युगाब्दी

>> प्रज्ञा कुलकर्णी

वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया होय. हा एक पवित्र अणि शुभ दिवस मानला जातो. पौराणिक संदर्भानुसार या तिथीस कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा आरंभ झाला म्हणून या तिथीस ‘युगाब्दी’ असेही म्हणतात. हा दिवस काल विभागाचा प्रारंभ दिन म्हणूनही पवित्र मानला जातो.

अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे कोणत्याही शुभकार्यासाठी उत्तम मानला जातो. याचदिवशी श्री विष्णूचा सहावा अवतार असलेल्या परशुरामाचा जन्म झाला म्हणून या तिथीस प्रदोषकाळी परशुरामाची पूजा करतात. तसेच चैत्र शुद्ध तृतीयेपासून सुरू झालेल्या चैत्रगौरीच्या उत्सवाचे अक्षय तृतीयेस विसर्जन केले जाते. भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठराला या दिवसाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, ‘‘हे,युधिष्ठाrरा या तिथीस केलेले दान आणि हवन कधीही क्षयाला जात नाही तर त्याचे पुण्य अक्षय राहते.’’ म्हणून या तिथीस ‘अक्षय तृतीया’ असे म्हटले जाते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात,

दानेन तुल्यो विधिरस्तीनान्यः
लोभाश्चनान्योस्ति रिपुः पृथिव्याम्
विभूषणम् शीलसमंनचान्यत
संतोष तुल्यम् धनमस्निनान्यत्

दानासारखे दुसरे धर्मकृत्य नाही, लोभासारखा दुसरा शत्रू नाही, चारित्र्यासारखा दुसरा अलंकार नाही आणि समाधानासारखे दुसरे धन नाही. दानधर्माचे पालन प्रत्येक व्यक्तीने करायला हवे. त्यामुळे वैभव आणि समाधान दोन्ही प्राप्त होते.

आपण आपल्या चांगल्या आणि वाईट कर्मांद्वारे आपल्या संचितात भर घालत असतो. चांगले कर्म केल्याने पुण्य मिळते आणि त्याद्वारे आपण अधिक चांगल्यारितीने जीवन जगू शकतो, अशी आपली श्रद्धा असते तर हीच पुण्याई कधी कधी कमी पडून आपल्याला दुःखही भोगावे लागते तेव्हा आपण प्रारब्ध, नशीब, पूर्वपुण्याई कमी पडली, असे म्हणतो. मात्र आपण केलेले पुण्यकर्म कधीही ‘क्षय’ म्हणजे कमी होणार नाही, असा एक दिवस म्हणजेच ‘अक्षय तृतीया’ हा दिवस होय. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय आणि अविनाशी राहते. या दिवशी पितरांचे श्राद्ध, जप, तप, दान, होमहवन इत्यादी कर्मे केल्यास ते कर्म पुण्यकारक ठरते. अक्षय तृतीया वैशाखात येत असल्यामुळे उन्हापासून संरक्षण करणाऱया वस्तू म्हणजे छत्री, पादत्राणे, पाण्याचे माठ, पंखे यांचे गरजूंना दान दिल्यास त्याचे चांगले फळ मिळते. आपले सर्व सण, उत्सव, व्रते हे निसर्गाशी आणि आरोग्याशी निगडित आहेत. निसर्गाशी संवाद साधावा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी हाच यामागे उद्देश आहे. बदलत्या काळानुसार त्याकडे बघण्याचा आणि असे सण, उत्सव साजरे करण्याचा दृष्टिकोनही आपण बदलू शकतो. आज आपल्यापुढे ढासळते पर्यावरण, प्रदूषण, पाणी समस्या, जागतिक पातळीवर वाढलेले उष्णतामान, बेभरवशाचे पर्जन्यमान असे अनेक प्रश्न आहेत आणि सध्या तर कोरोनासारख्या भयंकर अशा महामारीच्या संकटाने आपण सारेच हादरून गेलो आहोत. जगण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राणवायूचीही कमतरता आपल्याला भासते आहे. खरे तर या साऱया समस्या निर्माण होण्याला आपणच कारणीभूत आहोत. आपण निसर्गावर, पर्यावरणावर अन्याय केला. सण उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याऐवजी वायूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण केले. वृक्षतोड करून सिमेंटचे जंगल वसवले. नद्या, समुद्र दूषित केले. पाण्याचा अपव्यय केला आणि सर्वात मुख्य म्हणजे चंगळवादाचा अवलंब केला. या साऱयाचे परिणाम आपण सध्या भोगत आहोत. या साऱया संकटांवर मात करण्यासाठी आता आपण काही संकल्प केले पाहिजेत. नियमांचे काटेकोर पालन करून जबाबदारीचे भान ठेवून एकमेकांना यथाशक्ती सहाय्य करत माणुसकी जपत आपल्या पूर्वापार चालत आलेल्या पारंपरिक जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे, साध्या सोप्या आरोग्यदायी जगण्याचा स्वीकार केला पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या