कसे चालते आंग्रीयावर काम..?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> भक्ती चपळगावकर

मुंबई-गोवादरम्यान सुरू झालेली बहुचर्चित आंग्रीया बोट. बोटीवर 24 तास काम करणाऱ्या एकमेव महिला
लीना कामत प्रभू. सांगताहेत कसे चालते आंग्रीयाचे काम…?

सिक्युरिटी गार्ड – मॅडम, शाम के साडे छे बजे के बाद ‘लेडीज’ शिप पर नही जा सकती है. आप इस के आगे नही जा सकती है. ती – क्युं नही, इस मुंबई शहर मे कौन सी ऐसी जगह है, जहां पर महिलाएं काम नही कर सकती है, बताओ.सिक्युरिटी गार्ड – वो हमे मालूम नही, आप नही जा सकती है, ऐसा रूल है पोर्ट का.

रोजच्या या वादावादीने ती कंटाळली होती. शेवटी तिने या पुराणवादी नियमाविरुद्ध लढा द्यायचं ठरवलं. रोज संध्याकाळी मुंबईतली कामं आटोपून समोर उभ्या असलेल्या जहाजात प्रवेश करायच्या वेळी सिक्युरिटी गार्ड अडवत. शिपवर काम करणाऱ्या महिला त्यांनी फारशा पाहिल्या नव्हत्या. तिला तिच्या समोरचे काम दिसत होते. रोज सिक्युरिटी गार्डबरोबर होणारा वाद परवडणारा नव्हता. शेवटी तिने या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावायचे ठरवले. तिने सीआयएसएफच्या आयजींशी थेट संपर्क साधला. त्यादरम्यान तिच्या लक्षात आलं की,  2012 साली हा नियम बदलण्यात आलाय, पण प्रत्यक्षात पोर्टवर काम करणाऱ्यांना याची कल्पना नाही. बायकांनी शिपवर रात्री काम करू नये हा नियम बदलला गेला 2012 साली, पण प्रत्यक्षात अमलात आला ‘तिच्या’ म्हणजेच लीना कामत प्रभू यांच्यामुळे.

 मुंबई-गोव्यादरम्यान सुरू झालेल्या ‘आंग्रीया’ या पहिल्या क्रूझ शिपच्या एक कार्यकारी संचालिका म्हणून लीना कामत प्रभू काम करत आहेत. गेली अनेक वर्षे मांडवी नदीत एक क्रूझ चालते. गोव्यात लोक जातात बीचवर मजा करायची म्हणून, पण फार कमी लोकांना माहीत आहे की, गोव्यात मगरी आणि सी ओटर्सचं वास्तव्य आहे. त्यांचं वास्तव्य असलेल्या ठिकाणीच हा क्रूझ चालते. या क्रूझचं व्यवस्थापन लीना बघतात. खरं तर त्यांनी शास्त्रीय संगीतात एमए केले आहे, पण आता क्रूझ व्यवस्थापन हेच त्यांचे कार्यक्षेत्र आहे.

एक जपानी व्यावसायिक जहाज विकत घेऊन त्याचं रूपांतर मुंबई – गोवा क्रूझ शिपमध्ये करण्याचं भव्य स्वप्न कॅप्टन नितीन धोंड यांनी पाहिलं. बेचाळीस वर्षांचा जहाजावर काम करण्याचा कॅप्टनना अनुभव. एलपीजी गॅस नेणाऱ्या जहाजांचा अनुभव कॅप्टन धोंड यांना आहे. जगातल्या दहाबारा लोकांमध्ये कॅप्टनची गणना होते. वयाच्या चौदा-पंधराव्या वर्षी त्यांनी एक स्वप्न पाहिले, मुंबई- गोव्यादरम्यान क्रूझ सुरू करण्याचं. ते स्वप्न पूर्ण करण्याची संधी त्यांना दोन वर्षांपूर्वी मिळाली. एक जपानी जहाज विक्रीसाठी उपलब्ध होते. आठवडाभरात ते विकत घेण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला. आता क्रूझचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांच्या बरोबर त्यांची अतिशय जवळची मंडळी एकत्र आली. त्यात त्यांची बहीण लीना पण पुढे सरसावल्या. व्यावसायिक जहाजाचं रूपांतर लोकांचं मनोरंजन करणाऱ्या क्रूझ शिपमध्ये करण्याचं मोठं आव्हान या टीमसमोर होतं. जहाजाची अंतर्गत सजावट आणि रचना यावर लीना यांनी लक्ष द्यायचं ठरवलं. या कामी पर्यावरणवादी निर्मल कुलकर्णी यांची फार मोलाची भूमिका होती.

शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सागरी किनाऱ्यांचे महत्त्व ओळखले होते आणि सागरी किनाऱ्याचे रक्षण करणारा त्यांचा ढाण्या वाघ म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रे यांचं नाव जहाजाला देण्यात आले. जहाजावर कान्होजींचे एक भव्य तैलचित्र काढण्यात आले. लोकांच्या मनोरंजनासाठी तीन डेक्स, दोन रेस्टॉरंट्स, डिस्क, स्पा इत्यादी गोष्टी आंग्रीयावर उभारण्यात आल्या. जपानहून हे जहाज आधी गोव्यात आले आणि तिथे दोनतीन महिने थांबल्यानंतर गेले दीड वर्ष ते मुंबईला आहे.

बोटीवरचा पेहराव…

भाऊच्या धक्क्याला लागून आंग्रियाचे प्रवेशद्वार आहे. तब्बल दीड वर्षापासून लीना शिपवरच मुक्कामाला आहेत. सुरुवातीचे दिवस बिकट होते. एवढ्या मोठ्या शिपवर कॅप्टन धोंडाच्या कोअर टीमचे तिसेक लोक होते. त्याशिवाय पेंटर, प्लंबर, सुतार इत्यादी दीडशे लोकांचा ताफा जहाजावर होता. त्यात लीना एकट्या महिला. त्या सांगतात, इतक्या सगळ्या लोकांबरोबर मी एकटी बाई राहत असल्याने काही गोष्टी मी कटाक्षाने पाळल्या. एसी सुरू असलेली एक छोटी खोली जहाजावर होती. ती माझी रुम झाली. त्यात जपानी एसी. आकडे कळायचे नाहीत. टेंपरेचर एकतर पाच किंवा चाळीस, पण तसेही काही दिवस काढले. मी बऱ्याचदा कॅज्युअल पेहराव करते, पण इतक्या लोकांमध्ये वावरताना कुर्तासलवार यांसारखे कपडे घालण्यावर भर दिला. त्यामुळे त्यांच्यातलीच एक होते, तरी तेही अंतर राखून वागत होते.

पेहरावाबद्दल बोलताना एक इंटरेस्टिंग किस्सा त्यांनी सांगितला. संकटप्रसंगी करण्यात येणाऱ्या इव्हॅक्युएशन पद्धतीचे ड्रिल ठरले. जहाजावरून समुद्रात बांधलेल्या राफ्टवर उतरण्यासाठी एका नळीत (शूट) प्रवाशांना उतरवण्यात आले. आतून एका घसरगुंडीतून ते राफ्टवर उतरले. लीना आधी पंजाबी ड्रेस घालून शूटमध्ये उतरल्या. त्यानंतर कॅप्टन धोंड म्हणाले की, जहाजावर येणाऱ्या सगळ्या महिला पंजाबी ड्रेसमध्ये नसतील, काही साड्यांमध्येही असतील. हे ऐकल्यावर लीना यांनी साडी नेसून शूटमध्ये उडी मारली आणि सुखरूप राफ्टवर उतरल्या. अशा प्रकारची इव्हॅक्युएशन व्यवस्था हिंदुस्थानात पहिल्यांदाच आम्ही राबवत असल्याचे सांगायला त्या विसरत नाहीत.