
>> योगेंद्र ठाकूर
मराठी भाषेच्या उगम इतिहासात सज्जड पुरावा म्हणजे कोरीव ताम्रपट आणि शिलालेख. त्या सर्वांवर काळाची नोंद नसली तरी त्यांच्या अक्षरांच्या वळणावरून त्या काळाची नोंद होऊ शकते. मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा जैन दिगंबर पंथीय श्रवण बेळगोळ येथील बाहुबलीच्या पायथ्याशी असलेला शके 1038-39 म्हणजेच सन 1116-17 सालातील…
श्री चावुण्ड राजे करवियलें
श्री गंगराजे सुत्ताले करवियले
अशा नोंदीचा प्रथमचा शिलालेख मानला जातो, परंतु पुरातत्त्वज्ञ डॉ. शं. गो. तुळपुळे यांच्या संशोधनाप्रमाणे रायगड जिह्यातील अलिबागजवळील अलिबाग-चौल मार्गावरील अक्षी येथील शके 934 म्हणजे सन 1012 मधील अक्षीचा शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख ठरतो. त्याला या वर्षी म्हणजे 2022 मध्ये एक हजार दहा वर्षे पूर्ण होत आहेत. मराठी भाषा कोरीव स्वरूपात एक हजार दहा वर्षांची झाली असा त्याचा अर्थ आहे.
नव्या संशोधनाप्रमाणे अक्षीचा शिलालेख मराठीतील आद्य शिलालेख असून त्यावर शके 934 म्हणजेच सन 1012 असा स्पष्ट उल्लेख आहे. शिलाहारवंशीय राजा पहिला केसीदेवराय याचा प्रधान भइर्जू सेणुई याच्या काळात म्हणजे शिलाहार काळात कोरलेला हा शिलालेख असून त्याने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य दिल्याचा यात उल्लेख आहे. हा शिलालेख संस्कृत-मराठी मिश्र देवनागरी लिपीतील असून नऊ ओळींचा आहे. त्या नऊ ओळींच्या वर चंद्र-सूर्य कोरले आहेत. खाली शापवाणीचे चित्र कोरले आहे.
गी सुष संतु। स्वस्ति ओं। पसीमसमुद्राधिपती।
त्री कोंकणा चक्रीवर्ती।
त्री केसीदेवराय । महाप्रधान
भईर्जू सेणुई तसिमीनी काले
प्रव्रतमने । सकु संवतुः 134 प्रधावी
सवसरेः अधीकू दीवे सुक्रे बौल।
भुईजुवे तथा बोडणा तथा नऊ–
कुवली अधोर्यु प्रधानु। महलषुमीची वाण।
लुनया कचली ज –
अशा नऊ ओळी त्या शिलालेखात कोरलेल्या आहेत. हा शिलालेख वाचण्यास सुरुवात पहिल्या ओळीतील ‘स्वस्ति ओ’पासून करावी लागते. कारण ‘गीं सुष संतु’ ही ओळ नवव्या शेवटच्या ओळीचा शेवटचा भाग आहे. ती ‘जगी सुष संतु’ (जगी सुख नांदो) अशी आहे. शेवटी कोरण्यास जागा न पुरल्याने ‘गी सुष संतु’ ही अक्षरे वर कोरली आहेत. ‘लुनया कचली’ हे कोरणाऱ्याचे नाव (लुनया) आहे. त्याला कोरक्या म्हणत. शिलालेखात कोरलेल्या मराठीतील पहिल्या नऊ ओळींचा अर्थ असा- कल्याण होओ. पश्चिम समुद्राधिपती श्री कोकण चक्रवर्ती, केसीदेवराय याचा महाप्रधान भईर्जू सेणुई याने शक संवत 934 प्रभव संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी भईर्जूने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली (मापे) धान्य नेमून दिले. जगी सुख नांदो.
या नऊ ओळींच्या खाली ओणवी स्त्री व त्यावर आरूढ गाढव असे चित्र कोरले आहे. ही शापवाणी असून ‘हे शासन कुणी भंग करील त्याची माय गाढवे झविजे’ असा तो शाप आहे. त्यास ‘गधेगाळ’ असे म्हणतात. अशा गधेगाळी बहुतेक सर्व मराठी शिलालेखांच्या खाली सचित्र कोरलेल्या आहेत. त्यामुळेच की काय, हे शिलालेख आजपर्यंत पाहण्याचे राहिले आहेत. (संदर्भ/आधार – ‘प्राचीन मराठी कोरीव लेख’ – संपादक डॉ. शं. गो. तुळपुळे.)
आपली मायमराठी पाचव्या-सहाव्या शतकापासून व्यवहारात होती आणि ‘‘दिण्णले, गहिल्ले, उल्लविरे तत्थ मरहठ्ठे’’ असे बोलणाऱ्या मराठी माणसाचे वर्ण ‘कुवलयमाला’ ग्रंथात आठव्या शतकात येते. यावरून त्या वेळी मराठी भाषा प्राकृत अर्थात अपभ्रंशीय स्वरूपात लोकव्यवहारात होतीच हे सिद्ध होते. मराठी भाषेच्या इतिहासात 1290 मधील ‘ज्ञानेश्वरी’ हा पद्य ग्रंथ आपण सर्वमान्य असा लिखित स्वरूपात प्रथमचा मानतो, पण त्याआधी 1188चा मुकुंदराजाचा ‘विवेकसिंधू’ ग्रंथ येतो, तर गद्य ग्रंथांत महानुभाव पंथीय ग्रंथ प्रथमचे येतात. मराठी भाषा ही संस्कृतपासून जन्माला आली नाही, तर ती महाराष्ट्रीय प्राकृत या नावाने वैदिक काळापासून चालत आली आहे. नाणेघाटात सापडलेल्या ब्राह्मी भाषेतील शिलालेखात ‘मऱहाठी लोक’ असा उल्लेख आढळतो. पैठणच्या हाल या राजाने सुमारे 2000 वर्षांपूर्वी 50 कवींच्या कविता संकलन ‘गाथा सप्तशती’मध्ये संकलित केल्या आहेत. सातवाहन वंशाचे राज्य महाराष्ट्रावर इ. पू. 250 पासून होते. या सातवाहनाचे नाणेघाट, कारला, कान्हेरी, नाशिक येथील सर्व शिलालेख महाराष्ट्रात प्राकृतात केले आहेत. पुरातत्त्व संशोधक डॉ. शं. गो. तुळपुळे यांच्या संशोधनाप्रमाणे अक्षी (रायगड) येथील 1012 सालचा अक्षीचा शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख ठरतो.



























































