अधिक मासाची ‘अधिक’ माहिती

>> वृषाली पंढरी

दुस्थानातील प्रांतानुसार अधिक मासमापनाची प्रथा बदलल्याचे आढळून येते. सूर्याधारित पंचांग पाळणाऱया आसाम, ओडिशा, केरळ, तामीळनाडू ,पश्चिम बंगाल या राज्यांत अधिक महिना नसतो, तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱया आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशांसारख्या राज्यांत पाळला जातो. हिंदू पंचांगामध्ये दर तीन वर्षांनी अधिक मासाची योजना करण्यात आली आहे. त्यामुळे ऋतुचक्रांशी हिंदूंच्या सणांचा मेळ राहतो. मुस्लिम कालगणनेत ही योजना नाही. त्यामुळे मुस्लिम सण विशिष्ट ऋतूत येत नाहीत.

अधिक म्हणजे जास्तीचा महिना. धार्मिक महत्त्व असलेला, तरीही शुभकार्ये वर्ज्य असणारा, खगोलशास्त्राच्या आणि वैज्ञानिक महत्त्व असलेला यंदाचा 18 सप्टेंबरला सुरू झालेला अधिक मास 16 ऑक्टोबरला संपेल. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास, धोंडय़ाचा महिना असेही म्हणतात.

अधिक महिन्याचे संदर्भ वैदिक साहित्यात आढळत असल्याने ही कल्पना पुरातन असल्याचे सिद्ध होते. या मासात मंगल कार्ये, शुभकार्ये काम्य व्रते केली जात नाहीत. त्यासंदर्भात एक पौराणिक आख्यायिका पाहायला मिळते. शुभकार्ये वर्ज्य असल्यामुळे या मासाला इहलोकात अनेक निर्भर्त्सनांना सामोरे जावे लागले. त्यामुळे व्यथित होऊन अधिक मास वैकुंठात विष्णूकडे गाऱहाणे घेऊन गेला. विष्णूने त्यास गोकुळात कृष्णाकडे पाठविले. तो कृष्णास शरण गेला. कृष्णाने त्या मासाचे नाव बदलून ‘पुरुषोत्तम मास’ असे ठेवले अशी कथा प्रचलित आहे. या महिन्यात जे श्रद्धाभक्तियुक्त राहून उपासना, कर्मे, व्रते व दाने करतील त्यांना पुण्य मिळेल असेही त्यास वचन दिले. त्यामुळे अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. या विशिष्ट महिन्यात विष्णू देवतेच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. या काळात उज्जैन येथे विशेष यात्रा भरते. भागवत पुराणाचे वाचन, भागवत कथा सप्ताह, स्नान, दान, जप यांचे आचरण या महिन्यात केले जाते. गरजूंना भोजन, दान देणे यासाठीही या महिन्यात विशेष उपक्रम केले जातात.

अधिक महिन्यात विविध मंगल कृत्ये करू नयेत असा संकेत रूढ आहे, त्यामुळे या महिन्यात विवाह, मुंज, बारसे, वास्तुशांती असे संस्कार केले जात नाहीत.

अधिक मासात भारतभरात विष्णूच्या विविध मंदिरांत विशेष पूजांचे आयोजन केले जाते. भागवत पुराणाचे सप्ताह, दान, तीर्थस्थळी स्नान असे धार्मिक उपक्रम आयोजित केले जातात. विविध यात्रा-जत्रा यांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील बीड जिह्यात प्रसिद्ध पुरुषोत्तम मंदिर आहे. तेथे अधिक मासात संपूर्ण महिना विशेष धार्मिक उत्सव आयोजित होतात.

पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे, सूर्य हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो असे भासते, त्यास 365 दिवस, 5 तास 48 मिनिटे आणि साडे 47 सेकंद लागतात. त्या काळात इंग्रजी (ग्रेगरी) कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले 12 हिंदू चांद्र मास मात्र 354 दिवसांतच म्हणजे 11 दिवस आधीच पूर्ण होतात. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील चांद्र मास हे अमान्त म्हणजे अमावस्येला संपणारे असतात. उत्तरेला ते पौर्णिमान्त म्हणजे पौर्णिमेला संपणारे असतात. ज्या हिंदू महिन्यात सूर्य एकाही राशीचे संक्रमण करीत नाही, म्हणजे रास बदलत नाही तो अधिक मास होय. सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी व या अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाची व क्षय मासाची योजना करण्यात आलेली आहे. तीन वर्षांत होणारा 33 दिवसांचा फरक क्षय मास वा अधिक मास टाकून ही कालगणना सूर्याधारित सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते. हा पुराणातील वैज्ञानिक दृष्टिकोनच म्हणायला हवा.

