नाद-मराठी – ‘एक दो तीन…’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुण जोशी

हिंदी चित्रपट संगीताचा एकोणीसशे ऐंशीपर्यंतचा काळ मुख्यत्वे लता, आशा यांचा होता. पुरुष गायकांमध्ये नवनवे स्वर येत होते, तसे अनेक गायिकासुद्धा अधूनमधून चमकत होत्या. शमशाद बेगम, गीता दत्त, वाणी जयराम, शारदा वगैरे गायिकांना बरीच गाणी मिळाली. सुमन कल्याणपूर यांनी तर एक काळ गाजवला. त्याशिवाय मधुबाला चावला, सुधा मल्होत्रा अशीही नावं होतीच, परंतु केवळ हिंदीच नव्हे तर अनेक प्रादेशिक भाषांमधल्या चित्रपटांचं संगीत लता-आशा-उषा यांच्या स्वरांनी सजत होतं. काही गाण्यांपुरत्या प्रीती सागर किंवा अगदी सलमा आगासुद्धा येऊन गेल्या. मंगेशकरांव्यतिरिक्त इतर गायिकांचीही काही गाणी वाजली-गाजली. तरीही पडद्यावर गायिका म्हणून लता मंगेशकर आणि आशा भोसले या नावांना कमालीचं वजन होतं आणि ते त्यांच्या अद्वितीय गान-गुणवत्तेमुळेच प्राप्त झालेलं होतं. त्यांच्या सद्दीची चार-पाच दशकं झाल्यावर काही नवे स्वर येऊ लागले. आपल्याकडच्याच सुरेल गायिका साधना सरगम (घाणेकर) किंवा उत्तरा केळकर त्याचबरोबर कविता कृष्णमूर्ती, हेमलता वगैरे.

त्यानंतरच्या काळात म्हणजे 1980 मध्ये एका मुलीचा स्वर चित्रपटातून कानी येऊ लागला ती अलका याज्ञिक. 1966 मध्ये कोलकाता येथे जन्मलेली अलका तिथल्या गुजराती कुटुंबातली. तिची आई शुभा शंकर या शास्त्रीय संगीत गायिका. त्यामुळे बालपणापासूनच अलकावर संगीताचे संस्कार होते. तिच्या गाण्याविषयी, भावी कारकीर्दीविषयी तिची स्वरज्ञान असलेली आई पूर्णपणे सजग होती. मुलीच्या स्वराला बॉलीवूडमध्येच न्याय मिळेल हे ओळखून शुभा शंकर यांनी तिच्या दहाव्या वर्षी उत्कर्षनगरी मुंबईला आणलं. तसं वयाच्या सहाव्या वर्षापासूनच आकाशवाणीवर अलका गात होती. भजनं गातानाही शास्त्र्ााrय संगीताची बैठक पक्की झाली होती.

