इतिहासाच्या पानातून – मानवी वृत्तीतला विरोधाभास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ऍड. प्रतीक राजूरकर

परिस्थिती माणसाकडून काय करवून घेईल याचा काहीच नेम नसतो. 1884 साली घडलेल्या एका घटनेने कायदा, राजसत्ता आणि जनतेला हादरवून सोडले. कायद्याच्या इतिहासात आजही जगभरात त्या घटनेचा संदर्भ दिला जातो. मानवी आयुष्यातील मनोविज्ञानाची परीक्षा घेणारी ती घटना कायद्याने अमानवीय ठरवली. त्याविरोधात नागरिकांनी आपला रोष प्रकट केल्याने तत्कालीन सत्ताधीश असलेल्या इंग्लंडच्या राणीला जनमताचा आदर करण्यास भाग पाडले. कायदा हा जनतेसाठी असतो, परंतु जेव्हा जनताच त्याविरोधात उभी ठाकते तेव्हा न्यायालय, राज्यकर्त्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ ठरते. सवाशे वर्षांपूर्वी घडलेली घटना त्याची प्रचीती देणारी आहे. काळ कुठलाही असला तरी जनमताचा प्रभाव हा सदासर्वकाळ वरचढ ठरत आला आहे. इतिहासाच्या पानातील दुर्मिळातील दुर्मिळ प्रसंग म्हणून या घटनेची नोंद आहे. त्याला दोन बाजू आहेत, मतमतांतरे असू शकतील, परंतु वास्तव स्वीकारावेच लागेल.

पूर्वीच्या काळी परदेशात जायला फारशी साधने अस्तित्वात नव्हती. प्रवासासाठी  समुद्रमार्ग हाच काय तो प्रशस्त मार्ग म्हणून वापरला जायचा. मे 1884 साली चार व्यक्ती व्यापारासाठी इंग्लंडच्या साऊथहॅम्पटन शहरातून ऑस्ट्रेलिया, सिडनीला जाण्यास एका जहाजातून निघाले. टॉम डुडली, एडविन स्टीफन्स, एडमंड ब्रुक्स व रिचर्ड पार्कर यांच्या 15 हजार मैलांचा समुद्र प्रवासाला सुरुवात झाली. साधारणपणे 1600 मैलांचा प्रवास झाल्यावर जुलै महिन्यात त्यांच्या वाटेत प्रचंड मोठे समुद्री वादळ येऊन थडकले. ते प्रवास करत असलेले जहाज क्षतिग्रस्त झाल्याने चौघांनी जहाजातील एका लहान बोटीच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रवास सुरू केला. लहान बोट 13 फूट लांब होती. लहान फारसे सामान नेता येण्यासारखी परिस्थिती नव्हती. समोर आलेल्या बिकट प्रसंगात जे काही मोजके सामान हाती आले, ते घेऊन चौघे समुद्रातून वाट काढू लागले.

अनेक दिवस उलटूनही चौघांना कुठलीच वाट दिसत नव्हती. सोबतचे सर्व अन्नधान्य संपू लागले. अगदी पावसाच्या पाण्यावर तहान भागवावी लागत होती. उपासमारीनं प्रचंड तहानलेले जीव 13 फूट बोटीत दिवसरात्र काढू लागले. बोटीतील रिचर्ड पार्कर नामक तरुणाची प्रकृती खालावल्याने त्याची शुध्द हरपली. रिचर्डच्या तुलनेत इतर तिघांची प्रकृती बरी असली तरी खालावत होती. उद्भवलेल्या प्रतिकूल परिस्थितीत प्रत्येक व्यक्ती हा स्वतःचा मृत्यू समोर बघत होता. जगायचे तर अन्नाशिवाय पर्याय नव्हता. अखेर मृतप्राय झालेल्या रिचर्ड पार्करच्या मानेवर वार करत डुडलीने त्याला ठार केले. पुढचे 4-5 दिवस तिघेही  मृतदेहाच्या भक्षणावर जिवंत होते व रक्त पिऊन आपली तहान भागवत होते. अखेर एक जर्मन जहाज तिघांच्या मदतीला आल्याने तिघे आपल्या मायदेशी परतले.

