बीच प्लीज- मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ करणारी संस्था

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

 

 

‘आम्हाला पर्यावरणाचे रक्षण करायचे नाही, तर आम्हाला असे वातावरण निर्माण करायचे आहे की, जिथे पर्यावरणाला संरक्षणाची गरज नाही…’ ही भावना बाळगणारी दादर येथील ‘बीच प्लीज’ ही संस्था गेली सात वर्षे सातत्याने मुंबईतील समुद्रकिनारे आणि नवी मुंबईतील खारफुटीचे जंगल स्वच्छ करण्याचे मोलाचे कार्य करत आहे.

 

दादरमधील मल्हार कळंबे या तरुणाने सप्टेंबर 2017 मध्ये वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ‘बीच प्लीज’ या संस्थेची स्थापना केली. ‘बीच क्लीन-अप ड्राइव्ह’ हा उपक्रम राबवतानाच आपले पर्यावरण स्वच्छ आणि हरित बनवण्यासाठी हजारो लोकांना एकत्र आणणे, यापेक्षाही एक करणे हे संस्थेचे ध्येय आहे.

‘बीच प्लीज’च्या स्थापनेविषयी मल्हार म्हणाला, ‘‘जून 2017 ला मी बालीला फिरायला गेलो असताना तेथील अतिशय स्वच्छ समुद्रकिनारे पाहून आपल्याकडेही असे सागरीकिनारे का नाहीत? असा प्रश्न मला पडला. घरी परतल्यावर मी आईशी यावर गंभीरपणे चर्चा केली. माझी याविषयीची तगमग पाहून आईने ‘‘तुला असे वाटते तर फक्त बोलू नकोस, तर तिथे जाऊन स्वतः साफ कर’’ असा सल्ला दिला. मला तो मनोमन पटला आणि माझ्या शालेय मित्रमैत्रिणींसमोर मी ‘बीच क्लीन-अप ड्राइव्ह’ ही संकल्पना मांडली. यातूनच पुढे ही संस्था उदयाला आली.’’

सर्वप्रथम मल्हार आणि त्याच्या वीसेक मित्रांनी दादर चौपाटीचा समुद्रकिनारा स्वच्छ केला. मात्र दुसऱया दिवशी चौपाटीवर गेल्यावर पुन्हा तिथे कचरा साठलेला दिसला. तेव्हा मल्हारच्या लक्षात आले की, प्रत्येक वेळी भरतीबरोबर अधिकाधिक कचरा येतो आणि साचत जातो. त्यामुळे दर रविवारी समुद्रकिनारे स्वच्छ करण्याची मोहीमच त्याने संस्थेच्या माध्यमातून हाती घेतली. काही काळानंतर लक्षात येत गेले की, दादर चौपाटीवर जो कचरा येतो तो मिठी नदीतून येतो. याशिवाय अभ्यासाअंती मिठी नदी मुंबईसाठी किती महत्त्वाची आहे हे लक्षात आल्यावर 2018 मध्ये संस्थेने सर्वप्रथम कचऱयाचे मुख्य स्रोत असलेले मिठी नदीचे घाण झालेले पात्र स्वच्छ करण्याचा उपक्रम राबवला.

मुंबईत आणि परिसरात साप्ताहिक स्वच्छता अभियान राबवण्याबरोबरच संस्था प्लॅस्टिक प्रदूषण आणि हवामान बदलाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध समाज माध्यमांचा योग्य वापर करते.

– संस्था मुंबईतील दादर समुद्रकिनारा, मिठी नदीचा काठ आणि नवी मुंबईतील खारफुटीच्या जंगलात साप्ताहिक स्वच्छता मोहीम राबवते.  शाळा, महाविद्यालये आणि स्थानिक समुदायांसोबत संवेदनशीलता कार्यक्रमदेखील आयोजित करते.

– शालेय, महाविद्यालयीन स्तरावर पर्यावरणविषयक जागृती व्हावी म्हणून संस्था झटत असून मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ करण्याच्या उपक्रमात विद्यार्थ्यांचा, तरुणांचा मोठा सहभाग असतो.

-पर्यावरण संवर्धनासाठी संस्थेने 250 हून अधिक परिसंवाद आणि कार्यशाळा  तसेच 500 हून अधिक ‘क्लीन-अप ड्राइव्ह’ उपक्रमांचे आयोजन केले आहे.

 

लाखो नागरिकांचा सहभाग

संस्थेने आतापर्यंत 297 आठवडय़ांच्या कालावधीत शहराच्या किनारपट्टीवरील आठ दशलक्ष किलोपेक्षा जास्त कचरा स्वच्छ आणि विल्हेवाट लावण्यात यशस्वीरित्या यश मिळविले आहे व मोजणी केली आहे. या कालावधीत विविध पार्श्वभूमीतील चार लाखांहून अधिक नागरिकांना या मोहिमेत सहभागी करून घेतले आहे. ‘बीच प्लीज’मध्ये मुंबई आणि नवी मुंबई मिळून एक लाख 20 हजार युवा स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग आहे. सध्या ‘बीच प्लीज’ ही संस्था तरुणांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण संवर्धनासाठी काम करणारी देशातील सर्वात मोठी संस्था आहे.