
>>दिव्या नेरुरकर-सौदागर
ऑफिसमध्ये येणारा ताण आणि त्यामुळे उत्पन्न होणारा राग घरात येऊन काढणं हे सहज शक्य असतं. बऱयाच घरांमध्ये हे बघितलंही गेलेलं आहे. यालाच ‘Anger Diplacement’ असं म्हणतात. कामाच्या ठिकाणी या अशा गोष्टींवर आपले नियंत्रण नाही, पण स्वतःच्या भावनांवर आणि वर्तणुकीवर आपले नक्कीच नियंत्रण आहे. राग किंवा ताणाचे व्यवस्थापन म्हणूनच अशा वेळेस महत्त्वाचे ठरते.
‘‘मला प्लीज सर म्हणू नका’’ या विक्रम (नाव बदलले आहे) यांच्या वाक्यावर समुपदेशनाची दिशा ठरली आणि त्यांच्या समुपदेशन प्रक्रियेस सुरुवात झाली. विक्रम हे साधारण पंचेचाळीस वर्षांचे गृहस्थ. घरची परिस्थिती चांगली आणि त्यांच्या कुटुंबात इन मिन तीनजण – ते स्वतः, त्यांची पत्नी कावेरी आणि मुलगी सारा (दोघींचीही नावे बदलली आहेत). त्यांचा वडिलोपार्जित बिझनेस होता तरी स्वकर्तृत्वावर काही वेगळे करायचे म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे कमवायला सुरुवात केली. सुरुवातीची काही वर्षं सारंच आलबेल होतं. मात्र हळूहळू परिस्थिती बदलू लागली.
पूर्वी ऑफिसमधून घरी हसतमुखाने येणारे विक्रम आता चिडचिड करत घरात पाऊल टाकत होते. घरी आल्यावर सगळ्यांची शाळा घेत होते. पत्नीला ‘‘तू सकाळपासून काय केलेस? हा पसारा हॉलमध्ये का आहे? आवरायला काय झालं?’’ असं करवादत होते आणि त्या रागाच्या भरात आदळआपट करत घरात थोडय़ाफार पसरलेल्या गोष्टी आवरायला घेत होते. मुलीवरही तशाच प्रकारे त्यांचा राग निघत होता. त्यांच्या मुलीची शाळेतून येण्याची वेळ ही त्यांच्या मागेपुढेच असायची. त्यामुळे तिचा घरी आल्यावर थोडा इथेतिथे टाइमपास व्हायचा.
आधी विक्रमही ऑफिसातून आल्यावर तिच्या बरोबर वेळ घालवायचे. मग तिघांचंही नाश्तापाणी हसत-खेळत व्हायचं. मात्र आता हे चित्र पूर्ण बदललं होतं. विक्रम यांच्या बोलण्याच्या आणि वागण्याच्या पद्धतीत कमालीचा बदल झाला होता. ते हेकेखोर बनत चालले होते. त्यांच्यातील हा बदल त्यांच्या पत्नी आणि मुलीस साहजिकच न मानवणारा असा होता.
त्यामुळे घरात आता कलह वाढायला सुरुवात झाली. त्यात सारा आणि विक्रम या दोघांमधील वाद विकोपाला जात होते. विक्रम यांचं सारावर सारखं लक्ष ठेवून असणं, तिच्यामागे अभ्यासाचा सतत धोशा लावणं वाढत चाललं होतं. कधीही कोणालाही उलट न बोलणारी सारा आजकाल स्वतःच्या वडिलांना मात्र वाटेल तसं बोलत होती. त्यांना टाळत होती.
एक दिवस अशीच त्या दोघांची तिच्या उशिरा घरी येण्यावरून वादावादी झाली. साराचा त्यामध्ये बोलण्याचा तोल सुटला आणि पटकन ती ‘‘हा माणूस कशाला माझा बाबा झाला?’’ असं बोलून गेली.
हे वाक्य विक्रम यांच्या मनाला वेदना देऊन गेलं.
‘‘त्या दिवसापासून यांचा तुसडेपणा आणखी वाढला आहे. आता तर आमच्या दोघींशी बोलणंच त्यांनी थांबवलंय. सारा पण त्यांच्याशी फटकूनच वागते. हे दोघे घरात असले की, दोघांनाही मला सांभाळावं लागतं. या दोघांच्या भांडणात माझं सॅन्डविच ठरलेलं आहे’’, कावेरीताई सांगत होत्या. मग विक्रम यांच्याकडे वळून ‘‘आता तुम्ही मोकळेपणाने तुमच्या मनातलं मॅडमना सांगा. मी केबिनच्या बाहेर आहे’’ असं म्हणून त्या बाहेर जाऊन बसल्या.
‘‘सांगा सर! एवढं काय झालं?’’ असं विचारताच त्यांचा भावनांचा बांध फुटला. ‘‘मला सर वगैरे नका म्हणू. मी त्या लायकीचा नाही. मला सगळं हरल्यासारखं वाटतंय. आत्मविश्वास तर पूर्ण गेलाय. मी काही काम व्यवस्थित करू शकत नाही. त्यामुळे मला ऑफिसमध्येही बॉसची बोलणी खावी लागतात’’ असं सांगून विक्रमनी त्यांना ऑफिसमध्ये त्यांच्या बॉसकडून होणाऱया अपमानकारक बोलण्याबद्दल सांगायला सुरुवात केली.