सप्टेंबर महिन्यात मायदेशी परतल्यावर तिघांनी घडलेला प्रसंग बंदरावरील पोलिसांना कथन केला. प्रकरणात अटर्नी जनरल कार्यालयातून  कायदेशीर सल्ला घेतला गेला. ब्रुक्सने रिचर्डच्या हत्येला सहमती दिली नसल्याने  डुडली व स्टीफन्सविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला. नोव्हेंबर महिन्यात प्रत्यक्ष खटल्यास सुरुवात झाली. ज्युरींनी साक्षीपुरावे ऐकल्यावर डुडली व स्टीफन्सच्या प्रति सहानुभूती दर्शविली. मात्र हत्येचा गुन्हा योग्य की अयोग्य यावर मतप्रदर्शन करायचे टाळले. हत्येचा गुन्हा असल्याने दंडाधिकारी बॅरन हडलस्टॉन यांनी प्रकरण वरिष्ठ न्यायालयाकडे वर्ग केले. डिसेंबर महिन्यात वरिष्ठ न्यायालयात खटला सुरू झाला. आरोपी डुडली व स्टीफन्ससाठी वकिलाच्या मानधनासाठी लोकवर्गणीतून पैसे उभे करण्यात आले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून वरिष्ठ न्यायालयाने दोन्ही आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.

न्यायाधीश कॉलरिड्ज यांच्या मते आरोपींनी पार्करची हत्या ते समुद्री वादळातून वाचतील या आशेवर करण्यात केली होती. पार्करच्या हत्येनंतर जहाज आले असते अथवा नसतेही, परंतु जहाज येईलच याची कुठल्याही आरोपीला खात्री नव्हती याकडे निकालात लक्ष वेधले. पार्करकडून कुठलीही हिंसा झाली नव्हती. त्यामुळे केवळ आरोपींची गरज म्हणून त्याची झालेली हत्या ही मृत्युदंडाच्या गुह्यास पात्र ठरत असल्याचे न्यायालयाचे मत होते. आपल्या निकालपत्रात न्यायाधीश कॉलरिड्ज यांनी केलेली काही निरीक्षणे अतिशय कमी शब्दांत मोठा संदेश देणारी आहेत. निकालपत्रात एका ठिकाणी ते लिहितात, कायदा आणि नैतिकता समान नाही. अनेक बाबी अशा आहेत, ज्या अनैतिक असूनही बेकायदेशीर असतीलच असे नाही, परंतु कायदा आणि नैतिकतेची फारकत करणे ही गंभीर परिणामांची नांदी ठरेल. कायद्याच्या जागतिक इतिहासातले एक सर्वोत्तम निकालपत्र म्हणून निश्चितच राणी विरुद्ध डुडली या खटल्यातील निकालाचा उल्लेख करावा लागेल. न्यायाधीशांच्या निकालाने जनता मात्र समाधानी नव्हती. डुडली व स्टीफन्स…दोघांच्या बाजूने जनतेची प्रचंड सहानुभूती तर सरकार न्यायालयाच्या विरोधात मोठय़ा प्रमाणात रोष होता. प्रकरणाचे गांभीर्य बघता राणीच्या कार्यालयाने डुडली व स्टीफन्सच्या शिक्षेत कपात केली. सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा भोगल्यावर दोघांची सुटका करण्यात आली.

युरोपातील प्रत्येक विधी महाविद्यालयात राणी विरुद्ध डुडली हा खटला आवर्जून शिकविला जातो. वास्तविक हा प्रसंग केवळ विधी क्षेत्रापुरता मर्यादित नाही. मानवी जीवनातील अनेक पैलू या घटनेने समोर येतात. विशिष्ट अथवा प्रतिकूल परिस्थितीत मानवाची वैचारिक पातळी किती टोकाचा निर्णय घेऊ शकते याचे हा प्रसंग उदाहरण आहे. एकीकडे मानवाच्या अमानवीय कृत्याचा चेहरा या घटनेतून समोर येतो, तर दुसरीकडे याच अमानवीय कृत्याला झालेली मृत्युदंडाची शिक्षा रद्द व्हावी म्हणून मानवतेची भूमिका घेणारी वृत्ती अधिक प्रकर्षाने समोर येते. कायदा त्याच्या जागी श्रेष्ठ ठरतो, तर मानवतेची वृत्ती सदैव वरचढ ठरते.

 [email protected]