सोहळा – घननीळ आषाढ

>> अरुणा सरनाईक

सावळा तो श्याम, सावळाच तो पांडुरंग, सावळीच ती सांज आणि सावळाच तो घननीळ आषाढ! सावळेपणाचं कितीतरी सौंदर्य या आषाढात दिसून येतं. पांढऱया, करडय़ा ढगांना ती सावळय़ा किनारीची जोड, नैसर्गिक सौंदर्याचा उत्कृष्ट नमुना! साराच वेडेपणा, देवाचा ध्यास, क्रियेचा ध्यास, धरतीला आकाशाचा ध्यास! झाडावेलींना पावसाचा पहिला थेंब वेचण्याचा ध्यास! असा ध्यास असतो म्हणूनच जगण्यात आस असते. शहाणपणाचं जगणं बेचव असतं. वेडेपणात जगण्यात एक कैफ असतो. संत काय, कवी काय, प्रियकर काय… वेडेपणाची झिंग आयुष्यभर जोपासली, हाती किती येणार याचा विचार न करता आपली जिद्द पोसली. ती जिद्द, ती आस ही या आषाढाची स्वभावधर्मता.

माणसाला निसर्गाने जे दिलं आहे त्याचं शब्दात वर्णन करता येण्यासारखं नाही. माणसाची निसर्गाशी असणारी जवळीक सर्वश्रुत आहे. निसर्गाच्या या देखण्या रूपातून अनेक प्रकारच्या साहित्यकृती जन्माला आल्या. कालिदासाचं ‘मेघदूत’ हे महाकाव्य यापैकीच एक. आषाढात बरसणाऱया पहिल्या सरींना पाहून त्याने हे काव्य रचलं आणि आता इतकी युगं लोटली तरी ते अजरामर आहे. कालिदासाची प्रतिभा याला कारणीभूत ठरते, त्याचप्रमाणे आषाढाचं घननीळ रूप हे याचं महत्त्वाचं कारण आहे. आषाढाच्या नाना रूपांनी माणसाला नेहमीच तृप्त केलं आहे आणि कितीही वर्षं लोटली तरी आषाढाचं हे रूप असंच देखणं राहणार आहे.

आकाशात हत्तीसारख्या काळय़ा जलौघानं आषाढाची वर्दी दिली… आभाळात धडामधूम धामधूम झाली की आषाढागमनाची आठवण होते. आषाढाच्या पावसाची पहिली सर एकदा तरी अनुभवावी अशीच! आश्रमाच्या मुलींनी कधीतरी गायिलेल्या गाण्याची आठवण दर आषाढात आकाशात काळेभोर जलौघ बघितल्यावर नेहमीच होते आणि हो, महाकवी कालिदासाच्या मेघदूताची ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ ही अवतरणं मनात उमटू लागतात. किती विलक्षण कवीकल्पना, पराकोटीची भावभीनता! कसं सुचलं असेल कालिदासांना इतकं तरल, इतकं कोमल! युगं लोटली, पण ही निसर्गाची किमया आणि शब्दबद्ध करणारा कवी आपल्या सामान्यांच्या आकलनापलीकडील आहे आजही. ऋतुबदलाबरोबर मनात या गोष्टी रेंगाळत असतात. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, बदलत्या प्रहरी मनाशी संवाद साधत राहतात. या सर्वव्यापी भावना प्रत्येक सजिवाला तरल, मृदु बनवतात आणि मग त्यांची काव्य, लोककथा, महाकाव्य तयार होऊन आपल्याला नित्य आनंद देतात.

निसर्गाशी आपलं नातं अगदी जवळकीचं आहे. प्रांतोप्रांतीच्या लोकगीतात बारामासाची गीतं विशेषत्वानं दिसून येतात. यातही चौमासा याची रचना ठळक आहे. चौमासा म्हणजे चार मास. हे पावसाळी महिने. हे महिने म्हणजे ज्येष्ठ, आषाढ, श्रावण आणि भाद्रपद होय. भावनेला भाषेचं बंधन नसतं. मग ती कोणतीही भाषा असो! प्रेमभावना, विरहभावना या भाषातीत आणि कालातीत आहेत. आकाशातील पावसाची धार आणि मनात उठणारा भावनेचा कल्लोळ सहज शब्दातून व्यक्त होतो आणि कोणत्याही अडसराशिवाय तो मानवी मनामनात झिरपून निसर्गातून व्यक्त होतो. विरही प्रेम नेहमीचं काहीतरी अजरामर कार्य करून जातं. याचं मूर्तिमंत उदाहरण कालिदासाचं ‘मेघदूत’ आहे.

