
आनंद काळे… अर्थात आपले शुरवीर कोंडाजीबाबा फर्जंद. गेली अनेक वर्षे मुरलेला अस्सल अभिनेता. रसिकांच्या मनात कोंडाजीबाबा रेंगाळत असतानाच आनंद हॉलिवूडच्या दिशेने रवाना झालाय.
कोंडाजी फर्जंद ही भूमिका तुमच्याकडे कशी आली?
– या मालिकेत प्रोजेक्ट हेड समीर कवठेकर, क्रिएटिव्ह हेड सचिन गद्रे तसेच अमोल कोल्हे यांचा माझ्याशी पूर्वीपासून परिचय होता. राजा शिवछत्रपती तसेच स्वराज्यरक्षक संभाजीमध्ये मी दुसरी भूमिका साकारणार होतो. परंतु ते काही होऊ शकलं नाही. या दरम्यान मालिकेचे लेखक प्रताप गंगावणे सरांसोबत मी काम केलं होतं. त्यांनी कोंडाजी फर्जंदच्या भूमिकेबाबत विचारलं. रोल लहान असला तरी महत्त्वाचा आहे, असं सर्वांनी सांगितल्यानंतर नाही म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
एक अभिनेता म्हणून या भूमिकेचा कसा अभ्यास केला?
या व्यक्तिरेखेबाबत सांगायचे तर खूप मोहिमा फत्ते होतात. अनेक लढाया जिंकल्या जातात. त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱयांची इतिहासात नोंद होते. ही एक मोहीम अशी होती ज्यामध्ये जंजिरा हाती आला नाही; परंतु कोंडाजीने आपली अख्ख्या आयुष्याची कमाई यात लावली. सिद्धीला अशी जरब बसविली की, मराठी मुलुखातला मावळा काय असतो हे त्याला समजलं. त्यामुळे कोंडाजी बाबाचा करारीपणा, त्याची बॉडी लँग्वेज दाखवणं अधिक महत्त्वाचं होतं. यासाठी आम्ही कोल्हापुरी लहेजा ठेवला. कोंडाजी लढवय्या असल्यामुळे तो एकावेळी 15-20 जणांना सहज लोळवेल असं वाटलं पाहिजे. साधारणपणे 50-55 वयोगटातील ही व्यक्तिरेखा होती. प्रताप गंगावणे यांनी लिहिलेले अप्रतिम संवाद आणि मी दिलेला कोल्हापुरी लहेजा यामुळे खूप छान व्यक्तिरेखा साकारता आली. हे सर्व टीमवर्क आहे. माझं एकटय़ाचं असं काही नाही. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे माझी भूमिका 15-16 एपिसोडची होती. मात्र नंतर कोंडाजी बाबाची लोकप्रियता पाहता 50-55 भागापर्यंत एपिसोड करण्यात आले.
नुकताच तुम्ही एक हॉलीवूड चित्रपट केला आहे… काय सांगाल?
– ‘रिमेम्बर ऑम्निशिया’ हा एक हॉलीवूडपट आहे. या चित्रपटाच्या टीमला हिंदुस्थानात चित्रीकरण करायचं होतं त्यासाठी हे हिंदुस्थानात कोणासोबत व कुठे काम करायचं याबाबत सर्च करत होते. मी जरी अभिनेता असलो तरी एक व्यावसायिकदेखील आहे. कोल्हापुरात माझं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस आहे. संजय लीला भन्साळीच्या चित्रपटाचं चित्रीकरण माझ्याकडे झाल्याची त्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी संपर्क साधला. अभिनेतादेखील आहे हे समजल्यावर माझं कास्टिंग झालं. यामध्ये मी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चोऱया करणाऱया समीर नावाचा भुरटा चोर साकारतोय. नायक जेव्हा हिंदुस्थानात येतो तेव्हा हा त्याचं सगळं सामान चोरतो त्यामुळे नायक अडचणीत येतो. याची समीरला जाणीव होते आणि तो त्याला मदत करतो अशी व्यक्तिरेखा आहे. 23 नोव्हेंबरला संपूर्ण हिंदुस्थानात हा चित्रपट प्रदर्शित होतोय.
तुमच्या फेसबुक वॉलवर लिहलंय ‘जिन्दगी गुजर रही है किरदार निभाते निभाते मै कौन हूं, खुद से ये सवाल आज भी है… तर आता तुम्ही सांगा आनंद काळे कोण आहेत?
मी कोल्हापूरच्या मातीतील अस्सल कोल्हापुरी आहे. महाविद्यालयीन जीवनात फुटबॉलपटू होतो. खेळतेवेळी दुखापत झाली आणि मी मित्रासोबत नाटकाच्या तालमींना जायला लागलो. तिथ अभिनयाची आवड निर्माण झाली. अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवलीत. मुंबईला करीअर करण्यासाठी आलो खरा परंतु परत कोल्हापुरात आलो. तिथे माझा बिझनेस सेटअप केला आणि अभिनयाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. याच सुमारास अनेक मराठी चित्रपटांच्या ऑफर्स यायला लागल्या. दरम्यान नाटक आणि मालिका सुरूच होत्या. माझ्या आयुष्यात ‘कोंडाजी बाबा’ हे वादळ आलं आणि 6000 एपिसोड, माझे चित्रपट एका बाजूला आणि हो 50 एक एपिसोडची लोकप्रियता एका बाजूला असं झालं. फिरायची खूप आवड आहे. मोटोक्रॉस, काररेसिंग करायला आवडतं. फोटोग्राफीची विशेष आवड आहे. जेव्हा माणसाचा खूप कंटाळा येतो तेव्हा शांतपणे बाहेर एकटाच फिरायला जातो. खासकरून कोकणात जायला आवडतं. पुन्हा रिफ्रेश होऊन कामाला लागतो.
– तुम्हाला मिळालेल्या लोकप्रियतेकडे कशाप्रकारे पाहता?
बरेचदा काय होतं की लोक मालिकेतील त्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात असतात. ते संपलं की लोक विसरून जातात; परंतु कोंडाजी बाबा फर्जंदचा ‘हँगओव्हर’ अजूनही उतरत नाहीये. या लोकप्रियतेमुळे नक्कीच माझ्यावर जबाबदारी वाढलीय. यानंतर जे काम घेईन ते तगडं नक्कीच असायला हवं. मालिका, थिएटर करतच राहणार. एक साऊथच्या सिनेमाबाबत विचारणा झालीय.


























































