
>> संजीवनी धुरी-जाधव
डॉ. विजया वाड. अखिल भारतीय विश्वकोशाच्या माजी अध्यक्षा, निवृत्त शिक्षिका, सदाबहार लेखिका आणि आम्हा सगळ्यांच्या आवडत्या विजूताई… निवृत्तीनंतरची त्यांची सेकंड इनिंगही तितकीच आल्हाददायी आणि सुखावणारी… नुकतंच त्यांचं 126 वं पुस्तक प्रकाशित झालं… त्या निमित्ताने या छान गोड व्यक्तिमत्त्वाशी मारलेल्या गप्पा….
शब्द ही माझी बाळंच आहेत. आईपणासारखे त्यांच्या सोबत असताना मला खूप आनंद होत असतो. त्यांच्याबरोबर असताना मला ते काम आहे असे वाटतच नसल्याचे सांगतायत प्रसिद्ध ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया वाड.
विजया वाड यांचे ‘प्रिय आई-बाबा’ हे 126 वे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. पालकांच्या अनेक समस्यांची उत्तरे या पुस्तकातून मिळणार आहेत. या पुस्तकाविषयी त्यांना विचारले असता त्या म्हणतात माझं आता 126 वे पुस्तक आलं याचा आनंद वाटतोय. चार वर्षांत पंचवीस पुस्तकं झाली. आपल्या आवडत्या गोष्टीची साथ लाभणं म्हणजे परमेश्वराचीच अखंड साथ आपल्याला मिळणं याच्यासारखे भाग्य नाही. त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक संघर्ष पाहिले त्याबाबत त्या सांगतात. त्यांना असं वाटतं की, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत माणसाचा संघर्ष चालूच राहतो. जीवन हे संघर्षाचे स्थान आहे. असं काही नाही की आपला प्रत्येक संघर्ष हा त्रासदायक असतो, कितीतरी संघर्ष आनंदाची पोच पण देतात, तर कधी कधी असं होतं की प्रत्येक कलाकृतीचे एक वेगळं यश असतं. माझी 125 पुस्तकं निघाली त्यातल्या प्रत्येक पुस्तकाने मला अस्मानापर्यंत नेऊन ठेवले असे नाही, पण काही पुस्तकांनी तर ठेवले. काही पुस्तकांना वाचकांनी डोक्यावर घेतले. ‘पैठणी’ हे माझं पुस्तक वाचून पंचेचाळीस वर्षांचे सगळे वाचक म्हणतात की, आमच्या जगण्याला बळ दिले. ही कादंबरी प्रत्येक तरुणीला बळ देते. एखादी कादंबरी आपल्याला वाचकांपर्यंत घेऊन जाते. सुदैवाने मला तरुण वाचक वर्ग लाभला आहे. तो मिळणं आता मुश्कील झालं आहे. पण मी नवीन माध्यमांचा तिरस्कार न करता त्याचा अत्यंत प्रेमाने वापर केल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकले. माझ्या अनेक गोष्टी फेसबुकवर टाकल्यावर लक्षावधी वाचक मिळाले. त्यामुळे नवीन माध्यमांचे चांगले अनुभव आले.
विश्वकोशाच्या घराघरात पोहचविण्यासाठीही त्यांनी मोलाची कामगिरी केली त्याविषयी विचारले असता त्या पुढे म्हणाल्या , विश्वकोशाचे काम मी पूर्ण केलेले आहे. विश्वकोशाचा ज्या तर्कतिर्थांनी प्रकल्प सुरू केला होता त्याचे ‘ज्ञ’पर्यंत वीसही खंड मी केले. त्यांनी ‘अ’पासून सुरुवात केली आणि मीं ‘ज्ञ’वर संपवला. तर्कतिर्थांनी पंधरा खंड केले. सोळावा खंड ने.प्यु.रेग्यांनी केला आणि सतरा, अठरा, एकोणीस, वीस पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे पाच खंड माझ्या हातून घडले आणि विश्वकोशाची परिपूर्ती झाली. त्यानंतर विश्वकोश संकेतस्थळावर टाकल्याने तो घराघरात पोहोचला त्याचे समाधान असल्याचेही त्या सांगतात. विश्वकोशाला महाराष्ट्र शासनाचा प्लॅटिनम, कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय पुरस्कार, आशियाई मंथनचे मानांकन मिळाले होते आणि विश्वकोषाची 38 मिनिटांची मी एक फिल्म केली होती आणि विश्वकोशाचे अभिमान गीत केले होते. सुबोध भावेवर चित्रित, शंकर महादेवनने गायले आहे आणि अशोक पत्कींनी संगीत दिले आहे. विश्वकोशाच्या संकेतस्थळाला पंधरा लाख लाइक्स आहेत. सि-डॅकने यात रस घेतला होता. चार मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली हे चार विश्वकोश आणि दोन कुमार कोश निघाले. अंधांचा ब्रेलकोश निघाला, ऑडिओकोश निघाला. त्यासाठी सात नामवंत शास्त्रज्ञांनी मदत केली.
त्यांच्या मते फक्त लिखाण करणे म्हणजे सगळे नाही तर त्याबरोबरच आपले आरोग्य चांगले असणे महत्त्वाचे असते. ते जर नीट असेल तर लिखाणाला आणखी बळ येते. त्यासाठी त्या नियमित सकाळी चालायला जातात. शक्य होईल तितके चालतात. एवढंच नाही तर त्या खवय्या आहेत. त्या सगळं खातात पण प्रमाणात. गुलाबजाम, अक्की रोटी हे पदार्थ प्रचंड आवडत असल्याचे त्या सांगतात.
विजया वाड यांच्या मधुर बोलण्याने सगळ्यांनाच त्या आवडतात. त्यांच्या मधुर बोलण्याचे गुपित त्यांना विचारले असतात त्यांना त्यांच्या आईकडून हा वारसा मिळाल्याचे त्या सांगतात. प्रेम द्यावं आणि प्रेम घ्यावं यावर त्यांचा फार विश्वास आहे आणि त्यांची आई तशीच होती. तो वसा त्यांच्या आईने त्यांना दिला असल्याचेही त्या प्रांजळपणे मान्य करतात.
शब्दच त्यांचा आनंद आहे…
माझे शब्दच माझ्यासाठी आनंद आहे. शब्दांनी मला वाचक निर्माण करून दिले आहेत. याच शब्दांनी मला आयुष्यात चांगले स्थान दिले. माझ्या आयुष्याचा रथ जो धावतो आहे तो शब्दांमुळेच. त्यामुळे शब्द माझे सारथी आहेत. ते असेपर्यंत माझं डोकं शेवटच्या श्वासापर्यंत चालत राहावं एवढीच मी ईश्वराला प्रार्थना करते. मला शब्दांची , पुस्तकांची आणि लोकांच्या प्रेमाची आवड आहे असेही त्या सांगतात.
पालकांसाठी ‘प्रिय आई-बाबा’
प्रिय आई-बाबा हे पालकांसाठी मार्गदर्शक पुस्तक आहे. पालकांना आज अनेक प्रश्न पडतात की, माझं मूल हट्टी झालंय, माझं मूल एकुलतं एक आहे त्यांना मी कसं वाढवू अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून पालकांना मिळणार आहेत. हे पुस्तक ज्याच्या शेल्फमध्ये असेल त्याच्या कोणत्याही समस्येचे निराकारण यातून होईल, काही वेळेला एकल मातृत्व मोठ्या प्रमाणात झाले आहे. ती कशी सोडवावी याचेही उत्तर मिळणार आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच झाला.



























































