>>प्रसाद ताम्हणकर
दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQघ्) गेल्या दोन आठवडय़ांपासून सतत 450 पातळीच्या वर राहिला आहे. ही पातळी मर्यादेपेक्षा दहापट जास्त आहे. काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या पावसाने वायुप्रदूषणाची पातळी काहीशी कमी झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. तसेही वाहनांची संख्या, औद्योगिक भागातून होणारे वायूंचे उत्सर्जन आणि धूळ यामुळे दिल्लीचा हवेचा दर्जा वर्षभर खालावलेला असतो. यावर विविध उपाययोजना राबवल्या गेल्या. मात्र कोणतीही योजना प्रभावकारी ठरलेली नाही.
सध्या दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील नागरिक गर्द धुक्याच्या चादरीखाली विषारी वायूचा श्वास घेत आहेत. आता या प्रदूषित परिस्थितीवर उपाय म्हणून क्लाऊड सीडिंग अर्थात कृत्रिम पाऊस पाडण्याचा उपाय करून बघायचा विचार इथले सरकार करीत आहे. मात्र या उपायाला केंद्रीय मंत्रिमंडळ आणि सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी आवश्यक आहे. ही मंजुरी त्वरित मिळाल्यास एका महिन्याच्या अवधीत हा उपाय योजता येईल. मात्र त्यासाठी हवामानाची साथदेखील महत्त्वाची असणार आहे.
क्लाऊड सीडिंगला साध्या सोप्या शब्दांत ढगांची पेरणी करणे असे म्हणता येईल. ही पेरणी करण्याची प्रकिया थोडी अवघड असते. या प्रािढयेत मीठ, ड्राय आईस, सिल्व्हर आयोडाइड आणि काही रसायने एकत्र करून विमानाला जोडलेल्या एका खास उपकरणात साठवले जाते. त्यानंतर विमानाला एक विशिष्ट उंचीवर नेऊन ढगांमध्ये त्याची फवारणी केली जाते. आजकाल यासाठी जमिनीवरून हवेत मारा करणारे यंत्रदेखील उपलब्ध आहे. फवारणीनंतर या रसायनांचे कण हे बर्फाच्या केंद्रक कणाचे कार्य पार पाडतात आणि बर्फाचे स्फटिक हे ढगांमध्ये बदलू लागतात. ढगांमध्ये असलेली आर्दता या स्फटिकांना घेरते आणि त्यांना घनरूप प्रदान करते आणि पावसाच्या कणात रूपांतरित करते. अर्थात, या कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी ढगातील आर्द्रता आणि वाऱयाचा वेग हेदेखील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.
दिल्लीत हा प्रयोग राबवण्यासाठी आयआयटी, कानपूरच्या संशोधकांची मदत घेतली जाणार आहे. या संशोधकांनी नुकताच आपला अहवाल सादर केला आहे. कृत्रिम पावसाचा हा प्रयोग दोन टप्प्यांत पार पाडला जावा असे त्यांचे मत आहे. पहिल्या टप्प्यात 300 चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश करण्यात येणार आहे. या प्रयोगात संपूर्ण दिल्ली व्यापतील इतके ढग तयार करणे शक्य नसल्याने काही किलोमीटरचे क्षेत्र प्रथम निवडण्यात आले आहे.
या पावसामुळे हवेतील दूषित कण वाहून जातील आणि हवा अधिक स्वच्छ आणि श्वास घेण्यासाठी निरोगी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या पावसानंतर हवेचे प्रदूषण बरेच कमी झाले होते. त्यामुळे या प्रयोगाच्या यशावर विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र या प्रचंड खर्चाच्या प्रयोगाविषयी काही संशोधक साशंक आहेत. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि धुळीच्या कणांना दाबण्यासाठी वापरण्यात येणारे हे तंत्रज्ञान कितपत उपयुक्त पडेल ते स्पष्ट नसल्याचे त्यांचे मत आहे. अशा पावसामुळे हवेत असलेली प्रदूषणाची पातळी नक्की कमी होते. मात्र 48 ते 72 तासांत ती परत मूळ स्थितीत येते. अशा वेळी हा प्रयोग दिल्लीत किती यशस्वी ठरेल याबद्दल काही संशोधकांना शंका आहे.
कृत्रिम पावसाचा हा प्रयोग तसा बराच जुना आहे. 1960 साली अमेरिकेने व्हिएतनामबरोबर सुरू असलेल्या युद्धात याचा वापर करून व्हिएतनामी लष्कराची रसद तोडली होती. त्या काळात या प्रयोगामुळे मोठय़ा प्रमाणावर वादविवाद घडले होते. हिंदुस्थानमधील काही राज्यांनी, चीन आणि सौदी अरबसारख्या देशांनीदेखील मागील काळात दुष्काळाचा सामना करण्यासाठी हा प्रयोग राबवलेला आहे. प्रदूषणाविरुद्ध या वेळी हा प्रयोग राबवला जाणार आहे. निसर्गाची प्रािढया उलट फिरवण्याचा हा प्रयोग असणार आहे. त्यामुळे हा प्रयोग राबवताना विविध शाखांचे तज्ञ, संशोधक यांची मदत घेतली जावी आणि प्रयोग राबवण्यापूर्वी त्याचे लाभ आणि तोटे यांचा पूर्ण अभ्यास व्हावा अशी इच्छा अनेक संशोधकांनी व्यक्त केली आहे.