हिंदुस्थानातील प्रांतानुसार अधिक मासमापनाची ही प्रथा बदलल्याचे आढळून येते. सूर्याधारित पंचांग पाळणाऱया आसाम, ओडिशा, केरळ, तामीळनाडू ,पश्चिम बंगाल या राज्यांत अधिक महिना नसतो, तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱया आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशांसारख्या राज्यांत पाळला जातो.

हिंदू पंचांग हे चांद्र महिन्याचे आहे. मुस्लिम कालगणनाही चांद्र महिन्यानुसारच आहे. इंग्रजी कॅलेंडर आणि आपले ऋतुचक्र हे मात्र सौर महिन्याशी जोडलेले आहे. चांद्र महिना 29 दिवसांचा असतो, तर सौर महिना 30, 31 दिवसांचा असतो. यामुळे प्रतिवर्षी चांद्र आणि सौर वर्षाच्या एकूण दिवसांमध्ये 13 ते 14 दिवसांचा फरक पडतो. हिंदू पंचांगामध्ये दर तीन वर्षांनी अधिक मासाची योजना करण्यात आली आहे. त्यामुळे ऋतुचक्रांशी हिंदूंच्या सणांचा मेळ राहतो. मुस्लिम कालगणनेत ही योजना नाही. त्यामुळे मुस्लिम सण विशिष्ट ऋतूत येत नाहीत.

चैत्रापासून अश्विन महिन्यांपर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्याची गती मंद असते व त्याला एका राशीतून दुसऱया राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित कार्तिक वा फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो. त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्र महिने असतात. अगोदरचा अधिक मास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास. एखादा विशिष्ट महिना अधिक मास आला की 19 वर्षांनंतर तोच महिना अधिकमास म्हणून येऊ शकतो.

ज्या वर्षी चैत्र हा अधिकमास असतो, त्यावर्षी अधिक मासाच्या सुरुवातीलाच शकसंवत्सराचा आकडा एकने पुढे जातो, गुढी पाडवा मात्र लगेचच नंतर येणाऱया निज चैत्र महिन्यात येतो. म्हणजे त्यावर्षी पाडवा हा नववर्षाचा आरंभ दिवस नसतो. काही वेळा एकाच चांद्रमासात सूर्याची दोन संक्रमणे येतात, म्हणजे सूर्य दोनदा रास बदलतो. अशावेळी क्षयमास येतो. मार्गशीर्ष, पौष आणि माघ या महिन्यांत अधिक मास कधीही येत नाहीत, क्षयमास येतात. क्षयमासाच्या आजूबाजूच्या महिन्यांमध्ये केव्हातरी थोडय़ा अंतराने दोन अधिक मास येतात.

चांद्र वर्ष आणि सूर्य उर्फ सायन वर्ष यांच्यात मेळ घालण्याच्या उद्देशाने पंचांगकर्त्यांनी कालगणनेसाठी जरी चंद्राचे भ्रमण प्रमाण मानले तरी महिन्यांची नावे मात्र सूर्याच्या भ्रमणाप्रमाणे ठेवली. सूर्य एका राशीत साधारणपणे एक महिना राहतो. साधारण 14 ते 17 तारखेला तो रास बदलतो. एका अमावास्येला सूर्य ज्या राशीत असतो, त्याच्या पुढच्या राशीत तो नंतरच्या अमावास्येला असतो. मात्र साधारण तीन वर्षांनी एक अशी अवस्था येते की, एका अमावास्येला सूर्य ज्या राशीत असेल त्याच राशीत तो पुढच्या अमावस्येलाही असतो. नियमाप्रमाणे सूर्य अमावास्येला ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे त्या महिन्याला नाव दिले जाते. पण दोन लागोपाठच्या अमावास्यांना सूर्य एकाच राशीत असेल तर, म्हणजे सूर्य रासच बदलत नसेल तर त्या दुसऱया अमावास्येनंतर सुरू होणाऱया महिन्याला नाव काय द्यायचे असा प्रश्न पडतो. अशा वेळी नाव ‘रिपिट’ करण्यात येते. अधिक मासासंबंधी धार्मिक व खगोलशास्त्र्ााrय माहिती वाचकांना रोचक वाटेल अशी अपेक्षा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या