
- द्वारकानाथ संझगिरी
आपल्या घरच्या गच्चीत हौसेने लावलेल्या गुलाबाच्या झाडाला जेव्हा पहिला टप्पोरा गुलाब येतो तेव्हा जो आनंद होतो तो आनंद मला पृथ्वी शॉच्या पदार्पणातल्या ‘शॉ’नदार शतकाने झाला. या शतकाचं वर्णन ‘तो आला, एक क्षण त्याने पाहिलं, मग थेट फटके खेळला, शतक पूर्ण केलं आणि जिंकला’.
पण नाही मला कुठलंही भाकीत करायचं नाहीए.
तो उद्याचा सचिन तेंडुलकर आहे असंही आज नाही म्हणणार.
चला, पुढच्या दहा वर्षांची आपली आघाडीची कटकट संपली असंसुद्धा नाही म्हणणार.
कशाला त्या भविष्यकाळात वेगाने धावत जायचं? त्यापेक्षा आज या टप्पोऱया शतकी गुलाबाच्या सौंदर्यात हरवून जाऊया.
त्याचं वय आहे फक्त अठरा वगैरे! ते त्याच्या चेहऱयावर लिहिलेलं आहे. पण फक्त तिथेच, त्याच्या फलंदाजीने मुलगा आणि पुरुष यामधील सीमारेषा कधीच ओलांडलीय असं वाटलं. क्रिकेटच्या बाबतीत त्याने कधी ‘अर्धी’ चड्डी घातल्याचा संशयच आला नाही. तो कायम फुल पॅण्टमधलाच वाटला. मग ते शालेय क्रिकेट असो, 19 वर्षांखालील रणजी-दुलीप किंवा आता कसोटी क्रिकेट.
तो त्याचा पहिला कसोटी सामना खेळतोय हे पटत नव्हतं. पाठीशी दोन शतके ठोकून रणजीचा पुढचा सामना खेळायला आल्यासारखा तो वाटला. त्याच्या पहिल्याच बॅकफूट ड्राइव्हने त्याचं आक्रमक मन त्याने व्यक्त केले. मग जाणवलं की, प्रत्येक चेंडूवर तो धावा शोधतोय. अगदीच नाइलाज झाला तर तो बचाव करतो.
बरं त्याचं आक्रमण हे उसनं नव्हतं. ते साहसीसुद्धा नव्हतं. ते आईच्या दुधाइतकं नैसर्गिक होतं. तो जाणूनबुजून गोलंदाजीवर वर्चस्व गाजवतोय असं वाटलं नाही. एखादा झरा ज्या नैसर्गिकपणे वाहतो त्या नैसर्गिकपणे त्याचे फटके वाहत होते. त्यावर मुंबई क्रिकेटच्या परंपरेचा आणि संस्कृतीचा शिक्का होता.
त्याचा आत्मविश्वास किमान दहा शतकं गाठीशी असणाऱया फलंदाजाचा होता. एखादा खेळाडू फॉर्मात असताना संधी देण्याचा हा फायदा असतो. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकरला तशी लहान वयात, फॉर्मात असताना संधी मिळाली. त्यांनी जग जिंकलं. त्यांच्या पावलाशी पावलं जुळवत तो पुढे चालत गेला तर आपल्याला ते हवयंच, पण त्याच्यावर तो दबाव टाकला जाऊ नये. योग्य वेळी संधी मिळणंही एखाद्याच्या क्रिकेट कारकीर्दीत फार महत्त्वाची गोष्ट आहे. ती मुंबईच्या अजित वाडेकरच्या नशिबी नव्हती. इंग्लंडला संधी न देता त्याला इथे संधी दिली गेली हेसुद्धा चांगलं झालं. इंग्लंडमध्ये हिंदुस्थानी फलंदाजीचं ‘वातावरण’ डिप्रेसिंग होतं. चेंडू जबरदस्त स्विंग होत होते. ते बाभळीवरून चालणं होतं. त्यात कोवळय़ा पायांना काटे लागायची शक्यता जास्त होती. आज ना उद्या त्याला बाभळीवरून, निखाऱयांवरून चालायलाच लागेल. त्याशिवाय क्रिकेटमध्ये मोठेपण मिळत नाही. पण सुरुवात निष्कंटक रस्त्यावरून झाली तर पदार्पण करणाऱया खेळाडूंच्या दृष्टीने ते चांगलं असतं. पृथ्वी शॉ या बाबतीत भाग्यवान आहे. खेळपट्टी टणटणीत आहे. आणि समोरचं आक्रमण, मुंबईच्या मैदानाचा शब्द वापरायचा तर ‘पोपटवाडी’. माझ्या पिढीची माणसं ही वेस्ट इंडीजची गोलंदाजी आहे यावर विश्वास ठेवणार नाहीत. सुनील गावसकरने त्या गोलंदाजीसमोर एका हाताने आरामात फलंदाजी केली असती. पण म्हणून पृथ्वी शॉच्या धावांचं मोल कमी होत नाही. क्रिकेटमध्ये कुठेही अगदी गल्लीतही शतक अनमोल असतं. कसोटीच्या पदार्पणात तर नक्कीच. आणि खेळपट्टी पाटा म्हणून पुजाराला शतक मिळालं नाही. ओव्हलवर ‘कडकडीत’ शतक ठोकणाऱया राहुलला शून्यावर परतावं लागलं.
