वेबसीरिज- एका स्त्रीच्या जिद्दीची कथा

>> तरंग वैद्य

एका स्त्रीने सैन्यात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगत ते प्रत्यक्षात उतरवतानाचा तिचा प्रवास, सैन्यातील प्रशिक्षणादरम्यान एका काचेच्या तुकडय़ाला पैलू पाडून त्याला हिऱयात रूपांतरित केले जाते याचे उत्तम चित्रण म्हणजे ‘द टेस्ट केस’ ही वेब मालिका. देशाभिमानाने मन प्रसन्न करणारी ही मालिका आर्वजून बघावी अशी आहे.

 

हिंदुस्थानी सैन्यदलात महिलांनी असावे की नाही? सैन्याची कडक शिस्त पाळणे त्यांना जमेल का? आपल्या भावना आवरून त्या शत्रूला यमसदनास पाठवू शकतील का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. कारण हे जग पुरुषप्रधान आहे. आपण कितीही पुढारलेले असलो तरी काही कामे फक्त पुरुषच करू शकतात या ठाम मताचे आहोत. स्त्राr पुरुषापेक्षा कमी नाही, असे आपण नुसते म्हणतो, पण काही स्त्रिया हे वाक्य शाश्वत आहे हे सिद्ध करण्यासाठी धडपडतात. अशीच एक स्त्राr हिंदुस्थानी सैन्यात जाण्यासाठी पुढे येते आणि तिच्या जिद्दीसमोर सरकारही नतमस्तक होऊन तिला सैन्यात येण्याची संधी देते. ही मुलगी यशस्वी झाली तर पुढे सैन्यात महिला तुकडी असेल, असा विचार सरकारच्या मनात येतो. त्यामुळे या मुलीकडे संरक्षण मंत्रालय एक ‘टेस्ट केस’ म्हणून पाहू लागते.

‘द टेस्ट केस’ अल्ट बालाजी या ओटीटीवर 2017-18 साली आलेली 30 मिनिटांचा अवधी असलेली 10 भागांची वेब सीरिज आहे. या वेब सीरिजची इतकी जाहिरात झाली असल्याने कदाचित ही लोकांपर्यंत तितकीशी पोहोचू शकली नाही. पण एका स्त्राrची सैन्यात भरती होण्यापासून कठीण प्रशिक्षण, सहकाऱयांचे टोमणे झेलत जिद्दीने आपले लक्ष्य गाठण्याची आणि आपण यशस्वी झालो तरच इतर मुलींसाठीही एक दालन उघडेल हे मनात ठेवून पुढे जाण्याची कथा बघितलीच पाहिजे अशी आहे. त्यामुळे ‘देर आये दुरुस्त आये’ ही म्हण लक्षात घेत ही वेब सीरिज लवकर बघा.

सैन्यात सामील झाल्यावर तेथील कठीण प्रशिक्षणाबद्दल आपण वाचले आहे, बघितलेही आहे, पण एका महिलेने घेतलेले शारीरिक परिश्रम या मालिकेत व्यवस्थित आणि सखोल पद्धतीने दाखवले आहेत. पुरुषांमध्ये एकटी असूनही धाडसाने टिकून राहणे सोपे काम नाही. त्यासाठी मानसिकदृष्टय़ा खंबीर असणे महत्त्वाचे. पद्मभूषण सुधा मूर्ती जेव्हा टाटा कंपनीत  इंजिनीअर म्हणून नोकरीस लागल्या तेव्हा तिथे महिलांसाठी प्रसाधनगृह नव्हते. कारण तिथे कामाला महिलाच नव्हत्या. अशीच परिस्थिती या मालिकेतही दाखवली आहे. प्रशिक्षणादरम्यान राहण्यासाठीचे वसतिगृह पुरुषांसाठी. एकटी स्त्राr तिथे कशी राहणार म्हणून तेथील अधिकारी तिची राहायची वेगळी व्यवस्था करतात. या दुजाभावावरून तिला सहकाऱयांकडून सतत टोमणे ऐकावे लागतात. इथे ती स्त्राr-पुरुष या भेदभावाला छेद देऊन पुरुष वसतिगृहात राहायला जाते आणि सगळ्यांची मने जिंकते.

अशा अनेक प्रसंगांसह मालिका जिद्द, ईर्ष्या, तिरस्कार, स्पर्धा या मानवी गुण-अवगुणांचे दृश्य दाखवत पुढे जाते. घडणाऱया घटनांमध्ये भावनिक प्रसंग आहेत, रोमांच आहे आणि आता पुढे काय… ही उत्सुकता कायम ठेवणारी दृश्ये आहेत, ज्यामुळे मालिका कुठेही आपली पकड सोडत नाही.

मुख्य पात्र कॅप्टन शिखा शर्माचे असून ही भूमिका अभिनेत्री निमरत कौरने यशस्वीरीत्या पेलली आहे. इथे अभिनयासह शारीरिक मेहनतही खूप होती. निमरतने इथे बाजी मारली आहे. अतुल कुलकर्णी, अनुप सोनी, राहुल देवसारख्या गुणी आणि अनुभवी अभिनेत्यांची तिला चांगली साथ लाभली आहे. संरक्षणमंत्री म्हणून जुही चावलाचा छोटा रोल आहे. अक्षय ओबेरॉय, तरुण गेहलोत, भुवन अरोरा प्रशिक्षणादरम्यान कॅप्टन शिखाचे सहकारी असून सर्वांनीच आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. ‘इक्बाल’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक नागेश कुकुनूर यांनी पहिल्या भागाचे दिग्दर्शन केले असून त्यांनी कथेला उत्तम सुरुवात दिली आहे. निर्मात्यांबरोबर काही वैचारिक मतभेद झाल्यामुळे पुढचे भाग त्यांनी दिग्दर्शित केले नाहीत, असे ऐकिवात आहे. विनय वायकूळ यांनी पुढील भागांचे दिग्दर्शन केले असून आपली पात्रता सिद्ध केली आहे.

सैन्यात जाण्याची स्वप्ने बघणे सोपे आहे, पण  सैन्यात जाण्यासाठी शारीरिक आणि मानसिक कणखरता महत्त्वाची. एका स्त्राrच्या जिद्दीची आणि स्वप्नाची कथा बघताना देशाभिमानाने मन प्रसन्न होईल हे नक्की.