लेख – स्वागत दिवाळी अंकाचे

6959

युगांतर

यंदाच्या या दिवाळी अंकात विविधअंगी वैचारिक मेजवानी देणारे लेख आहेत. ‘सुवर्णयुग’ आणि ‘सैराट’ या गाजलेल्या चित्रपटांच्या निमित्ताने दत्ता देसाई यांनी मांडलेला नवा वर्गीय दृष्टिकोन, माजी पोलीस महासंचालक उद्धव कांबळे यांनी फॅसिझमचा घेतलेला आढावा हे वैचारिक लेख वाचनीय आहेत. हेमंत देसाई व संजय चिटणीस यांचे कश्मीर प्रश्नाचा वेध घेणारे लेख आहेत. कैफी आझमी व अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या कर्तृत्वाचा व लेखनाचा आढावा घेणारा लक्ष्मीकांत देशमुख यांचा लेख उल्लेखनीय झाला आहे. याशिवाय पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावकर यांचा तसेच आर्थिक विषयांची उत्तम मांडणी करणारे डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रा. अमित नारकर व देवीदास तुळजापूरकर यांचे लेख आहेत. पत्रकार बी. व्ही. जोंधळे यांनी राखीव जागा व ऍट्रॉसिटीचा कायदा यावर उपस्थित झालेल्या प्रश्नांचा ऊहापोह केला आहे.

संपादक – डॉ. भालचंद्र कानगो

पृष्ठs 228, मूल्य – 120 रु.

मौज

मौज’चा दिवाळी अंक यंदाही दिमाखात प्रसिद्ध झाला आहे. यंदाच्या अंकात व्यक्तिचित्रात्मक, वाङ्मयीन, अभिजात कलांविषयक, प्रवास वर्णनात्मक, ललित असे विविध शैलीतले दर्जेदार लेख आहेत. गांधींच्या मित्राची गोष्ट (अंबरिश मिश्र), स्वातंत्र्याचा सशक्त आवाज (शिवकन्या शशी), एक विश्व वंचितांचं (समीर गायकवाड), वृत्तपत्र इतिहासातील दोन मैलाचे दगड (निळू दामले) हे लेख विचारप्रवृत्त करणारे आहेत. महेश एलकुंचवार यांचा जीवनाची स्पंदन टिपणारा लेख, इराणसारख्या मुस्लिम देशाबद्दलचा मनीषा टिकेकर यांचा अभ्यासपूर्ण लेख वाचनीय आहे. कथा विभाग प्रणव सखदेव, विलास केळसकर, आशा बगे यांच्या कथांनी सजला आहे. कविता विभागात ज्येष्ठ तसेच समकालीन कवींच्या कवितांचा सहभाग आहे. अंकाचे कलात्मक मुखपृष्ठ मार्क शगाल या रशियन चित्रकाराचे असून या चित्रकाराच्या चित्रांची वैशिष्टय़े उलगडून दाखवणारा प्रभाकर कोलते यांचा लेखही अप्रतिम.

संपादक – मोनिका गजेंद्रगडकर

पृष्ठs 266, मूल्य – 250 रु.

प्रतिबिंब

diwali-ank1

या दिवाळी अंकाने अल्पावधीतच वाचकांना दखल घ्यायला भाग पाडले आहे. महाराष्ट्राच्या पुराविषयीचा ऊहापोह अंकात आहे. मोबाईल वापराचे चांगले वाईट परिणामांविषयी सायकॉलॉजिस्ट, पोलीस अधिकारी, पत्रकार, साहित्यिक, कवी यांचा दृष्टिकोन वाचायला मिळेल. याशिवाय कश्मीरची नवी वाट (सारंग दर्शने), तलाकबंदी (प्रा. डॉ. शामसुद्दिन तांबोळी), किक डिजिटल मीडियाची (किशोर गायकवाड), हॅकिंगचा विळखा (रिझवान शेख), स्क्रिन टाईम- नवं कोकेन (डॉ. अमोल अन्नदाते) हे लेख विचारप्रवृत्त करणारे आहेत. अवकाशातील भारतीय तारका (निरंजन घाटे) हा महिला शास्त्रज्ञांच्या कार्यकर्तृत्वाविषयी माहिती देणारा लेख उत्तम आहे. चंद्रशेखर मुरगुडकर यांनी ‘कॅपरनम’ या परदेशी चित्रपटाचे केलेले सर्वांगीण शब्दचित्रण मन सुन्न करणारे असेच आहे. याशिवाय विज्ञान, क्रीडा, पर्यटन, कथा, आरोग्य आणि सौंदर्य हे विभागही लक्षणीय आहेत.

