लेख – स्वागत दिवाळी अंकांचे (भाग – 2)

612

लीलाई

यंदाच्या या दिवाळी अंकात  ‘जगणं विशीतलं’ या परिसंवादात डॉ. स्नेहलता देशमुख, चिन्मय मांडलेकर, डॉ. गिरीश कुलकर्णी-प्राजक्ता कुलकर्णी, स्नेहा दुबे-पंडित या मान्यवरांचं विशीतलं जगणं कसं होतं याविषयी माधुरी महाशब्दे यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे. तसेच निर्मिती क्षेत्रातील संजय जाधव, अशोक हांडे, प्रसाद कांबळी या मान्यवरांच्या विचारांचा, जाणिवांचा ज्योती निसळ यांनी घेतलेला परामर्षही वाचनीय आहे. काव्यदालन प्रवीण दवणे, अशोक बागवे, महेश केळूसकर, सिसिलिया कार्व्हालो, सीमंतिनी जोशी, मंगेश विश्वासराव अशा अनेक मान्यवरांनी समृद्ध केले आहे. ज्योती चौधरी मलिक यांनी चितारलेले स्वरांगिनी सरस्वतीचे देखणे मुखपृष्ठ अंकाची शोभा वाढविणारे!

संपादक – पूजा अनिलराज रोकडे

पृष्ठs 188, मूल्य – 180 रु.

विवेक

या दिवाळी अंकात वैचारिक, राजकीय, विज्ञान, ललित, कथा, कविता, सामाजिक अशा विविध विषयांशी संबंधित लेखनाचा अंतर्भाव आहे. रंगा हरीजी यांनी हिंदुस्थानी स्त्र्ााr जीवनाचा घेतलेला वेध, दिलीप करंबेळकर यांनी स्पिनोझा या तत्त्ववेत्त्याशी करून दिलेली ओळख वाचनीय आहे. भाऊ तोरसेकर यांनी ‘नया कश्मीर…’ या लेखातून 370 आणि 35 अ कलम हटवल्याने त्याचे होणारे दूरगामी परिणाम यावर भाष्य केले आहे. ‘बदलतं मुस्लिम मानस’ या लेखात भाजपप्रणीत सरकारविषयी मुस्लिमांची काय मतं आहेत याविषयी अहमद शेख यांनी सांगितले आहे. जीवतंत्रज्ञानाने आजच्या माणसांसमोर ज्या समस्या निर्माण केल्या आहेत त्याचं दर्शन डॉ. बाळ फोंडके यांनी वाचकांना घडवलं आहे. कथादालन मंगला गोडबोले, विनया पिंपळे आदींनी सजवलेय तर आशयघन कवितांनी कवितेचा विभाग खुलला आहे.

लेख – स्वागत दिवाळी अंकाचे

कार्यकारी संपादक – अश्विनी मयेकर

पृष्ठs 382, मूल्य – 200 रु.

माझे पुण्यभूषण

पुण्यातल्या विविध विषयांवर तज्ञ लेखकांचे सकस लेखन या अंकात आहे. विद्येचं माहेरघर, पूर्वेचं ऑक्सफर्ड आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही बिरुदं पुण्याने कशी पटकावली याचा  इतिहास मांडणारा संतोष शेणई यांचा अभ्यासपूर्ण लेख या अंकाचे वैशिष्टय़ आहे. बुक कॅफे (जुई कुलकर्णी), मुस्लिम खाद्यरसनेची लज्जतदार सफर (आशीष चांदोरकर, मल्याळी पुणेकर (राजीव साबडे), प्रभात फिल्म कंपनीची नव्वदी (अनिल दामले), एक होती प्रभातनगरी (पु. ल. देशपांडे), देवळांचं पुणं (अविनाश सोवनी), पारसी घरात हिंदू मंदिर (गुरुदास नूलकर), निसर्गसखी हेमा साने (कौस्तुभ मुद्गल) यासह अंकातील सर्वच लेख माहितीचा खजिना असणारे आहेत. आकर्षक मांडणी, उत्तम छपाई, पुणे शहराचे विहंगम दर्शन घडविणारी नेत्रदीपक छायाचित्रे अशा वैशिष्टय़ांनी नटलेला हा अंक संग्रही ठेवावा असाच आहे.

संपादक – सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी

पृष्ठs 216, मूल्य – 200 रु.

diwali-ank1

दर्यावर्दी

या अंकात माशांच्या दुर्मिळ जाती (शुभदा पेडणेकर), सागरी वनस्पती (डॉ. बा. गो. कुलकर्णी), महाराष्ट्रातील मत्स्यतज्ञ संशोधक (हरेश्वर मर्दे), लेह, लडाख व कारगील सफर (प्रवीण सारंग), प्लॅस्टिकचा पुनर्वापर  तसेच हिरव्या खेकडय़ांचे संवर्धन (प्रा. डॉ. सूर्यकांत येरागी) हे लेख माहितीपूर्ण आहेत. याशिवाय कोकणातील पर्यटन, कीर्तनातील विनोदी किस्से, औषधी मासे, महिला एक आदिशक्ती आदी विषयांतील संबंधित माहिती अंकात आहे. विशेषांकाला साजेसे मुखपृष्ठ लक्षवेधी आहे.

संपादक – अमोल सरतांडेल

पृष्ठs 132, मूल्य – 90 रु.

स्वप्ना

हा दिवाळी अंक यंदा ‘कथा विशेषांक’ म्हणून प्रकाशित झाला आहे. अंकात आचार्य प्र. के. अत्रे, भा. ल. महाबळ, श्याम भुर्के, अनुराधा गुरव, सुरेखा पेंडसे, मिलिंद पानसरे, सु. वि. पारखी आदींच्या रंजक कथा असून प्रा. वैजनाथ महाजन, विश्वास गेंड यांचे माहितीपूर्ण लेख आहेत. याशिवाय चंद्रशेखर पटवर्धन, संगीता भूमकर, दत्तात्रय जोशी, राजेंद्र वैद्य, अनुजा पाटील आदींच्या कविता आहेत. वात्रटिका, विनोद, व्यंगचित्रे यांची रेलचेल आहे.

संपादक –  वि. द. बर्वे

पृष्ठs 264, मूल्य – 120 रु.

आपली प्रतिक्रिया द्या