
>> अतुल द. फणसे
ग्वाल्हेर घराण्याच्या थोर गायिका, पंडिता श्रीमती मालिनी राजूरकर यांच्या निधनाची बातमी समजली व अनेक भावनिक स्मृती मनात दाटून आल्या, माझे वडील दत्तात्रय ग. ऊर्फ काकासाहेब फणसे हे दूध, मिठाई व्यवसायात होते, तरी संगीत नाटपं पाहणे, शास्त्रीय संगीताच्या मैफली ऐकणे हे त्यांचे सुखनिधान होते. बालगंधर्व हे तर त्यांची मर्मबंधातली ठेव होती. या वेडामुळे अनेकानेक गायक-गायिकांच्या मैफली ऐकणं, स्वतः अशा मैफली आयोजित करणं, त्यात मित्रजनांना सहभागी करून घेणं हा त्यांचा मोठाच छंद होता.
1969 साली आम्ही कुटुंबीय लालबागलाच नव्या जागेत राहायला गेलो, तेव्हा कुणातरी गायकाची मैफल करायचं त्यांनी मनावर घेतलं. आमच्या घरातलेच असलेले ख्यातनाम तबलजी वसंतराव आचरेकर यांनी माझ्या वडिलांना त्यावेळी नव्याने पुढे येत असलेल्या मालिनीबाईंचे नाव सुचवलं व त्यानुसार 30 डिसेंबर 1969 रोजी आमच्या घरी मालिनीबाईंची (मुंबईतली पहिली) मैफल झाली. त्यावेळी मालिनीबाई यांच्यासोबत जे ऋणानुबंध जुळले ते कायमचे. त्यानंतरही काहीना काही निमित्ताने त्यांच्या 3-4 मैफली आमच्याकडे झाल्या व दरवेळी त्यांच्या ऋजू स्वभावाचा अनुभव आला. त्या मैफलीत जितक्या जोरकसपणे गात असत, तितकाच त्यांचा स्वभाव अत्यंत हळुवार व प्रेमळ होता. ग्वाल्हेर गायकीचं यथार्थ सादरीकरण करण्याबरोबरच नाटय़गीते, टप्पा ही त्यांची वैशिष्टय़े होती. नाटय़गीत सादरीकरणाचा त्यांचा अनोखा ढंग खूप रंजक होता. त्यांच्या गायनशैलीत आक्रमकता दिसली तरी रंजकता व स्वरवैविध्य यामुळे नेहमीच मन सुखावत असे. त्या जरी लोकप्रिय गायिका होत्या तरी लोकानुनयापासून नेहमीच दूर राहिल्या. अमुक एक गानपद्धती रसिकांना आवडते आहे म्हणून त्यापाठी न लागता आपल्या गाण्याने श्रोते अधिकाधिक कसे खूश होतील यासाठी त्या सजग असायच्या. म्हणूनच त्यांनी कधी निराशा केली असं घडलं नाही. रागाची ठरावीक मांडणी न करता आपल्या गानकाwशल्याने ते तजेलदार कसं होईल याबाबत त्या जागरुक असत.
माझ्या वडिलांच्या अकाली निधनानंतर त्यांचं आम्हां कुटुंबीयांवर लक्ष होते व मुंबईला आल्या की, भेटायला जमलं नाही तरी नेहमीच पह्न करून ख्यालीखुशाली विचारत असायच्या. त्यांचा निगर्वी स्वभाव, प्रसिद्धीपराङ्मुखता व साधेपणा हा अनुकरणीय व वाखाणण्याजोगा होता.
गणित विषयात पदवी मिळवल्यामुळे त्यांच्या गायकीमध्येही अचूकता होती. टप्पा, तराणा या गान प्रकारात त्यांचे मात्रांचे गणित अचंबित करणारे असे. उदा. ‘लालवाला जोबन’, ‘ओ मिया वे जानेवाले’ हे टप्पे. ‘यतिमन मम मानीत’, ‘नरवर कृष्णा समान’, ‘प्रीती जगी या’ ही त्यांची नाटय़गीते श्रवणीय ठरली आहेत. ‘नभ निकस गयो’ (मालपंस),‘बालमवा परदेस’, ‘म्हरो मनरो’ (चारुकेशी), ‘शिवहरा रे भवहरा’ (अल्हैय्या बिलावल) या त्यांच्या बंदिशी ऐकून कान तृप्त होतात. आपले पती / गुरू वसंतराव राजूरकर यांच्याकडून मिळालेला ज्ञानरूपी वसा मालिनीबाई यांनी समर्थपणे पुढे नेला असं म्हटलं तर ते गैर ठरू नये.
आज त्या या नश्वर जगातून निघून गेल्या असल्या तरी त्यांच्या गायकीचा नंदादीप त्यांच्या ध्वनिमुद्रिकांच्या रूपाने सदैव तेवत राहणार आहे यात शंका नाही.






























