त्याच्या फलंदाजीत आणखीन काही चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या. त्याची बॅकलिफ्ट मोठी आहे. मला वाटतं की, जॅक फिंगल्टन त्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि लेखकाचे बोल आहेत – ‘High backlift ad flourishig follow through is a hallmark of a great player.’ अर्थात, भविष्यात अधिक वेगवान गोलंदाजी खेळताना त्याला बॅकलिफ्टमध्ये ऍडजस्टमेंट करावी लागते. ऑस्ट्रेलियाचा रे लिंडवॉल हा क्रिकेटच्या इतिहासातला महान वेगवान गोलंदाज. 1948 साली ऑस्ट्रेलियात आघाडीला जाणारा विनू मंकड सुरुवातीला लवकर बाद होत होता. एका पार्टीत त्याने लिंडवॉलला विचारलं, ‘माझं काय चुकतंय?’ लिंडवॉल म्हणाला, ‘तुझी बॅकलिफ्ट तुला ऍडजेस्ट करावी लागेल.’ त्यानंतर मंकडने दोन शतकं ठोकली आणि एका पार्टीत लिंडवॉलला विचारलं, ‘आता ठीक आहे ना बॅकलिफ्ट?’ असे किस्से बरंच शिकवत असतात.
पृथ्वी शॉने त्याच्या फटक्यांची सुबत्ता पहिल्याच खेळीत दाखवून दिली. बॅकफूट, फ्रंटफूट, कव्हर ड्राइव्ह, स्ट्रेट ड्राइव्ह, ग्लान्स, फ्लिक वगैरे अनेक फटके दाखवले. बॅकफूट खेळताना त्याने क्रिजचा वापर चांगला केला. फ्रंटफूटवर जाताना डोकं चेंडूच्या जास्तीत जास्त जवळ जाईल हे पाहिलं. नव्वदीतून शतकाकडे जाताना फारशी रहदारी नसलेल्या रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगवरून जाणं तितक्या सहज आणि सुरक्षितरीत्या गेला. शतकही त्याच्या अंगवळणी पडलेली गोष्ट वाटली. त्याच्या शारीरिक वयाच्या पलीकडची एक प्रगल्भ खेळी तो खेळला. त्या खेळीचा टेम्पो फरसा बदलला नाही. तो अडखळला नाही. त्याला खरचटलं नाही. पूर्वी क्लायमॅक्सला आल्यावर कधी तरी फिल्म टुटायची तशी पुढे काय? ही उत्कंठा वाटत असताना फिल्म तुटली.
तो नव्या मनूचा शिपाई आहे. हटन, मर्चंट, गावसकरची आघाडीच्या फलंदाजीची शाश्वत शैली आता राहिली नाही. म्हणून तर चेंडू स्विंग झाला किंवा उसळला की त्यांची आठवण येते. जयसूर्या, हेडन, सेहवागने एक वेगळीच शाळा सुरू केली. आधुनिक फलंदाजांना ही शाळा आकर्षित करते. पृथ्वी शॉने दोन्ही शाळांतलं चांगलं उचलावं.
नुकतंच तांबडं फुटलंय, अजून किरणं सोनेरीही व्हायचे आहेत. त्यामुळे दिवस कसा जाणार याचा अंदाज नको. त्या फुटलेल्या तांबडय़ाच्या नावानेच शॅम्पेन फोडूया.



























































