लेख : अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे पडघम

16


सनतकुमार कोल्हटकर ([email protected])

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या 2020 मध्ये होणाऱ्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प हेच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असतील हे आता तरी निश्चित दिसत आहे. अमेरिकेतील घटनेनुसार एका व्यक्तीला दोन वेळाच अध्यक्षपदावर राहता येऊ शकते. ट्रम्प यांच्यासमोर डेमोक्रॅट पक्षाचा कोण उमेदवार असेल याचीच सर्वांना उत्सुकता आहे. सध्या अनेक नावे चर्चेत येत आहेत, ज्यामध्ये बराक ओबामा यांच्याबरोबर काम केलेले जो बिडेन आहेत, तुलसी गबार्ड आणि अशा बऱ्याच नावांची चर्चा आहे. जो कोणी उमेदवार ठरेल, त्यानंतर त्या उमेदवाराचा इतिहास खोदण्याची सुरुवात होईल त्यानंतर त्या उमेदवारावर आरोपप्रत्यारोप सुरू होतील

अमेरिकेच्या मागील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाचा त्या निवडणुकीतील कथित हस्तक्षेप खूप गाजला होता. रशियाने त्या निवडणुकीत हस्तक्षेप करून रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी होण्यास मदत केली असे आरोपही झाले. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यावरही ते आरोप होणे थांबले नव्हते. मग म्युलर चौकशी समिती स्थापन झाली आणि त्या समितीने थेट ट्रम्प यांना दोषी ठरवले नाही तरी दोषमुक्तही ठरवले नाही. त्यामुळे ट्रम्प अजूनही संशयाच्या भोवऱ्यात आहेत असे म्हणता येईल. ट्रम्प अध्यक्षपदी आल्यानंतर त्यांनी नियुक्त केलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल फ्लिन यांना नियुक्तीनंतर दोन महिन्यांतच त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. फ्लिन यांनी अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान रशियन अधिकाऱयांशी संपर्क ठेवल्याचे आरोप झाले आणि त्याचे पुरावेही पुढे आल्यामुळे ट्रम्प यांना फ्लिन यांचा राजीनामा घेण्यावाचून गत्यंतर नव्हते. फ्लिन यांच्या नंतर आलेले सुरक्षा सल्लागार मॅकमास्टर यांनाही राजीनामा द्यावा लागला.

नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांना ‘ए.बी.सी.’ वाहिनीच्या वार्ताहराने विचारले होते की, जर पुढील अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान त्यांच्या विरोधी उमेदवाराबद्दल इतर देशांच्या राजकारणी अथवा राजनैतिक अधिकाऱयांनी काही गुप्त आणि उपद्रवी माहिती पुरवली तर तुम्ही त्या माहितीचा स्वीकार करणार का आणि त्या माहितीचा त्या निवडणुकीत त्या उमेदवाराविरुद्ध वापर करणार का? त्या प्रश्नाला ट्रम्प यांनी तत्काळ उत्तर दिले की, ‘‘निश्चितच!’’ त्यामुळे पुढील निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारावर भरपूर राळ उडवली जाईल हे निश्चित. ट्रम्प यांनी दिलेली वरील प्रतिक्रिया हे अप्रत्यक्षपणे इतर देशांना आवाहनच आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पक्षांचे पाठीराखे देश काही प्रमाणात ओळखू येतात, जसे की सौदी अरेबिया, अरब अमिरात, बहारीन, इजिप्त,  इस्रायल हे उघडपणे ट्रम्प यांच्यामागे निवडणुकीदरम्यान उभे राहू शकतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेली इराणबद्दलची भूमिका या देशांना सोयीची आहे, तर इराण, तुर्की, चीन, उत्तर कोरिया हे डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवाराच्या मागे उभे राहतील अशीच लक्षणे आहेत. रशिया त्याचा इतिहास पाहता उघडपणे काही करील अशी लक्षणे नाहीत.