मुंबईत आल्यावर राज कपूर यांच्या ‘आरके’मध्ये काही काळ ‘डबिंग आर्टिस्ट’ व्हायचं की स्वतंत्र गायिका म्हणूनच योग्य वेळी बॉलीवूडमध्ये पदार्पण करायचं असा प्रश्न अलकाच्या आईसमोर होता. सुज्ञ मातेने थोडं थांबून लेकीला, स्वतंत्र गायिकेच्या रूपातच पाहायचं ठरवलं आणि ‘पायल की झंकार’ चित्रपटात ‘थिरकत अंग’ या गाण्यात अलका याज्ञिक या नवतरुण गायिकेचा स्वर प्रथम प्रगटला. आता मागे वळून पाहणे नव्हते. पुढचा यशोमार्ग स्पष्ट दिसत होता. 1982 मध्ये आलेल्या ‘हमारी बहू अलका’ या चित्रपटातलं ‘मेरे अंगने में’ हे गाणं गाजलं आणि अलका याज्ञिक या नावाची मोहर उमटली. त्यानंतरचं ‘तेजाब’मधलं ‘एक दो तीन, चार पाच छे सात’ गाणं आठवा. या गाण्याने अलका याज्ञिक यांना सातपैकी पहिलं फिल्म फेअर ऍवॉर्ड अवघ्या एकविसाव्या वर्षी प्राप्त करून दिलं. उत्कृष्ट गायिका म्हणून सात ‘फिल्म फेअर’ आशा भोसले यांच्यानंतर अलका याज्ञिक यांनाच मिळाली. एकूण 25 भाषांमध्ये गाणी म्हणणाऱ्या अलका याज्ञिक यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, बप्पी लाहिरी अशा दिग्गज संगीतकारांकडे गाणी गायिली. त्यांच्या सहगायकांमध्ये हरिहरन, कुमार शानू, सोनू निगम, कविता कृष्णमूर्ती असे नामांकित स्वर आहेत. आठ हजारांहून अधिक गाणी गाणाऱ्या अलका याज्ञिक यांना उत्कृष्ट गायिका म्हणून दोन राष्ट्रीय पारितोषिकं लाभली. त्या यू-टय़ूब म्युझिक चार्टवरच्या क्रमांक एक प्राप्त करणाऱ्या गायिकाही ठरल्या. सुमारे 3 कोटी 70 लाख ‘व्हय़ूअर्स’नी त्यांची गाणी अनुभवली. 1993 मध्ये इला अरुण यांच्यासह गायिलेलं त्यांचं ‘चोली के पीछे’ हे गाणं वादात सापडलं. माधुरीवर चित्रित झालेल्या या गाण्याची तेव्हा खूप चर्चा झाली. अलका याज्ञिक यांनी ‘अगर तुम साथ हो’ हे गाणं ए. आर. रहेमानकडे गायिलं. यावरून त्यांची लक्ष्मीकांत प्यारेलाल ते ए. आर. रहेमान ही सांगीतिक कारकीर्द लक्षात येईल. अजूनही त्यांचा गानप्रवास सुरूच आहे. स्वतंत्र अल्बम, देश-विदेशात कार्यक्रम यातून त्या रसिकप्रिय ठरल्या आहेत. ‘सपने साजन के’ चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली आणि 2006 मध्ये ‘सारेगमप’ कार्यक्रमाच्या ‘महागुरू’ होण्याचा सन्मानही मिळाला. गेल्या आठ दशकांत आलेल्या गायिकांनी लता मंगेशकर यांचं ऋण मान्य केलंय. एका चॅनेलवरच्या ‘लता स्पेशल’ कार्यक्रमात दीदींची गाणी गाण्यापूर्वी त्यांनी पडद्यावरूनच ‘दीदी, काही चुकलं तर क्षमा करा’ असं म्हणून ‘अजीब दास्तां है ये’ आणि ‘रहे ना रहे हम’ यासारखी दीदींची अमर गीतं सादर केली. अलका याज्ञिक यांच्या पहिल्या गुरू त्यांच्या आई आणि गाण्यातील बारकावे त्यांनी अभ्यासले दीदींच्या गाण्यांमधून. अशा या यशस्वी गायिकेने मराठीत नेमकी किती गीतं गायिली ठाऊक नाही; पण अलीकडेच त्यांचं एक गाणं सुरेल आलंय ते म्हणजे-

‘पापण्यांच्या ओंजळीत रितेपण बाकी…

घर एकाकी’

त्यापूर्वी ‘एक फुल चार हाफ’ या चित्रपटात अलका याज्ञिक यांनी सुरेश वाडकरांसह ‘कन्हय्या ओ कन्हय्या’ हे गाणं गायलंय. या गीताचे शब्द विवेक आपटे यांचे तर संगीत अनिल मोहिले यांचं आहे. अर्थात एक प्रश्न आहेच की, बॉलीवूड मुंबईतच असताना इतर भाषक गायक-गायिकांची अनेक गाणी मराठीत का नाहीत? याचं एक उत्तर असं की, आपल्याकडे विविध शैली असलेले अनेक स्वर उपलब्ध आहेत. लता-आशा-उषा याच मराठी असल्याने इतर भाषिक गायिकांची मराठी गीतं कमी असतील. मात्र अनेक मराठी संगीतकार हिंदी चित्रपटसृष्टी गाजवत होते तेव्हाच्या काळात मुकेशचं एकच (बहुदा) गाणं मराठीत असावं हे विशेष. नूरजहां, सैगल यांच्या काळात पार्श्वगायन नसल्याने (असलंच तर क्वचित) त्यांना मराठीत संधी मिळाली नसेल, पण त्यांच्या गैरफिल्मी गाण्यांतही मराठी गाणं नसावं हेही आश्चर्यच.