शब्दमुद्रा – लोककलांचा कैवारी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप देशपांडे

अशोकजी परांजपे यांची आणि माझी पहिली ओळख झाली ती साहित्य संस्कृती मंडळाने आयोजित केलेल्या नवलेखक शिबिरात. 1982 सालात ते बोर्डी तालुका डहाणू इथे झाले होते. मी शिबिरार्थी होतो. अशोकजी शिबिरात मार्गदर्शक होते. दुसऱयांदा भेट झाली ती जळगावच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात. मी सहचिटणीस होतो. संमेलनात लोककला लोककलाकारांचा कार्यक्रम होता. त्यावेळी ते आयएनटीचे संचालक होते आधीची ओळख असल्यामुळे त्यांनी मला मंचावर सहकार्यासाठी बोलवले होते. त्यावेळेस अनेक लोककलाकारांना जवळून पाहता आले. त्यांच्याशी संवाद झाला. तेवढय़ा वेळातही अशोकजींनी काही कलाकारांशी माझा परिचय करून दिला. शाहीर विठ्ठल उमप हे कार्यक्रमात होते.

अशोकजींचा मुळातच स्वभाव गप्पिष्ट. ते गप्पांमध्ये रंगून जात याचा अनुभव मला शिबिराच्या काळात आला होताच. शिबिराचे ठिकाण समुद्रकिनाऱयाजवळ असल्याने बऱयाच वेळा रात्री समुद्रकिनाऱयावर गप्पा करत आम्ही वेळ घालवायचो. त्यांचे बोलणे समोरच्याला गुंगवून टाकायचे. एक वेगळाच आनंद त्या गप्पागोष्टींमधून मिळायचा हे मात्र नक्की. संवेदनशील मनं, प्रतिभा, सर्जनशीलता, कामावरचं प्रेम, निष्ठा अनेक गुणांचं मिश्रण त्यांच्यात होतं

‘अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर…’, ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर… चंद्र व्हा हो पांडुरंगा मन करा थोर…’. ‘केशवाचे भेटी लागलेसे पिसे…’, ‘पाहू द्या रे मज विठोबाचे रूप, तुझिया गे चरणीचा झालो… ही नाटय़गीते. ‘दीनांचा कैवारी दुःखीतांचा सोयरा…’, ‘नाम आहे आदि अंती… विनायका हो सिद्ध गणेशा… अशा गीतांमधून रसिक भक्तिभावाने भक्तिरसात चिंब भिजतात. तर ‘केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर…’, ‘नाविका रे वारा वाहे रे…’, ‘एकदाच यावे सखया’, ‘पाखरा जा दूर देशी…’, ‘वाट इथे स्वप्नातील…’, ‘पैलतीरी रामा माजी…’, ‘कोणीतरी निंदावे वा वंदावे…’, ‘सहज तुला गुपित एक…’, ‘दारी पाऊस पडतो रानी पारवा भिजतो…’ या भावगीतांतून रसिक एका वेगळय़ाच भावविश्वात निघून जात असल्याचा अनुभव येतो.

‘नाविका रे वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे…’ अशोकजींचे शब्द, अशोक पत्की यांचे संगीत आणि सुमन कल्याणपूर यांचा गोड आवाज असे मिश्रण असलेले गाणे खूपच लोकप्रिय झाले. 1975 सालचा उत्कृष्ट गीतांचा पुरस्कार त्याला मिळाला. समुद्रकिनारा, त्या पाण्याची निळाई, किनाऱयावरची नारळाची झाडे, तो नावाडी… सगळे चित्र नाविका रे, वारा वाहे रे… गाणं ऐकताना डोळय़ासमोर उभे राहते. तर केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर गाणं ऐकताना मोराचं नृत्य डोळय़ासमोर उभं राहतं. ‘अवघे गरजे पंढरपूर…’ आणि पाहू द्या रे मज विठोबाचे रूप… ऐकता ऐकता आपण पंढरपूरला वारकऱयांमध्ये सामील होऊन जातो हे लक्षातही येत नाही.

1978 साली इंडियन नॅशनल थिएटर (आयएनटी)मध्ये लोककला विभागाचे संचालकपद त्यांना मिळाले. लोककलावंतात रमणारे अशोकजी लोककला आणि लोककलाकारांत नेहमीच नावीन्याचा शोध घेत असत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी लोककलावर आधारित संशोधन नाटय़े मराठी रंगभूमीवर आणली. दशावतारी राजा, वासुदेव सांगतो जांभूळ आख्यान, खंडोबाचं लगीन, आतून कीर्तन वरून तमाशा, लोकनाटय़े आयएनटीने अशोकजींच्या संकल्पनेतून सादर केली. त्यांनी लोककला, लोकगीते, लावण्यांचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी ग्रामीण भागात भरपूर भ्रमंती केली.

लोककला, लोककलावंतांचा शोध घेतला. ग्रामीण कलावंतांचे अनेक कार्यक्रम मुंबईत सादर करून त्यांना उत्साहित, प्रोत्साहित केले. त्यात परभणीचे गोंधळी राजाभाऊ कदम, शाहीर विभुते, दशावतारी वारली चित्रकार अशा अनेक कलाकारांना त्यांनी पुढे आणले. ते नेहमीच म्हणायचे, आपले काम प्रतिष्ठतांसारखे नाही, पण तळागाळातल्या कलांना आणि कलाकारांना प्रतिष्ठा मिळवून देणारे नक्कीच आहे. दार उघड बया दार उघड, बुद्ध इथे हसला, संत गोरा कुंभार, अबक दुबक, संत कान्होपात्रा ही नाटके त्यांनी लिहिली. लोककलांमध्ये रमणारा, कलाकारांसाठी सतत झटणारा असा हा प्रतिभावंत कलाकार होता. आयएनटीमध्ये कार्यरत असताना त्यांनी 1982 मध्ये पंढरपूरला भक्तीसंगीत महोत्सव आणि 1985 मध्ये आनंदवनला महाराष्ट्र आदिवासी कला महोत्सव आयोजित केले होते. सर्व विचारवंत, कलाकारांना एकत्रित आणले. त्यांच्या कार्याची नोंद फोर्ड फाऊंडेशनने घेतली. आंतरराष्ट्रीय लोककला संस्था आयओव्हीचे सदस्यत्व त्यांना मिळाले. या माध्यमातून त्यांनी अनेक लोककलावंतांना परदेशात जपान, फ्रान्स, आयर्लंडमध्ये आपली लोककला सादरीकरणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्यात निर्मिती केली. सांगली जिह्यातील हरिपूरचे असलेले अशोकजी नंतरच्या काळात शांतपणे जीवन व्यतित करण्यासाठी मुंबई सोडून संभाजीनगरला आले. पण काय कोण जाणे, हा प्रतिभावंत कलाकार 9 एप्रिल 2009 रोजी एका वेगळय़ा वाटेने रसिकांच्या मनाला चटका लावून निघून गेला, त्यांची गीते, कलाकृती आपल्यासाठी मागे ठेवून…

n [email protected]