स्मरणीय कलासंपदा देणारा चित्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गजानन सीताराम शेपाळ

मॉडर्न इंडियन पेंटर्समध्ये अकबर पद्मसी यांचे नाव जगन्मान्य होते. चित्रकार-पेंटर-फिल्ममेकर अशा भूमिकांमध्ये जगणाऱया पद्मसी यांना महाराष्ट्र सरकारने कै. वासुदेव गायतोंडे कला जीन गौरव पुरस्काराने सन्मानित करायचे ठरवले असतानाच पुरस्काराच्या आदल्या दिवशी त्यांचे निधन झाले. अशा बहुआयामी कलाकाराला ही आदरांजली.

हिंदुस्थानातील ज्येष्ठ-श्रेष्ठ जागतिक कीर्तीचे चित्रकार अकबर पदमसी 6 जानेवारीला निवर्तले. राज्य शासनाने या वर्षापासून सुरू केलेला 5 लाख रुपये, सन्मानपत्र अशा स्वरूपाचा कै. वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार पद्मभूषण अकबर पदमसी यांना प्रदान करण्यासाठी 60 व्या राज्यकला प्रदर्शनाचे औचित्य साधले होते. 7 जानेवारी हा सायंकाळी कलापंढरी म्हणून ओळख असलेल्या जहांगीर कला दालनात राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. या उद्घाटन सोहळय़ाला अकबर पदमसी यांच्या दुःखद निधनाच्या वृत्ताची छटा होतीच. देशविदेशातील अनेक पुरस्कार – सन्मान मिळविणारे पद्मभूषण अकबर पदमसी यांना जाहीर झालेला तोही पहिलाच पुरस्कार घेण्यासाठी त्यांच्या परिवारातील व्यक्तीला यावे लागले. ही घटना उपस्थितांच्या डोळय़ात पाणी आणणारी होती.

12 एप्रिल 1928 रोजी गुजरात राज्यात, कच्छ प्रांतात भावनगर जिह्यातील वाघनगर खेडय़ात पदमसींचा जन्म झाला. त्यांचे आजोबा सरपंच होते आणि वडील यशस्वी व्यावसायिक होते. फर्निचर आणि ग्लासवेअर्सचा उद्योग होता. अकबर पदमसी मात्र उद्योगांमध्ये लक्ष देण्यास अधिक उत्सुक नव्हते. त्यांना सात भावंडे असल्यामुळे पदमसींवर फारसा दबावही नव्हता. व्यवसायानिमित्ताने मुंबईत आलेल्या वडिलांबरोबर पदमसीही मुंबईत आले. सेंट झेवियर्स हायस्कूल फोर्ट, मुंबई येथे प्राथमिक शिक्षण घेत असतानाच जलरंग चित्रकार शिरसाठ यांच्याकडून जलरंग लेपनाचे धडे मिळाले. ते शिरसाठ यांना प्रथम कलागुरू म्हणून मानत असत. त्यांचं जलरंगातील कौशल्य पाहून त्यांना थेट तिसऱया वर्गात बसविण्यात आले. जलरंगावरील त्यांची हुकूमत पाहून त्यांचे समकालीन फ्रान्सिस न्यूटन सोझा, एस. एच. एझा, एम. एफ. हुसेन थक्क झाले होते.

मॉडर्न इंडियन पेंटर्समध्ये अकबर पदमसी यांचं नाव जगन्मान्य होतं. त्यांनी रंगलेपनात ऑइल कलर, प्लॅस्टिक इमल्शन, वॉटर कलर, प्रिंट मेकिंग, स्कल्पचर्सपासून तर कॉम्प्युटर ग्राफिक – डिजिटल पेंटिंग, फोटोग्राफी अगदी फिल्म मेकिंगसुद्धा त्यांनी कला निर्माणासाठी माध्यम म्हणून उपयोगात आणले. हे सारं थोडं की काय, एनग्रेव्हिंग, लिथोग्राफी या विषयांमध्येही त्यांनी थक्क केली जाईल अशी मुशाफिरी केली होती. म्हणजे कला निर्माणासाठी जी जी माध्यमे आणि तंत्रे उपयोगात आणली जातात त्या साऱयाच माध्यमांचा तंत्रशुद्ध अभ्यास पदमसींनी केलेला होता.

