
शशिकांत सावंत << shashibooks @gmail.com >>
ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या चित्रांचे प्रदर्शन नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये मुंबईत भरले आहे. यानिमित्त प्रभाकर बरवे यांची चित्रशैली व त्यावरील प्रभाव याचा वेध घेणारा लेख.
प्रभाकर बरवे यांच्या चित्रांचं सिंहावलोकन प्रदर्शन एनजीएमच्या म्हणजे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये मुंबईत भरले आहे. 8 मार्चपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. पाच मजली भव्य असे हे प्रदर्शन म्हणजे चित्रशैलीतील एक विलक्षण ठेवा असून प्रत्येक कलारसिकांनी आणि विद्यार्थ्यांनी ते पाहायला हवेच असे प्रदर्शन आहे. प्रभाकर बरवे यांच्या कामावर प्रेम करणाऱ्या जेसल ठक्कर, माधव इमारते, दिलीप रानडे यांसारख्या मंडळींनी एकत्र येऊन एक महिन्याच्या मेहनतीने हे प्रदर्शन उभारलं आहे.
प्रभाकर बरवे यांची अनेक गाजलेली चित्रे जी केवळ पुस्तकातूनच पाहायला मिळतात, ती या प्रदर्शनाच्या निमित्ताने नक्कीच पाहता येतील. उदाहरणार्थ अल्फाबेटस् ऑफ नेचर किंवा पलीकडचा किनारा, त्यांची अगदी स्कूलमध्ये शिकतानाच्या काळातली चित्रं, विव्हर्स सर्विस सेंटरमधून त्यांनी केलेले काही काम तसेच पॉल क्ली वगैरेच्या प्रभावातून केलेले 1962 च्या दशकातील काम किंवा तांत्रिक प्रभावाची जाणीव करून देणारी चित्रे आणि नंतर ऐंशी-नव्वदच्या दशकात त्यांनी केलेले कॅनव्हास आणि वॉटर कलर्स याबाबतचे काम अशी विलक्षण मेजवानी देणारे हे प्रदर्शन आहे .
बरवे यांच्या वर्षानुवर्षे लिहिलेल्या डायरीमधील काही मजकूरही इथे वाचायला मिळतो. त्यांच्या डायरीतील असा मजकूर इथे मोठा करून लावण्यात आला आहे. बरवे यांच्या आधीच्या निवडक लेखांचे पुस्तक म्हणजे कोरा कॅनव्हास. नंतरच्या काळातील डायरीमधील मजकूर व इतर संपादित मजकूर असणारे पुस्तक नुकतेच प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात आले. अभिजित रणदिवे, माधव इमारते, हेमंत कर्णिक इत्यादींनी हे पुस्तक संपादित केले आहे. प्रभाकर बरवे यांचे नाव प्रामुख्याने मराठी वाचकांना माहीत झाले ते ‘कोरा कॅनव्हास’ या पुस्तकातून. खरंतर वासुदेव गायतोंडे, अरुण कोलटकर यासारखे जागतिक कलावंत मराठी रसिकांना माहीत नसतात हे कटू असले तरी सत्य आहे. त्यामुळे अशी प्रदर्शने अधिक व्हायला हवीत.
प्रभाकर बरवे हे एक गंभीर प्रवृत्तीचे चित्रकार होते. 1962 साली जे. जे. स्कूलमधून बाहेर पडले तेव्हा अर्थातच जागतिक चित्रकला आणि त्यात आपले स्थान काय हे तेव्हाच्या चित्रकारांना पडणारे प्रश्न त्यांनाही पडले होते. त्यावेळी पॉल क्ली सारख्या चित्रकारामुळे ते प्रभावित झाले. शंकर पळशीकर, गायतोंडे यांच्यावरही पॉल क्लीचा प्रभाव होताच. मात्र बरवे आणि पॉल क्ली यांच्यात विलक्षण साम्य दिसून येतं. हे दोघेही साठ वर्षे जगले. दोघांनी अनेक वर्षे डायरी लिहिली. दोघे गंभीर प्रवृत्तीचे चित्रकार होते. दोघांच्या चित्रशैलीतही हे साम्य दिसून येतं. दोघेही केवळ रंग आणि आकार किंवा अर्धा आकार म्हणजे ओळखता येण्यासारखे आकार वापरून चित्र काढत. मात्र पॉल क्लीने अनेक वर्षे बाऊहाऊस स्कूलमध्ये शिकवले तसे काही बरवे यांनी कधी शिकवलं नसलं तरी त्यांची खासगी शाळा म्हणजे क्लासेस नव्हे तर खासगी विद्यापीठ चालू होतं.