संपादक – प्रज्ञा जांभेकर

पृष्ठs 202, मूल्य – 200 रु.

ग्रहवेध

यंदाच्या अंकात सद्गुरू तुकाराम चैतन्य (प्रा. शरयू जाखडी), विवेक चुडामणी (वामन देशपांडे), विवाह ज्योतिष (डॉ. मधुसूदन घाणेकर), महादशा व त्यांचे भारतावरील परिणाम (क्षितिज मुंबईकर), ओंकार मातृका विलक्षण अनुभूती (प्रकाश प्रसादे), भारतातील पहिली महिला डॉक्टर – डॉ. आनंदी गोपाळ (अमिता नेवे), चांद्रयान – 2 ज्योतिषाच्या दुर्बिणीतून (चित्तरंजन कुलकर्णी), ज्योतिषशास्त्र एक वैज्ञानिक दृष्टिकोन (डॉ. निमाई बॅनर्जी) यांचे माहितीपूर्ण लेख आहेत. लता मंगेशकर व मधुबाला यांच्या कारकीर्दीला यशस्वी वळण देणाऱ्या ‘महल’ चित्रपटाविषयी प्रकाश अकोलकर यांनी लिहिलेला लेख व संगीतकार गायक हेमंतकुमार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अभय जोशी यांच्या लेखाचा समावेश आहे.

संपादक – डॉ. उदय मुळगुंद

पृष्ठs 152, मूल्य – 125 रु.

धर्मभास्कर

सुवर्ण महोत्सवाकडे झेप घेणाऱ्या यंदाच्या या दिवाळी अंकात संत ज्ञानेश्वरांचे ‘पसायदान’ (शंकर अभ्यंकर), जालियनवाला बाग (दुर्गेश परुळकर), ग्रीसवरील हिंदू संस्कृतीचा प्रभाव (वा. ना. उत्पात) हे माहितीपूर्ण लेख आहेत. याशिवाय ऍक्युप्रेशर उपचार (प्रणाली पटवर्धन), आसमान आपले झाले (विंग कमांडर अशोक मोटे), आयुर्वेद शास्त्राrय जातकर्म उपचार (वैद्य शुभदा पटवर्धन), दीपशिखा कालिदास (शुभांगी भडभडे) हे लेख वाचनीय आहेत. याशिवाय ललित लेख, कथा यांचाही समावेश अंकात केला आहे.

संपादक – ऋतावरी तुळापूरकर

पृष्ठs 216, मूल्य – 90 रु.

अक्षरभेट

या दिवाळी अंकात ‘जल-साहित्य’ या विषयावर मान्यवर लेखकांचे लेख समाविष्ट आहेत. एका विद्यापीठाची जलक्रांती (डॉ. व्ही. एन. शिंदे), पाणी व्यवस्थापन (डॉ. महानंद माने), जीवनाधार पाणी (प्र. अ. पुराणिक), जलक्रांती – जलयुक्त शिवार अभियान (किशोर आपटे) हे माहितीपूर्ण लेख आहेत. याशिवाय बदललेले ग्रामजीवन आणि ग्रामसंस्कृती (डॉ. द. ता. भोसले), समाजाची समानहीनता (नागेश केसरी), साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे (डॉ. शरद गायकवाड) हे लेख वाचनीय आहेत. याव्यतिरिक्त कथा, कविता व वार्षिक राशीभविष्यही आहे.

संपादक – सुभाष सूर्यवंशी

पृष्ठs 172, मूल्य – 120 रु.

आपली प्रतिक्रिया द्या