नाद-मराठी – भीमसेनी परंपरेतील गायक…

>> अरुण जोशी

मराठी  भाषेचा गंधही नसलेला एक तरुण तिकडे कर्नाटकात मंगळुरू येथे मित्राच्या घरी, बाबुजी सुधीर फडके यांचे ‘गीतरामायण’ ऐकतो काय आणि आपल्या सुरेल स्वरात ते सादरही करतो काय! सगळंच अविश्वसनीय वाटावं असं. वास्तविक या तरुणाला त्या काळात ओढ होती ती त्यांच्या गावात वार्षिक मुक्काम करून कार्यक्रम करणाऱ्या पंडित भीमसेन जोशी यांच्या गाण्याची. पुरोहिताच्या घरात मुळात ‘असलं काही’ करायला असलेला विरोध, पण वडिलांकडून आलेला गोड गळय़ाचा वारसा अशा द्वंद्वात काही वर्षे गेलेला आणि पुढे पुण्याला स्थायिक होऊन भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा आवडता शिष्य होणारा तो तरुण म्हणजे ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक पंडित उपेंद्र भट. शास्त्रीय संगीताबरोबरच त्यांना मराठीचा नाद कसा लागला आणि आता तर ते पुणेकर झाले त्याची ही गोष्ट.

1950मध्ये कर्नाटकातल्या मंगळुरू येथे जन्मलेल्या उपेंद्र यांचे मूळ नाव कृष्ण. तशी ही मंडळी मूळची गोव्याची, पण नंतर पौरोहित्य करण्यासाठी कर्नाटकात आलेली. उपेंद्रजींचे वडील मंगळुरूमधल्या वीर-विठ्ठल मंदिराचे पुजारी होते. एरवी विठ्ठलमूर्ती ‘कर कटीवर ठेवोनिया’ अशीच असते, पण या मंदिरातल्या मूर्तीच्या एका हाती सुदर्शन चक्र असल्याने तो वीर-विठ्ठल. विठ्ठलाचं असं रूप इतरत्र क्वचितच असावं, तर त्या मंदिरात पहाटे उपेंद्रजींचे वडील काकड आरतीच्या वेळी भजन गायचे. गोड गळा लाभलेल्या उपेंद्रलाही ती पाठ होती. ‘रंगनायका, राजीवलोचना, रमणेबेळगा…’ हे श्रीविष्णूला निद्रेतून जागवणारं सुस्वर भजन वयाच्या आठव्या वर्षी उपेंद्र उत्तम म्हणायचा. त्याने भजन-कीर्तन करावं, संस्कृत पंडित व्हावं ही वडिलांची इच्छा. कारण तेही संस्कृत भाषेत पारंगत होते, संवाद साधत होते. उपेंद्रला मात्र तिथल्याच बालाजी व्यंकटेश मंदिरात एकदा पंडित भीमसेन जोशी यांचं गाणं ऐकण्याची संधी मिळाली आणि त्याचा स्वरोदय झाला. भीमसेनजींचं शिष्य होण्याचं त्यानं ठरवलं.