ते आता सीनियर लेव्हलला एका खासगी कंपनीत काम करत होते. त्यांचा बॉस हा कामाबद्दल कडक असल्याने कायम सगळ्याच ऑफिस स्टाफला धारेवर धरायचा. विक्रमसारख्या अतिसंवेदनशील माणसाला या गोष्टी जास्त लागत होत्या. ‘‘बॉसला उलट बोलू शकत नाही, त्याचा अपमान करू शकत नाही, पण तो राग असतो मनात. मग तो घरात निघतो’’ हताश होत ते आपली बाजू मांडत होते. ‘‘मला मी चुकलोय ही जाणीव बऱयाचदा होतही असते, पण माझा ऑफिसमध्ये तडकातडकी झाली की, सगळा मूडच जातो. हल्ली तर हे रोजच व्हायला लागलं आहे.’’
विक्रम यांच्यासारखी परिस्थिती आज ऑफिसला जाणाऱया बऱयाच जणांची असू शकते. ऑफिसचे काम, मीटिंग्स आणि बॉसेसकडून होणाऱया टीका हे एकंदरीतच ‘वर्क कल्चर’चा भाग झाला आहे, पण त्यातून होणारा शारीरिक तसेच मानसिक त्रास हा वेळीच नियंत्रणात आणणे आवश्यक झाले आहे.
ऑफिसमध्ये येणारा ताण आणि त्यामुळे उत्पन्न होणारा राग घरात येऊन काढणं हे सहज शक्य असतं. बऱयाच घरांमध्ये हे बघितलंही गेलेलं आहे. यालाच ‘Anger Diplacement’ (एखाद्या गोष्टीचा राग दुसऱया गोष्टीवर काढणे) असं म्हणतात. म्हणूनच असंही पाहिलं गेलंय की, जर कामाच्या ठिकाणी ज्या व्यक्तींचा जास्त अपमान होतो, त्यातल्या काही व्यक्ती घरातील लोकांना अपमानकारक बोलतात.
कामाच्या ठिकाणी या अशा गोष्टींवर आपले नियंत्रण नाही, पण स्वतःच्या भावनांवर आणि वर्तणुकीवर आपले नक्कीच नियंत्रण आहे. राग किंवा ताणाचे व्यवस्थापन म्हणूनच अशा वेळेस महत्त्वाचे ठरते. हे कसे करावे?
– ऑफिस आणि घर या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणूनच या दोघांच्याही जबाबदाऱया तिथल्या तिथे ठेवाव्यात. दोन्हींची सरमिसळ करू नये.
– ऑफिस आणि तिथले काम हे जरी महत्त्वाचे असले तरी ते आपले आयुष्य नाही. त्यामुळे त्यास किती आणि केवढे महत्त्व द्यायचे याचे परीक्षण करणेही जरुरी आहे.
– ऑफिसमधला ताण हाही योग्य त्या मार्गांनी नियंत्रणात आणता येतो. जसे की, कामाच्या मध्ये थोडी विश्रांती (टी/कॉफी ब्रेक), लंच टाइममध्ये शक्य असल्यास मोकळ्या हवेत फेरफटका, टेबलावर शांत बसून गाणी ऐकणे किंवा शांत बसणे.
– काही वेळा ऑफिसमध्ये वादावादीचे प्रसंग घडू शकतात. अपमानकारक बोलणी ऐकावी लागू शकतात. अशा वेळेस शांत राहणे शक्य होत नाही, पण मग ती खदखद योग्य त्या मार्गाने बाहेर काढणे गरजेचे असते. त्यावेळी तिथून थोडय़ा कालावधीसाठी काढता पाय घेणे (Time Out) श्रेयस्कर ठरते.
– काही व्यक्ती त्यांचा ताण /राग हा व्यक्त करत नाहीत. या भावना वेळीच दुसऱया व्यक्तीशी व्यक्त केल्यास कुठल्याही किल्मिषांना अथवा गैरसमजांना जागा उरत नाही. तसेच याचा शरीरावरही विपरीत परिणाम घडत नाही.
– मेडिटेशन अथवा व्यायाम तसेच छंद जोपासणं हेही म्हणूनच महत्त्वाचं झालं आहे.
विक्रम हे सर्व आता अंगीकारायचा प्रयत्न प्रामाणिकपपणे करत आहेत. त्यांना निश्चितच चांगले फळ मिळेल. शेवटी त्यांना एक लक्षात आलं आहे ते हे की, ‘आयुष्य आणि वेळ निसटून गेल्यानंतर आपण पश्चात्तापाशिवाय काहीही करू शकत नाही’.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)





























































