कपड्यांचा मराठमोळा ब्रॅण्ड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नितीन फणसे, [email protected]

आपण ब्रॅण्डेड कपडे वापरतो… पण ते बहुतेक ब्रॅण्ड परदेशी आणि अमराठी असतात… अमित आचरेकरने कपडय़ांचा मराठमोळा ब्रॅण्ड आणलाय.

प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या माणसाला त्रास खूप होतो, मेहनतही खूप करावी लागते. पण तो काहीतरी वेगळं करत असल्यामुळे सर्वांच्या नजरेत येतो. अमित आचरेकर या ३६ वर्षांच्या मराठमोळ्या तरुणानेही केवळ चांगली नोकरी मिळवून मुकाट राहण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांच्या ‘वा कॉर्पोरेशन’ने मोठी भरारी घेतली आहे.

अमित हे टेक्सटाइल इंजीनियर… गारमेंट, टेक्सटाइल या क्षेत्रात सिक्षण घेतल्यावर त्यांनी आधी एका टेक्सटाइल कंपनीत जॉब केला. पण लगेचच २००९मध्ये त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन केली. याबाबत माहिती देताना ते म्हणतात, होम टेक्सटाइल आणि गारमेंट इंडस्ट्री मारवाडी, गुजराती यांनीच भरलेली आहे. कारण वर्षानुवर्षे ते या इंडस्ट्रीत काम करतात. सस्मिरा कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा आम्ही ७० विद्यार्थी होतो. त्यातील ६०जण मराठी होते. कॉलेज संपलं तेव्हा एखाद दोन विद्यार्थीच टेक्सटाइलमध्ये व्यवसाय करण्याची इच्छा बाळगून होते. बाकीचे नोकरी करण्यात आनंदी होती. पण उरलेल्या दहाजणांमध्ये सातजण गुजराती, मारवाडी होते. ते सगळे टेक्सटाइलच्या व्यवसायात उतरण्याच्या जिद्दीनेच शिकायला आले होते. तसे ते व्यवसायात उतरलेही. टेक्सटाइल इंजीनियरिंगमध्ये मराठी मुलांना त्यांच्यापेक्षा जास्त मार्क होते. पण ते व्यवसायात पडलेच नाहीत.