नाद-मराठी – भरदार आणि सुरेल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुण जोशी

पं. भीमसेन जोशी यांना देव मानून देव्हाऱ्यात त्यांचा फोटो ठेवून पूजा करणारा हुबळीतला एक तरुण. कधीकाळी या दैवतांचा फोन येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण गोव्याला जाताना जयतीर्थ मेवुंडी यांना साक्षात भीमसेनजींचा फोन आला आणि त्यांना पुण्याच्या प्रसिद्ध सवाई गंधर्व संगीत समारोहासाठी आमंत्रण दिलं. आपल्या गायनपेमी आईची आठवण जयतीर्थना आली. त्यांनी फोन करून ही सुखद वार्ता सांगितल्यावर त्यांच्या मातेचा विश्वासच बसेना.

पण ते सत्य होते. कार्यक्रमापूर्वी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी या तरुण गायकाला स्वतः तानपुरा लावून दिला. जयतीर्थला मनात धास्ती वाटत होतीच. कारण समोरच त्याचं दैवत त्याचं गाणी  ऐकण्यासाठी बसलं होतं. गाणं संपलं. भीमसेनजींनी कौतुक केलं आणि एकलव्यासारख्या या शिष्याला धन्य झाल्यागत वाटलं.

आज जयतीर्थ मेवुंडी या किराणा घराण्याच्या गायकाचं नाव जगात सर्वत्र गाजतंय. कर्नाटकात हुबळी येथे जन्मलेल्या या गायकाने किराणा घराण्याची पताका फडकत ठेवली आहे. त्याच गायिकीत स्वतःची शैली निर्माण केली आहे. त्यामुळे पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे रसिक श्रोते जगभर आहेत.

शास्त्रीय संगीताच्या बाबतीत महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचं नातं म्हणजे अद्वैत आहे. उत्तरेतून महाराष्ट्रात आलेल्या आणि मराठीच झालेल्या अब्दुल करीम खाँसाहेब यांचा बराच शिष्य परिवार कर्नाटकातला. पं. भीमसेन, पं. फिरोज दस्तूर, तसंच पंडिता गंगूबाई हनगल अशा दिग्गज गायकांचे गुरू सवाई गंधर्व म्हणजेच रामभाऊ कुंदगोळकर किराणा घराण्याचेच. शिवाय कर्नाटकात, शास्त्रीय संगीताची परंपराही मोठी. मुख्यतः कर्नाटक संगीत तिथे घराघरात पोचलेलं. परंतु पुढच्या काळात, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, अल्लादियाखाँ साहेब, अब्दुल करीम खाँ, तसेच गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पळुसकर अशा महान गायकांनी उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत महाराष्ट्र-कर्नाटकात रुजवलं. मुंबईत तर प्रो. देवधर यांचे संगीत विद्यालयच होते. याशिवाय गंधर्व महाविद्यालयाद्वारे अव्याहत संगीत साधना होत होती. अनेक गुणी गायक उदयाला येत होते. या सर्वांनी शास्त्रीय संगीताचं विश्व अधिक समृद्ध केलं.

त्या काळात नाटकातली पदं गाणारे भाऊराव कोल्हटकर, बालगंधर्व, मास्टर दीनानाथ, संगीतसूर्य केशवराव भोसले अशी अनेक मंडळी मराठी, कानडी, हिंदी भाषांमधून जी पदं गात असत त्याचा पाया त्यांच्या शास्त्रीय संगीताचा प्रदीर्घ अभ्यासाच्या भक्कम पायावर आधारित होता.

ती परंपरा बदलत्या काळाला अनुसरून आजतागायत सुरू आहे.  विविध सांगीतिक घराण्यांचे गायक आणि गायिका यांची मांदियाळीच आपल्याला मराठी मुलुखात आढळेल. सुरश्री केसरबाई केरकर, गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर, त्यांच्या कन्या किशोरीताई तसंच पुण्यातील गानकोकिळा हिराबाई बडेदेकर आणि सरस्वती राणे या भगिनी अशी कितीतरी नावं सांगता येतील.

त्याच्या थोडीशी पुढची पिढी म्हणजे पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, पं. छोटा गंधर्व, पं. वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा आणि बरेच महनीय स्वर. या सर्व मंडळींनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा वारसा जपला, टिकवला आणि वाढवला. त्यामुळे आता चाळिशी-पन्नाशीत असलेल्या पिढीतही अनेक ताकदीचे कलाकार दिसून येतात. पं. जयतीर्थ मेवुंडी त्यापैकीच.

जयतीर्थ यांच्या आईवडिलांना शास्त्रीय संगीताची आवड होती. बालपणी जयतीर्थ त्यांच्याबरोबर हुबळीच्या सवाई गंधर्व समारोहात गाणं ऐकायला जात असत. त्यांची आई रेडिओवर लागणारी भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे यांची मराठी गाणीही ऐकत असे. संगीताला, सुरांना भाषेचं बंधन नसतं. त्यातही संत पुरंधरदासांचे अभंग आणि विठ्ठलाची भक्ती करणारी अभंग रचना घरोघर गुणगुणली जायची.

जयतीर्थ यांचं शास्त्रीय संगीताचं सुरुवातीचं शिक्षण अर्जुन सनाकोड यांच्याकडे झाले. ग्वाल्हेर आणि किराणा घराण्याची गायिकी त्यांनी शिकवली. नंतर पं. श्रीपती पाडीगर यांनी अनेक मोठय़ा कलाकारांच्या गायिकीचे दाखले देऊन जयतीर्थचं गाणं व्यापक केलं. एकेका स्वरासह रागाचं सौंदर्य कसं वाढवावं हे पाडीगर यांनी सांगितलं. त्यासाठी ते आठ-आठ तास रियाज करून घ्यायचे. सर्व घराण्यांची गायिकी शिष्यांनी जाणून घ्यावी, त्यातलं चांगलं आत्मसात करावं असं सांगायचे.

मुळातच अतिशय गोड गळा आणि भरदार स्वर लाभलेल्या जयतीर्थ यांनी या शिकवणुकीचं सोनं केलं हे त्यांचं कोणतंही गाणं ऐकलं तरी लक्षात येईल. पं. भीमसेनजींप्रमाणेच त्यांनीही अनेक मराठी अभंग गायिले. त्यांचं ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’ किंवा ‘लइ आणि लइ नाही मागणं देवा’, ‘विसावा विठ्ठल’ असं अनेक अभंग लोकप्रिय आहेत. ते उत्तम मराठी जाणतात. बोलतात.

सुबोध भावे आणि मोहन जोशी यांनी गाजवलेल्या ‘पुष्पक विमान’ चित्रपटात समीर सामंत यांचं नरेंद्र भिडे यांनी संगीत दिलेलं ‘देह पांडुरंग, देहभान पांडुरंग’ हे भावपूर्ण भक्तीगीत त्यांनी गायले आहे.

पं. जयतीर्थ यांच्या अथक परिश्रमांनी आणि अर्थातच प्रभावी गायनशैलीने त्यांना अमाप यश दिलं. भारतरत्न लता मंगेशकर यांनीही त्यांना गाणं रेकॉर्ड करण्यासाठी बोलावलं हा मोठा सन्मान होता. पं. रविशंकर यांनाही गाणं ऐकवण्याची संधी मिळालेले जयतीर्थ या तिन्ही ‘भारतरत्नां’विषयी कृतज्ञता व्यक्त करतात. त्यांची सांगीतिक विद्या या विनयाने अधिक शोभिवंत होते.