लेख – आइन्स्टाईन नावाची आख्यायिका…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी 

एकोणिसावं शतक संपून विसावं शतक सुरू होत असताना ‘‘भौतिकशास्त्र आता परिपूर्ण झाले असून त्यात नव्याने संशोधन करण्यासारखे काही उरलेले नाही’’ असा एक स्वयंपरिपूर्णतेचा विचार विज्ञान क्षेत्रातही होऊ लागला होता हे आश्चर्यच, परंतु मानवी स्वभावाची रचना आणि मर्यादा लक्षात घेता तसं म्हटलं गेलं हे खरं. अर्थात संस्कृतीसारखंच प्रवाही असलेलं विज्ञान असं एका क्षणापाशी थबकून ‘परिपूर्ण’ वगैरे असल्याचा दावा करत नसतं. त्यात नित्यनव्या संकल्पना येतच राहतात. जुन्या संकल्पनांमध्ये परिवर्तन होत जातं किंवा त्या अधिक सक्षम होतात. त्यामुळेच वैज्ञानिक विचार प्रक्रियेला काळाचं बंधन नसतं. त्यातूनच महत्त्वाचे शोध लागतात. काही शोध तर जगाला पूर्वी कधी न झालेला बोध घडवतात.

अल्बर्ट आइन्स्टाईन हे अशा संशोधकांपैकी आख्यायिकाच झालेलं अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व. जर्मनीमधील उल्म या गावात त्यांचा जन्म 15 मार्च 1879 या दिवशी झाला. म्हणजे आज आइन्स्टाईनची 143वी जयंती. भौतिकशास्त्रातील या क्रांतिकारी संशोधकाला म्हणजेच सापेक्षतावादाच्या म्हणण्यापेक्षा सापेक्षता सिद्धांताच्या जनकाला अभिवादन करण्याचा हा योग्य दिवस. E=mc2 असं अद्वितीय समीकरण मांडून आइन्स्टाईन यांनी भौतिकशास्त्राच्या ‘संपलेल्या’ संशोधनाला धक्का देणारं पुनरुज्जीवन केलं. ऊर्जा म्हणजे वस्तुमान आणि प्रकाशाच्या वेगसातत्याचा वर्ग असं समीकरण सिद्ध करून त्यांचा विशिष्ट सापेक्षता सिद्धांत (स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी) 1905 मध्ये प्रसिद्ध झाला आणि भौतिकशास्त्रातलं अमर समीकरण जन्माला आलं. आपल्या आयुष्यातला अद्वितीय सिद्धांत मांडणाऱ्या तरुण आइन्स्टाईनच्या आयुष्यातील ते ‘अॅनास मिरॅबिलिस’ पिंवा ‘अमेझिंग ईयर’ अथवा विस्मयकारी वर्ष ठरलं. मात्र त्यावेळी तो एक क्लर्क (कारकून) म्हणून नोकरी करत होता.

या मुलाची बुद्धिमत्ता गणित आणि भौतिकशास्त्रात आरंभापासूनच तीव्र होती. उल्म येथे जन्म झाल्यानंतर वर्षभरातच आइन्स्टाईनचं कुटुंब म्युनिक (जर्मन उच्चार म्युन्शन) येथे महानगरात आलं. वयाच्या 15 वर्षांपर्यंतचं शिक्षण घेताना गणिताच्या विशेष जोडीने आणि ओढीने अल्बर्टने बाराव्या वर्षीच शालेय सुट्टीत युक्लिडच्या भूमितीचा आणि बीजगणिताचाही अभ्यास केला. त्याच वर्षी पायथागोरसच्या प्रमेयाचं स्वतःचं उत्तरही शोधलं (असंच उत्तर भास्कराचार्यांनीही स्वतंत्रपणे शोधलं होतं). वयाच्या चौदाव्या वर्षी आइन्स्टाईनला ‘कॅल्क्युलस’ या विषयात प्रावीण्य संपादन करता आलं. माध्यमिक शिक्षण संपेपर्यंत अल्बर्टने गणितावर प्रभुत्व प्राप्त केलं होतं.