त्यांच्या विविध शैली प्रकारांमध्ये ‘मेटास्केप’ किंवा ‘परावर्तित इमेज’ (आरसा इमेज) हा उस्फूर्त शैलीतील प्रकार अधिकच रसिकमान्य झाला. तैलरंगाचं लेपन करताना त्यांनी ‘ओपेक बेस’ रंगकाम केलेलं अधिक दिसतं. ‘ओपेक बेस’ म्हणजे तैलरंगात ऑइल कमी आणि रंग अधिक. त्यामुळे असं रंगलेपन करताना चित्रकाराला अधिक मेहनत घ्यावी लागते. कॅनव्हासच्या जाडीशिवाय रंगाच्या लेपनामुळे कॅनव्हासवर अधिक स्तर तयार होतात. रंग उडून जात नाही. त्यामुळे त्यांच्या कलाकृती या काल-परवा रंगवल्या आहेत असेच वाटते.

क्रिएटिव्ह लॅण्डस्केप, व्यक्तिचित्रणे, अर्धअमूर्त शैलीतील कलाकृती म्हणजे त्यांचे हुकमतीचं काम. 1950 मध्ये फ्रेंच सरकारने त्यांना पॅरिसला आमंत्रित करून स्कॉलरशिप बहाल केली. 1952 मध्ये त्यांनी समूह प्रदर्शनात पॅरिस येथे कलाकृती प्रदर्शित केल्या. तेथूनच त्यांच्या कलाप्रतिभेने रसिकमनाचा ठाव घेतला. हिंदुस्थानात आल्यावर 1954 मध्ये जहांगीर कलादालनात त्यांचं पहिलं एकल प्रदर्शन भरलं. ‘पुरस्कार – फेलोशिप्स – सन्मान आणि पदमसी’ हे समीकरणच बनलेलं असायचं. 1962 मध्ये त्यांना ललित कला अकादमीची फेलोशिप मिळाली. 1965 मध्ये त्यांना जे. डी. रॉकफेलर फेलोशिप मिळाली. युनिव्हर्सिटी ऑफ विस्कन्सीनने त्यांना 1965 लाच ‘निवासी आर्टिस्ट’ म्हणून निमंत्रित केले. पुढे ते 1967 मध्ये हिंदुस्थानात आले.

‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’मध्ये त्यांनी सुरुवातीला चित्रांची नक्कल करण्याचे काम सुरू केले. ‘चरितार्थासाठी नोकरी’ हे गणित त्यांच्या दृष्टीने फारसं महत्त्वाचं नव्हतं. चित्रकार – पेंटर – फिल्ममेकर अशा बहुआयामी भूमिकांमध्ये त्यांनी आनंद घेत कला कार्य सुरू ठेवलं. भोपाळ येथील भारत भुवन म्युझियमच्या सुधारणेसाठी त्यांचे मोलाचे योगदान होते. अनेक देश-विदेश पातळींवरच्या कलासंस्थांचे सदस्य, सल्लागार अशी अनेक पदे त्यांनी भूषविली. त्यांच्या या कार्याची दखल हिंदुस्थान सरकारने घेऊन 2009 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. व्हिजन एक्प्रेस वर्कशॉपची कल्पना त्यांनीच सर्वप्रथम मांडली आणि प्रत्यक्षात आणली.

त्यांना ‘पद्मश्री’ देण्यात आला त्याचवेळी खऱया अर्थाने त्यांना ‘जीवन गौरव’ मिळाल्याचा दिवस होता. 2010 मध्ये त्यांना पुनश्च हिंदुस्थान सरकारने पुरस्कार दिला. ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने पदमसींना सन्मानित केले गेले. तत्पूर्वी 1997 मध्ये प्लॅस्टिक आर्टसाठी सन्मान मिळाला, मध्य प्रदेश सरकारचा ‘कालीदास’ सन्मान त्याचं नाव.

वार्धक्याच्या अखेरच्या काळात कोईमतूर येथील ईशा योग केंद्रात त्यांचं वास्तव्य होतं. 6 जानेवारी 2020 रोजी तेथेच त्यांनी कला जीवनाचा प्रवास संपवला. 91 वर्षे सुरू असलेल्या पुरोगामी चळवळीचं नेतृत्व करणाऱया या कालाकाराला महाराष्ट्र सरकारने ‘कै. वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करायचं ठरविलं होतं, जो सन्मान त्यांच्या कुटुंबीयांना स्वीकाराला लागला. वास्तविक ‘पद्मविभूषण’ एवढा मोठा हिंदुस्थान सरकारचा सन्मान पुरस्कार प्राप्त झाल्यानंतरही हा ‘जीवन गौरव’ पुरस्कार देण्यात आला… हीच त्यांच्याप्रती महाराष्ट्र शासनाने व्यक्त केलेली भावपूर्ण आदरांजली.

[email protected]