डेमोक्रेटिक पक्षातील अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांची मांदियाळी आहे. साधारण 24 उमेदवारांची नावे समाजमाध्यमांवर फिरत आहेत. सगळेच रथी-महारथी आणि काही गेल्या निवडणुकीत प्राथमिक फेरीत पराभूत झालेले उमेदवार आहेत. बर्नी सेंडर्स यांनी मागील निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांना खूपच तगडी लढत दिली होती. या नावांशिवाय कमला हॅरिस, एलिझाबेथ वॉरेन ही या यादीतील काही अन्य ठळक नावे. अर्थात या सर्वांमधून अंतिम फेरीत पक्षातर्फे कोण उमेदवार पोहोचतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.

फ्लोरिडामध्ये ओरलॅण्डो येथे मोठी जनसभा घेऊन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील वर्षी होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे बिगुल वाजवले. ट्रम्प हेच रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार असतील हे सध्याच्या परिस्थतीवरून तरी दिसते आहे. ‘‘परकीय सरकारमधील जबाबदार व्यक्तींकडून अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवारांबद्दल थोडी जरी ‘संशयास्पद’ माहिती मिळाली, जी त्या व्यक्तीच्या प्रतिमाभंजनाला उपयोगी होईल, त्या माहितीचे मी स्वागतच करीन’’ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या बाजूने आणि विरोधी असणाऱ्या देशांकडून येत्या निवडणुकीत माहिती पुरवठय़ाचा धुरळा उडणार हे निश्चित. त्यामुळे चीन, रशिया, इराण, अरब देश हे सर्व देश यावेळी पडद्यामागून पूर्वीपेक्षा जास्त सक्रिय होतील हेही उघड आहे.

एलिझाबेथ वॉरेन या डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवाराने तर ट्रम्प यांच्या या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर महाभियोग चालवावा अशी भूमिका घेतली आहे. अप्रत्यक्षपणे डोनाल्ड ट्रम्प हे विविध परदेशांना या अशा माहिती पुरवठय़ासाठी आमंत्रण देत आहेत अथवा उद्युक्त करत आहेत असे म्हटल्यास वावगे होणार नाही. ट्रम्प हे पक्के व्यावसायिक असून ते अध्यक्षपदाची माळ दुसऱ्याच्या गळय़ात सहजासहजी पडू देणार नाहीत हे स्पष्ट आहे. पूर्वीच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी घोषणा दिली होती, ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन!’ आणि आता या निवडणुकीत त्यांची घोषणा असेल ‘कीप अमेरिका ग्रेट अगेन!’    मेक्सिकोतील स्थलांतरितांना रोखण्यासाठी दोन्ही देशांच्या सीमेवर भिंत बांधणे असो की व्यापारयुद्धात चीनमधून आयात होणाऱ्या विविध वस्तूंवर कर लादून अमेरिकेच्या चीनबरोबरील व्यापारातील तूट कमी करणे असो, ट्रम्प हे प्रत्येक आघाडीवर सामान्य अमेरिकन माणसाला भावेल अशीच कृती करत आहेत असे म्हणता येईल. अमेरिकेत बेरोजगारीचा दर सध्या खूप खालच्या स्तरावर आहे. त्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था पुढील वर्षातील निवडणूक पूर्ण होईपर्यंत सुस्थिर राहिली तर ट्रम्प यांना अध्यक्षपदाची निवडणूक जिंकणे सोपे जाऊ शकेल. बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसलेल्या मोठय़ा प्रमाणातील स्थलांतरित लोकांना लवकरच देशाबाहेर काढले जाईल अशीही घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. मागील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी त्यांचे पूर्वसुरी बराक ओबामा यांच्या ‘ओबामा मेडिकेअर’ अशा नावाने प्रचलित झालेल्या योजनेवर सडकून टीका केली होती, पण ट्रम्प हे अजूनपर्यंत या योजनेपेक्षा जास्त चांगली योजना आणू शकले नाहीत हे वास्तव आहे. डिसेंबर 2020 पर्यंत ही धुमश्चक्री चालू राहील आणि त्यानंतर साल 2021 च्या सुरुवातीला निवडून आलेल्या नवीन अध्यक्षाचा शपथविधी होईल.

आपली प्रतिक्रिया द्या