पंडित भीमसेनजींच्या गाण्याच्या वेळी तानपुऱ्यावर साथ करण्याची संधी पंधराव्या वर्षी उपेंद्रला लाभली. त्यांच्याकडे गाणं शिकण्याची इच्छा व्यक्त करताच पंडितजींनी आपले एक शिष्य ‘‘माधव गुडी यांच्याकडे पाच-सात वर्षे शिका आणि मग बघू’’ असं सांगितलं. पं. माधव गुडी यांच्याकडे शिक्षण सुरू असतानाच त्या छोटय़ा गावात वेळावेळी आलेल्या फार मोठय़ा दिग्गज कलाकारांचं गाणं ऐकण्याचा योग उपेंद्रला आला. बडे गुलाम अली खां, अमीर खां, सलामत अली, नजाकत अली, पं. अंकारनाथ ठाकूर, गंगूबाई हनगल अशा ज्येष्ठांची गाणी ऐकताना कानही तयार होत गेला. बडे गुलाम अली खां यांनी गायिलेला सोहोनी राग त्यांना चांगलाच स्मरतो. ज्येष्ठ नाटय़-चित्र कलाकार विक्रम गोखले यांनी दूरदर्शनवर घेतलेल्या मुलाखतीत पं. उपेंद्र भट यांनी तो थोडासा गायला होता. ‘प्रेम की मार कटार’ असे त्याचे शब्द. (याच उस्ताद बडे गुलाम अली खां यांनी ‘मोगले आझम’ चित्रपटातलं तानसेन सोहोनी रागातली ‘प्रेम जोगन बनके’ गायिलं आहे.) ताल-सूर-स्वर याची पं. उपेंद्रजींना उपजतच देणगी होती. वीर-विठ्ठल मंदिरातील संवादिनी (पेटी) त्यांनी सहज हाती घेतली आणि काहीही शिक्षण नसताना संवादिनीतून सुयोग्य सूर त्यांना निर्माण करता आले. या सगळय़ात वयाची तिशी आली. संसारही सुरू झाला, पण पं. भीमसेन जोशींकडे जायचा योग येईना. दरम्यान इन्शुरन्स कंपनीत उपजीविकेसाठी नोकरीही करावी लागत होती. भीमसेन मंगळुरूला आले की, तानपुऱ्याच्या साथीला मात्र आवर्जून बोलवायचे. अखेरीस 1979मध्ये गुरुकृपा झाली आणि उपेंद्र भट पुण्याला आले. पं. भीमसेन जोशी यांच्याकडे गाणं शिकणं ही कठोर तपस्या होती, पण त्यात ते गुरूंना प्रसन्न करू शकले. 1980मध्ये पं. उपेंद्र भट यांनी पुण्यालाच घर केलं.

अजित सोमण यांच्याकडून रीतसर मराठी शिकून घेत उपेंद्र ‘मराठी’ झाले. गमतीची गोष्ट म्हणजे मराठी समजत नसताना भजनाच्या कार्यक्रमात ते रामदास कामत यांचं ‘प्रथम तुज पाहता’ गाणं म्हणत आणि त्याला वन्समोअरही मिळायचा. भट यांना वाटायचं हे ‘देवदर्शना’चं गीत आहे. सत्य समजलं तेव्हा हसू आलं.

पं. भीमसेनजींची मराठी गाणी, अभंगवाणी, खळे काकांनी केलेली भीमसेन-लता दीदी यांची गीतं पं. उपेंद्र भट उत्तम सादर करतातच, पण त्यांनी स्वतःही अनेक मराठी अभंग गायले आहेत. ‘रामनाम उच्चारा, जन्माचे सार्थक करा’ किंवा ‘समचरण तुझे देखिले म्या सावळे’ ही भजनं जरूर ऐका. ‘बिजलीचा टाळ, नभाचा मृदंग, तुझ्या कीर्तनाला देवा धरती होई दंग’ हे गंगाधर महांबरे यांचं, मुकुंद गद्रे यांनी संगीत दिलेलं भक्तिगीतही श्रवणीय आहे.

याशिवाय शास्त्रीय संगीतातील मैफली, नवे विद्यार्थी घडविणे यात पंडितजी व्यस्त असतात. जगात अनेक ठिकाणी कार्यक्रम झालेले आणि अनेक संगीत पुरस्कार लाभलेले पं. उपेंद्र भट नेहमीच अतिशय विनम्र आणि आपल्या गुरुंविषयी कृतज्ञ असतात. ते पुण्याला आले तेव्हा त्यांना ना भाषा येत होती ना त्यांचे तिथे कुणी नव्हतं. ती खंत गुरुजींना सांगताच पंडित भीमसेन जोशी दिलासा देत म्हणाले, ‘‘गाणं उत्तम करा, इथले लोक तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाहीत’’…आणि कलासक्त महाराष्ट्राने ते अनेकांच्या बाबतीत सिद्ध केलंय!