अनेक विद्यार्थी आणि चित्रकार त्यांच्याकडे आपली चित्रं घेऊन जात आणि तासन्तास चर्चा करत. कधी कधी सकाळी 11 पासून सुरू होणारी ही बैठक सायंकाळच्या जेवणापर्यंत चालत असे. त्यांनी अनेक चर्चा केल्या. पुढच्या पिढीतल्या अतुल दोडियासारखा चित्रकार असेल किंवा अगदी नव्या पिढीतील संजय सावंत, प्रकाश वाघमारे, सतीश वावरे नियमितपणे त्यांना भेटत. अलीकडचा राजाराम होलेसारखा यशस्वी पण त्यांना कधी न भेटलेला कलावंत सांगतो की, जेव्हा प्रभाकर बरवे गेले तेव्हा आमच्या शाळेत बोर्डावर त्यांची बातमी लावली होती. त्यामुळे मला असा एक चित्रकार आहे हे कळलं आणि जेव्हा मी त्यांची चित्रं पाहिलं तेव्हा अल्फाबेटस् ऑफ नेचर या संकल्पनेनेच मी झपाटून गेलो. बरवेंनी याप्रकारे अनेक चित्रकारांना आपले विचार मांडायला किंवा स्पष्ट करून घ्यायला शिकवले.
बरवेंनी स्कूलमधून बाहेर पडल्यावर काही पुस्तकांची मुखपृष्ठंही तयार केली. त्यांना स्वतंत्र राहून चित्रकार व्हायचे होते, पण ते शक्य नाही असं कळल्यावर त्यांनी पुपुल जयकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या विव्हर्स सर्विस सेंटरमध्ये नोकरी केली. जवळपास वीस ते तीस वर्षे त्यांनी नोकरी केली. प्रामुख्याने हिंदुस्थानी विणकरांना काम देण्यासाठी आणि कौशल्य दाखवण्यासाठी, चित्रकारांनी साहाय्य करून ती उत्पादने विकावीत ही या सेंटरच्या कामाची संकल्पना होती. बरवेंनी यासाठी विलक्षण काम केलं.
नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट गॅलरीतील प्रदर्शनात तांत्रिक आकार दिसतात. यात वरच्या मजल्यावर विव्हर्स सर्विस सेंटरमधल्या कामासाठी वापरलेल्या प्रतिमा आणि त्यांनी केलेल्या रचना किंवा पडद्यासारखे कामही दिसते. त्यांनी तयार केलेले अनेक साचे रंग लावून चित्र तयार करत होते तेही इथे दिसतात.
प्रदर्शनाच्या वरच्या भागात त्यांनी शेवटच्या काळात केलेली केमोल्ड आर्ट गॅलरीतील प्रदर्शनात दाखवलेली कागदावरची चित्रे दिसतात. हे त्यांचे शेवटचे प्रदर्शन होते. स्टेडलरच्या वॉटर कलर पेन्सिल्स आणि वॉटर कलर वापरून ते कागदावर चित्रं तयार करत. त्यांच्या कॅनव्हासमध्ये नीटनेटकेपणा आणि संतुलन आढळते जे कागदावरील चित्रांमध्ये आढळत नाही. किंबहुना इथे त्यांनी खूप स्वातंत्र्य घेतलेले दिसून येतं. लिफाफा, पानं, निसर्गातले सहज आकार असे साधेच विषय त्या चित्रात असले तरी त्याच्या रेंडरिंगमध्ये त्यांनी प्रयोग केलेले आढळतात. प्लॅस्टिकवर रंग लावून ते अनेकदा तो घासल्यासारखा करून काहीसा एक प्रकारचा मुक्तपणाही या चित्रांमध्ये आढळतो.
मला आठवते या चित्रांबद्दल बरवेंनी काही आठवणी सांगितल्या होत्या. ते म्हणाले होते की, ‘ही सगळी चित्रे विकली गेली आहेत असे त्यांनी मित्रांना म्हटल्यावर विकली गेलीत म्हणजे चांगली आहेत असे नाही, असे मित्रांनी म्हटले. त्यावर बरवेंची प्रतिक्रिया होती की, पण विकली गेली आहेत म्हणजे वाईट आहेत असेही नाही.
बरवे मित्रांना नेहमीच आपली चित्रं दाखवत आणि एखादं चित्र रिपीट वाटतेय असे म्हटल्यावर ते फाडून टाकत. एकदा विकल्या गेलेल्या चित्रासारखे चित्र काढून द्या असे कुणीतरी म्हटल्यावर त्यांनी नकार दिला व म्हणाले की, एका चित्राला एकच जन्म असतो. चित्रच नव्हे तर जगणे आणि त्यातील सौंदर्य, विकार, वेदना या साऱ्याबद्दल ते विलक्षण सजग होते. त्यांच्या डायऱ्या वाचताना आणि चित्रे पाहताना याची सतत प्रचीती येते.

































































