
>> अरुण जोशी
अनेक वर्षांपूर्वीची नागपुरातली गोष्ट. संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. त्यावेळी ‘सीबीआय’मध्ये अधिकारी असणारे बेंजामिन टिमथी यांच्या कुटुंबाचा त्यात सक्रिय सहभाग होता. गायक कलाकारांमध्ये रफी, मुकेश, हेमंतकुमार आणि मन्नादा हेते, पण गायिका काही कारणाने येऊ शकली नव्हती. टिमथी कुटुंबातले मधुसूदन हे व्हायलिनवादक तर रत्नाकर तबलावादक. मधुसूदन यांनी गायिका म्हणून आपली लहान बहीण उषा हिचं नाव सुचवताच कल्याणजींनी विचारलं, ‘तिचं वय किती?’ मधुसूदन म्हणाले, ‘असेल सात-आठ.’ कल्याणजींनी स्मित करत म्हटलं, ‘एवढय़ा दिग्गज गायकांसमवेत ती कशी गायील?’
…पण दुसरा भाऊ रत्नाकर उषाला कार्यक्रमासाठी घेऊन गेला आणि मध्यंतरात, उषाने पडद्यामागून लतादीदींचं त्यावेळी गाजत असलेलं ‘चोरी चोरी’ चित्रपटातलं ‘रसिक बलमा’ हे गाणं त्यातल्या भावभावनांसह पेश केलं. ते ऐकून ज्येष्ठ गायक मंडळी इतकी खूश झाली की, रफीसाहेबांनी उषाला विचारलं, ‘तू माझ्याबरोबर ‘सौं साल पहले, मुझे तुमसे प्यार था’ हे (‘जब प्यार किसी से होता है’ या चित्रपटातलं देव आनंद आणि आशा पारेख यांच्यावर चित्रित झालेलं) गीत गाशील का?’…आणि छोटय़ा उषाने ते अप्रतिम म्हटलं.
त्यानंतर मन्ना डे यांच्यासह ‘ये रात भिगी भिगी’ त्यातील कठीण आलापासह सादर केलं. मुकेशजींबरोबर ‘ये वादा करो चांद के सामने’ आणि हेमंतकुमार यांच्यासह ‘तुम्हे याद होगा, कभी हम मिले थे’ हे गाणंही सादर झालं. श्रोते या छोटय़ा मुलीचा धीटपणा आणि सुरेल स्वर यांनी भारावून गेले. मग असा हा स्वर हिंदी सिनेगीतांमध्ये आला नसता तरच नवल. उषा टिमथी या नागपूरच्या. त्यांच्या घरात सर्वांनाच संगीताची आवड होती. घरात भाऊ मधुसूदन गाण्याचे कार्यक्रम आयोजित करत असत. त्या काळात लहानगी उषा, लता-रफी यांची गाणी गुणगुणत असे. तिचा गळा गोड आहे हे सर्वांच्याच लक्षात आलं होतं.
उषा टिमथी यांचं संगीत शिक्षण पं. लक्ष्मण प्रसाद यांच्याकडे झालं. त्या टप्पा-ठुमरी शिकल्या निर्मलादेवींकडे. सिनेस्टार गोविंदाची आई असलेल्या निर्मलादेवींना ठुमरी गायिका म्हणून खूप सन्मान लाभला होता. त्यांच्याकडे शिकायला मिळणं ही भाग्याची गोष्ट होती. तसंच कालांतराने बराच परिचय झाल्यावर स्वतः महंमद रफी यांनी त्यांना हार्मोनियमवर (संवादिनी पिंवा पेटीवर) गाणी शिकवल्याचं उषा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांनी उषा टिमथी यांचं गाणं थेट दिग्गज गायकांसहच ऐकलं असल्याने मुंबईत येऊन हिंदी चित्रसृष्टीत कारकीर्द करण्याचं उषाताईंनी ठरवलं. 1962 मध्ये त्यांना ‘दुर्गा पूजा’ चित्रपटात पहिल्यांदा पार्श्वगायनाची संधी मिळाली. नंतर 1965 मध्य ‘हिमालय की गोद मे’ नावाचा चित्रपट खूप गाजला. त्याचं संगीत कल्याणजी-आनंदजी यांचं होतं. त्यात मनोजकुमार आणि माला सिन्हा यांच्यावर चित्रित झालेलं ‘तू रात खडी थी छत पे’ हे गाणं उषा टिमथी यांनी महंमद रफी यांच्यासह गायिलं. ते खूप गाजलं. 1970 च्या दशकात कल्याणजी-आनंदजी यांच्याच संगीतात त्यांनी ‘तकदीर’ चित्रपटासाठी ‘जब जब बहार आयी’ आणि ‘पापा जलदी आ जाना’ ही तेव्हा अतिशय गाजलेली गीतं गायिली.
याशिवाय बुलो सी रानी, रोशन (हृतिकचे आजोबा), हंसराज बहल, उषा खन्ना अशा अनेक संगीतकारांकडे त्या गायिल्या. सी. रामचंद्र यांच्या कार्यक्रमात त्या लतादीदींची गाणी सादर करत असत. पन्नासहून अधिक हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी आवाज दिला. हिर-रांझा’, ‘ट्रक ड्रायव्हर’, ‘महाराणी पद्मिनी’ असे त्यांचे कितीतरी चित्रपट. त्यांच्या स्वतंत्र कार्यक्रमात त्या केवळ स्वराच्या आलापीमधून भावना कशा व्यक्त करायच्या याचं उत्कष्ट प्रात्यक्षिक करून दाखवत असत.
अशा या महाराष्ट्रातल्याच गुणी गायिकेचं माझ्या लक्षात राहिलेलं मराठी गाणं तुम्हालाही आठवेल. ‘बहकलेला ब्रह्मचारी’ या चित्रपटासाठी संगीतकार आणि गायक स्नेहल भाटकर यांनी उषाताईंकडून गाणी गाऊन घेतली. त्यातलं ‘शुप् शुप् मन्या, जातोस की नाही, की घालू का पाठीत लाटणं’ हे गाणं तेव्हा सतत गुणगुणलं गेलं. याशिवाय त्याच चित्रपटातली आणखी दोन गाणी म्हणजे ‘ज्या हरीवर प्रीती केली, ज्याचे जडले पिसे’ आणि ‘भारत अमुचा देश, भारत अमुचा देव’ ही सगळी गीतं कवि विनायक राहतेकरांची. गाण्यांमधले सहगायक स्वतः स्नेहल भाटकर. त्यांनी या सुस्वर गायिकेला संधी दिली. मराठीत उषाताईंची आणखीही गाणी असतील, पण याक्षणी आठवत नाहीत.
बालवयातच रफी, मन्ना डे, हेमंतकुमार आणि मुकेश अशा आपापल्या शैलीने ज्येष्ठ-श्रेष्ठ असलेल्या उषा टिमथी यांची प्रशंसा झालेली असूनही नंतरच्या काळात हिंदी तसेच त्या मुंबईत आल्यावर मराठी चित्रसृष्टीतही फारशी गाणी मिळाली नाहीत असं वाटलं तरी त्यांच्या बहुविध भाषांमधल्या एकूण गीतांची संख्या काही हजारांत आहे. अशा मोजक्या गाण्यांनी एकेक काळ गाजवणाऱ्या गायक-गायिकांना आता या लेखमालेत आपण भेटणार आहोत.






















































