
>> रजनीश राणे
‘स्वामी समर्थां’ची सीडी करत होतो. सुरेश वाडकरांची चार गाणी यांच्या जुहू येथील स्टुडिओतच रेकॉर्ड करावीत असा वाडकरांचा सांगावा आला. त्यामुळे गाण्यांचा मास्टर ट्रक घेऊन आम्ही स्टुडिओत पोहोचलो. गाणी रेकॉर्डही झाली. स्टुडिओचा दरवाजा उघडून बाहेर आलो तर समोरच अशोक काका उभे. हे अशोक काका म्हणजे ख्यातनाम संगीतकार अशोक पत्की. यांच्याही गाण्यांचे रेकॉर्डिंग समोरच्याच स्टुडिओत सुरू होते. ख्यालीखुशाली झाल्यावर त्यांना घेऊन वाडकर आत आले आणि म्हणाले, ‘ऐकव रे ती गाणी.’ काकांनी गाणी ऐकली आणि आमच्या तरुण संगीतकार मित्राला शशिकांत मुंबरे याला मिठीच मारली. सुंदर झाली आहेत गाणी. या गाण्यांमध्ये भक्ती जाणवतेय.
अशोक पत्की यांच्याबद्दल काय आणि किती लिहावे हा तसा प्रश्नच आहे. कारण सुगम संगीताला एक वेगळा आयाम देणारे हे व्यक्तिमत्त्व. वृत्तपत्रांमध्ये, खासगी वाहिन्यांवर इतरांनी त्यांच्याबद्दल आतापर्यंत बरेच काही सांगून झाले आहे. त्यामुळे हा लेखनप्रपंच करताना नवं काही सापडतं का याचा आत्मशोध सुरू होता.
पत्की हे पक्के मुंबईकर आहेत. म्हणजे बालपण चाळीमध्ये हुंदडण्यात गेले. महापालिकेच्या शाळेत शिक्षण झाले, पण शिक्षणात त्यांचे मन काही रमले नाही. लहानपणापासून हार्मोनियम आणि तबला वाजवण्याची आवड. सुरुवातीला शेजारच्या काकांकडे आणि नंतरच्या काळात तेव्हाचे स्ट्रगलर सुधीर फडके यांच्याकडे जाऊन पत्कींनी ही आवड जोपासली. पाटीवर धुळाक्षरे गिरवण्यात काही हशील नाही हे जाणवलेल्या पत्कींनी हार्मोनियम आणि तबल्यावरच सारेगम लिहिले.
अशोक काकांचे सांगीतिक शिक्षण झालेले नाही हे कुणाला खरेही वाटणार नाही, पण ते सत्य आहे. सुरुवातीच्या काळात म्हणजे ज्याला संघर्षमय जीवन असे म्हणता येईल त्या काळात त्यांनी जितेंद्र अभिषेकीबुवांचे सहाय्यक म्हणून भूमिका निभावली. अभिषेकीबुवा नाटकांना संगीत द्यायचे. पत्की काकांनी यासाठीच बुवांची संगत धरली. बुवांनंतर एसडी बर्मन, आरडी बर्मन, शंकर जयकिशन यांच्याकडे त्यांनी सहाय्यक म्हणून काम केले. पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी त्यांना आकाशवाणीवर सर्टिफाइड संगीतकार बनवले. पत्कींचा प्रवास असा सुरू होता, पण या महामार्गावर येण्यासाठी त्यांना अनेक खाच-खळगे पार करावे लागले.
अशोक पत्की यांनी स्वतंत्र संगीतकार म्हणून काम सुरू केले. तेव्हाचा काळ हा मराठी रंगभूमी आणि चित्रपटांसाठी सुगीचा काळ होता. नाटय़संगीत हे केवळ आलाप आणि रागदारी गायनात किंवा पार्श्वसंगीतात अडकले होते. पत्कींनी नाटय़संगीताला सुगमगायनाचे रूप दिले आणि त्यांचा हा प्रयोग अफलातून गाजला. नाटकाची गाणीही गाजतात आणि त्यावरही नाटक चालते हे पत्कींनी मराठी नाटय़रसिकांना दाखवून दिले. मोरूची मावशी, ब्रह्मचारी, एका लग्नाची गोष्ट ही पत्कींनी संगीतबद्ध केलेली नाटके ही उदाहरणे आहेत. ऑर्केस्ट्रेशन हा त्यांच्या संगीताचा कधीच आत्मा नव्हता. साधी, सोपी, पण अनवट चाल आणि त्यातून शब्दांची जादुगिरी असे काहीतरी भन्नाट तयार व्हायचे. त्यांची सुरांवर हुकूमत नाही तर सुरांना जणू त्यांची दहशतच वाटायची! सुरांमधील असूरही त्यांचे गुलाम होतात आणि मग ‘मिले सूर मेरा तुम्हारा’सारखे ‘अनऑफिशियल राष्ट्रगीत’ तयार होते.
खरे तर जाहिरातीची गाणी म्हणजे ज्यांना ‘जिंगल’ म्हटले जाते ते तयार करणे हे तसे कठीणच. म्हणजे अवघ्या 10 सेकंदात तुम्हाला श्रोत्यांच्या-वाचकांच्या ओठावर रुळणारे गाणे द्यायचे असते. पत्की यांनी हे काम लीलया केले. त्यांनी दहा-बारा नव्हे तर तब्बल 5000 जिंगल्स तयार केली आणि ती गाजवलीही. धारा धारा शुद्ध धारा, झंडुबाम, संतूर साबण…ही जिंगल्स त्यांच्याच जादुई संगीताची कमाल आहे. त्यांचा चित्रपट संगीतातील वावरही अलौकिकच आहे. एकीकडे पडद्यावर धांगडधिंगा सुरू असताना त्यांनी चित्रपट गीतांमधील सुगमपणा जपला.
पत्की काकांचे मराठी मालिकेतील प्रयोगही गाजले. मालिकांची शीर्षकगीते गाजवण्याचे मोठे काम त्यांनी केले. गोटय़ा, वादळवाट, आभाळमाया या मालिकांची शीर्षकगीते आजही मराठी रसिक गुणगुणतो ते उगीच नव्हे! मराठी संगीतात अनेक जोडय़ा गाजल्या. गीतकार अशोक परांजपे आणि संगीतकार अशोक पत्की अशीच एक जोडी. सुगम आणि भावसंगीत या दोघांनाही समृद्ध केले. अशोक पत्की या पकक्या मुंबईकराचा सांगीतिक प्रवास विलक्षण आनंददायी आहे. अनेक वर्षे या स्वरधारा कोसळत आहेत आणि रसिक त्यात चिंब भिजत आहेत. पत्की काकांच्या जिंगलमध्येच सांगायचे तर ‘धारा धारा स्वरधारा!’





























