गणित आणि गणिती अनेकांना रुक्ष वाटतात, पण तसं असायचं काही कारण नाही. आइन्स्टाईन यांना वयाच्या तेराव्या वर्षीच व्हायोलिन आणि पियानो उत्तम प्रकारे वाजवता येऊ लागला. केन्ट यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभावही या नवतरुणावर पडला. जीवनविषयक धारणा घट्ट होऊ लागल्या. मानवतेच्या कल्याणाचे विचार मनात रुजले त्या काळात (किंवा आताही बहुदा) युरोपातील नागरिकांना सर्व युरोपीय देशांत जाण्याची मुभा असते. स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर 1901 मध्ये अल्बर्टला स्वीस पेटन्ट ऑफिसमध्ये नोकरी मिळाली. तिथेच बसून ‘फावल्या’ (म्हणजे विज्ञानाच्या दृष्टीने अतिमहत्त्वाच्या) वेळात अल्बर्ट आपल्या गणिती संशोधनावर काम करत असे. याच काळात वयाच्या अवघ्या सव्विसाव्या वर्षी सापेक्षता सिद्धांताचं सूत्र त्याला गवसलं आणि पुढे या महान संशोधकाने सर्वसाधारण सापेक्षतेचा सिद्धांत (जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी) मांडला आणि अवघं जग चकित झालं.

1905 मध्ये पीएच.डी. प्राप्त करण्यापूर्वीच 1903 मध्ये मिलेवा यांच्याशी अल्बर्टचा विवाह झाला. जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड आणि अमेरिका अशी त्यांच्या जीवनाची चौस्थळी यात्रा. हुकूमशहा हिटलरचा या संशोधकावर ते ज्यू असल्याने राग होता. 1933 मध्येच हिटलरने सर्व ज्यू लोकांना पदांवरून हटवून आपल्या संभाव्य क्रौर्याची चुणूक दाखवली होती. आइन्स्टाईन वेळीच तिथून निसटले. हिटलरने अणुबॉम्ब बनवण्यापूर्वी अमेरिकेने तो बनवला तेव्हा त्यांनी सहाय्य केलं खरं, पण जपानवरील अणुहल्ल्याने त्यांचा राजकारणाच्या बाबत पूर्ण भ्रमनिरास झाला. ‘युद्ध हा रोग आहे’ अशा निष्कर्षाला आलेल्या आइन्स्टाईन यांनी गांधीजींना श्रद्धांजली वाहताना ‘‘हाडामांसाचा असा माणूस पृथ्वीतलावर होऊन गेला यावर पुढच्या पिढय़ांना विस्मय वाटेल’’ असं म्हटलं. सन्मानाने चालून आलेलं इस्रायलचं राष्ट्राध्यक्षपद त्यांनी नाकारलं.

प्रसरणशील विश्वाची कल्पना येऊनही ‘युनिव्हर्सल कॉन्स्टन्ट’ मांडण्यात चूक झाल्याचं त्यांना नंतर उमगलं. संगीताच्या विश्वातही हा सहृदय शास्त्रज्ञ तितकाच रमला. रवींद्रनाथ टागोरांबरोबरचा त्यांचा (1930 मधील) तत्त्वचिंतनात्मक संवाद नेटवर उपलब्ध आहे. आपल्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागतिक दौऱ्यावर असलेलं महर्षी धोंडो केशव कर्वे यांची आणि आइन्स्टाईन यांचीही भेट 1920 मध्ये झाली होती. त्याचा फोटोही नेटवर पाहायला मिळतो. ‘‘मी शास्त्रज्ञ झालो नसतो तर संगीतकार झालो असतो’’ असं म्हणणाऱ्या आणि मानवतेची ‘भाषा’ बोलणाऱ्या या ‘फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट’साठी नोबेल मिळवणाऱ्या महान संशोधकाने 18 एप्रिल 1955 रोजी जीवनाचा निरोप घेतला तेव्हा सर्व जग हळहळलं.

[email protected]