिसून येतील अशी अपेक्षा करू या.