
क्रेडिट कार्ड ही संकल्पना आता सर्वत्र सहजपणे पसरलेली आहे. ऑनलाइनच्या जमान्यात तर क्रेडिट कार्डला चांगलाच भाव आला आहे. अशातच ऍपलसारख्या तंत्रज्ञान विश्वातील दादा कंपनीने या व्यवसायात पाय ठेवल्याने अनेक क्रेडिट कार्ड कंपन्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. 50 वर्षांच्या क्रेडिट कार्डच्या व्यवसायाला एक नवे रूप आणि नव्या सुविधांनी वेगळाच आकार देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे ऍपलने यावेळी नमूद केले आहे. ऍपलचे तंत्रज्ञान, हार्डवेअर आणि उच्च दर्जाने सॉफ्टवेअर यांच्या मदतीने ग्राहकाला क्रेडिट कार्ड वापराचा एक नवाच अनुभव ऍपलच्या सेवेद्वारे मिळणार असल्याचे ऍपलने यावेळी सांगितले. ऍपलचे हे कार्ड व्हर्च्युअल आणि रिअल अर्थात आभासी आणि प्रत्यक्ष कार्ड अशा दोन्ही स्वरूपात प्राप्त करता येणार आहे. व्हर्च्युअल कार्डसाठी ग्राहकाला फक्त आपल्या ऍपद्वारे विनंती पाठवायची आहे आणि त्यानंतर काही वेळातच ग्राहकाला ही कार्डची सेवा उपलब्ध होणार आहे. या सेवेद्वारे तो कार्डच्या वापराने ताबडतोब व्यवहारदेखील सुरू करू शकणार आहे. याच जोडीला ऍपलतर्फे डेली कॅश रिवार्डची योजनादेखील राबवली जाणार आहे. ऍपल पेच्या बाहेरील खरेदीवरती एक टक्का, ऍपल पेद्वारे खरेदीवर दोन टक्के आणि थेट ऍपलकडून खरेदी केल्यास तीन टक्के कॅश खात्यात प्राप्त करता येणार आहे. ही कॅश पुन्हा खरेदी करण्यासाठी किंवा मित्र, नातेवाईकांना गिफ्ट करण्यासाठीदेखील वापरता येणार आहे. फिजिकल अर्थात प्रत्यक्षातले ऍपल कार्ड हे खास सुरक्षा व्यवस्थेने सुरक्षित केलेले असून यावर इतर कार्डप्रमाणे कोणताही कार्ड नंबर, CVV नंबर किंवा सिग्नेचर असणार नाही. प्रत्येक ऍपल कार्डला एक युनिक नंबर दिलेला असून याद्वारे होणार्या प्रत्येक खरेदीसाठी बायोमेट्रिक ऑथेंटेकीशन आणि एक तात्पुरता सिक्युरिटी कोड वापरणे जरूरीचे असणार आहे. बायोमेट्रिक ऑथेंटेकीशनसाठी टचक्रीनद्वारे बोटाचा ठसा किंवा कॅमेर्याच्या मदतीने फेस रेकग्नायजेशनचा वापर करता येणार आहे.






























