चौमासात पडणाऱया पावसाची जातकुळी वेगवेगळी असते. ज्येष्ठात कधीमधी पडणारा पाऊस समंजस वाटतो. तप्त उन्हाच्या काहिलीत तापलेल्या तनमनाला शांतवतो. आता आषाढ येणार अशी चाहूल देतो. श्रावणातला पाऊस एक वेगळा आविष्कार देतो. तो सवयीचा झालेला असतो. ओल्या स्पर्शाची नव्हाळी संपत आलेली असते. सणावाराची वर्दळ सुरू झालेली असते. सोसलेल्या उष्ण खुणांवर शीतलतेची गरज असते.

ज्येष्ठाच्या पांढुरक्या ढगांचं दिमाखदार पोरवय ओसरत जातं आणि आषाढातील प्रौढ, जलाने भरलेल्या, पयोधात त्यांचं रूपांतर होतं. ज्येष्ठातच येणार येणार म्हणून गाजणारा अवचित येणारा पाऊस आषाढ लागताच दाराशी येऊन थांबतो. तप्त तलखीचा ग्रीष्म वर्षेशी दोस्ती करतो. पांढऱया मेघमाळांचा रंग जांभळा, काळा, करडा दिसू लागतो. दिवसभर, कधी गर्जनेसहित मेघ बरसत राहतात. जुन्या आठवणीत रमण्याचे, कुठेतरी, कधीतरी घाईघाईने वेडय़ावाकडय़ा अक्षरात उमटवलेले कवितेचे चार-दोन तुकडे सारा दिवस पडणाऱया पावसाच्या सोबतीनं शोधत राहण्याचे आणि ते सापडल्यावर स्वतःशीच हसत राहण्याचं पाखरवय पुन्हा फिरून प्रौढनसात परतून येतं. आकाशात काळय़ा काळय़ा जलौघांची दाटी होत जाताना सरींवर सरी कोसळू लागतात. थेंबाथेंबातून का होईना, आकाश धरणीला बिलगू पाहतं. जलधारांनी सारी सृष्टी चिंब भिजते. तिला सुखाचंसुद्धा ओझं होतं. सुख तरी किती घ्यायचं, असा प्रश्न विचारत निवांतपणे आपलंच रूप रस्त्यावर जागोजागी जमलेल्या पाण्यात निरखत राहते. सतत पाऊस पडत राहतो. मग कधीतरी एखाद्या क्षणी अतिशय थकून तो थांबतो. तरी मनाच्या आकाशात पावसाचं झिरपणं सुरूच राहतं. अशा झिरपण्यातून आठवणींच्या पागोळय़ा मनाच्या वळचणीला सतत ठिबकत राहतात. त्यातील तालबद्धतेवर मग आपोआपच कोण आपलं, कोण परकं या विचाराचं मंथन सुरू होतं. मंथनातून हाती लागणारं सारंच काही अमृतमय नवनीत नसतं. काही न पचणारं आपण केलेल्या चुकांचं हलाहलदेखील असतं. जे हलाहल पचवण्यासाठी महादेवासारखी निष्ठा हवी. स्वतःवर विश्वास हवा. यातूनही मनाला लागणारी हुरहुर कमी होत नाही. हसत्या बालवयातला पाऊस यौवनात झिरपत येतो कधी ते कळतच नाही. तारुण्यातील मदमस्त आषाढ प्रौढ वयात कधी नकळत आणून सोडतो हेही कळत नाही. ही सारी किमया आषाढाची. क्षणात बालपण, क्षणात पाखरवय तर क्षणात प्रगल्भ समंजस वय. तरी त्या समंजस वयात या साऱया आठवणींच्या महोत्सवात रमवण्याची ताकद जबरदस्त आहे.

भिजे पावसाने जरी अंग सारे!
उफाळून येती उरीचे निखारे!!

अशी आग आणि पाण्याची विलक्षण विरही रस्सीखेच नकळत घायाळ करते.

आपली प्रतिक्रिया द्या