लेख : लोकगीतांमध्ये अठ्ठावीस युगे उभा असलेला विठ्ठल!

511

>> वैजयंती कुलकर्णी

ज्ञानेश्वरांपासून सर्व संतांनी विठ्ठलाला माऊलीम्हटले आहे. माऊलीच्या स्वरूपात विठ्ठलाची आळवणी अनेक संतांनी केली आहे. या विठ्ठलाचे प्रतिबिंब आपल्या लोकसाहित्यातही आहे. लोकसाहित्य म्हणजे समाजमनाचा स्वाभाविक आविष्कारच आहे. संताच्या पावलावर पाऊल टाकून या लोकसाहित्यात जनमानसाने विठ्ठलाला आळवले आहे. दंतकथा प्रादेशिक कथा त्या त्या ठिकाणातील लोकांच्या मुखातूनच आलेल्या असतात. त्यातूनच समाजजीवन कळते. लोककथातील, लोकगीतांतील विठ्ठल लोकांच्या मनामनात युगानुयुगे ठसला आहे.

पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचं अत्यंत प्रिय दैवत. आपल्याकडे अनेक दैवतांची क्रतवैकल्ये केली जातात. तरीसुद्धा उपासकांच्या मनांत भक्ती आणि भीती या भावना असतात. भीती वाटते म्हणजे आपली उपासना योग्य पद्धतीने होईल का नाही? पण विठ्ठलावरची भक्ती वेगळी आहे. विठ्ठलाविषयी भीती, कोप या कोणत्याच भावना नसतात. कारण तो आपलाच वाटतो. तो संकटात आपल्या मदतीला धावून येईल, दुःखाच्या वेळी आपले सांत्वन करील तसेच आपल्या आनंदाच्या प्रसंगी तो आपल्या आनंदात सामील असेल. विठ्ठलाविषयी भक्ताच्या मनात खात्रीच असते. त्यामुळेच ज्ञानेश्वरांपासून सर्व संतांनी विठ्ठलाला ‘माऊली’ म्हटले आहे. माऊलीच्या स्वरूपात विठ्ठलाची आळवणी अनेक संतांनी केली आहे.

या विठ्ठलाचे प्रतिबिंब आपल्या लोकसाहित्यातही आहे. लोकसाहित्य म्हणजे समाजमनाचा स्वाभाविक आविष्कारच आहे. संताच्या पावलावर पाऊल टाकून या लोकसाहित्यात जनमानसाने विठ्ठलाला आळवले आहे. लोकसाहित्यातील प्रमुख भाग म्हणजे लोकगीते आणि ओव्या. त्यातील लोकगीते, ओव्या स्त्री मनाचा आविष्कार आहे. दळताना, कांडताना, सडासंमार्जन करताना, शेतात काम करताना, घरातील दैनंदिन कर्तव्ये पार पाडताना, त्याच्या भावनांचा सहज गुणगुणण्यातून जो आविष्कार झाला ती स्त्रीगीते ओवीच्या रूपात प्रगट झाली. या गायलेल्या ओव्या समाजजीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श करतात. तसेच त्या अध्यात्माच्या पातळीवर जातात. पंढरपूर विठ्ठलाचे तर त्या लोकगीतांतून दर्शन होत राहते. लोकगीतांतून पंढरपूरविषयीची ओढ आणि आपल्या विठूरायाची नगरी म्हणजेच पंढरपूर! तिथे जाण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. आपल्याला विठूमाऊली कधी दिसेल असे भक्तांना वाटत असते. ‘जिवाला वाटतं, पंढरीला जावं! आई-बापाला भेटू यावं अशी या स्त्रीमनाची इच्छा असते, पण प्रत्येकीलाच या संसाराच्या रगाडय़ात जमत नाही. अशा वेळी रुक्माबाईला सांगावा धाडला जातो, विनवणी केली जाते. ‘बाई गं मला आखाडी बारशीला मूळ धाड,’ पंढरीला गेल्यावर सर्वच अपूर्व असते.

‘‘पंढरीसी जाता                पंढरी पिवळी

आत मूर्त सावळी               विठ्ठलाची

पंढरपुरा जाता                 भेटीला काय नेऊ

तुळशा बुक्क्याची              विठ्ठला प्रीत बहु

पंढरीचा राणा                  चला पाहावया जाऊ

संसारात होऊ                  कृतकृत्य’’

अशा पंढरपूरला जाताना, थंडी, वारा, पाऊस, ऊन यांचं भानच राहत नाही. दुखणं-खुपणं तर दूरच पळतं. पंढरीच्या दर्शनानेच सर्व शिणवटा नाहीसा होतो असं वाटतं. –

‘‘जाईन पंढरीला               उभी राहीन घोडय़ावरी

नजर माझी गेली               रुखमीनीच्या गोंडय़ावरी

काय पुण्यं केलं                  पंढरीच्या तूं ग इटं

देवा विठ्ठलाचं                   पाय सापडलं कुठं’’

या स्त्र्ायांना पंढरपूर तर आपलं माहेरच वाटतं. म्हणूनच ती आपल्या सर्वांना सांगते-

‘‘पंढरीला जाया जातो, म्हनूनी ऱहाऊ नका

देवा माज्या विठ्ठलाला वाट बघाया लावू नका.’’

काशीपेक्षा पण श्रेष्ठ असलेले पंढरपूर एकदा तरी पाहण्याची ओढ या लोकगीतांतून होत राहते, तर ज्यांना काही कारणांनी जाता येत नाही. अशी लोकगाण्यांतून व्यक्त होते.पंढरी पंढरी नाही । पाहिली अजून । आहे कोणत्या बाजूनं ।’’

अशा या विठ्ठलाला भक्ताचं प्रेम खूपच आहे. लोकगीतांत अठ्ठावीस युगं उभा राहिलेला विठ्ठल याविषयी पण भक्तांची खूपच गाणी आहेत. युगानयुगे भक्तांची वाट पाहणारा विठ्ठल लोकगीतांत अनेक ठिकाणी दिसतो. ओवी आणि लोकगीतांतून त्यावेळच्या समाजाचे दर्शन घडते तसेच ते लोककथांतूनही होते. कहाणी, दंतकथा, लोककथा लोकसाहित्यातच आहेत. कहाण्यांतून तर स्त्री मनाचं प्रतिबिंबच दिसते. अनेक दंतकथा – प्रादेशिक कथा त्या त्या ठिकाणातील लोकांच्या मुखातूनच आलेल्या असतात. त्यातूनच समाज जीवन कळते. लोककथातील, लोकगीतांतील विठ्ठल लोकांच्या मनामनात युगानुयुगे ठसला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या