
>> रजनीश राणे
व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीत किती अंतर आहे? 1992 पर्यंत ते हाकेच्या अंतराएवढे होते. शिवाजी मंदिरला व्यावसायिक नाटकांचे हाऊसफुल्ल बोर्ड झळकत होते, त्याच वेळी टिळक पुलाच्या पलीकडे छबिलदास शाळेच्या दुसऱया मजल्यावर संध्याकाळी नाटकातील ‘प्रयोग’ रंगत होते. छबिलदास चळवळ म्हणून ओळखली जाणारी ती चळवळ खरे तर ‘आविष्कार’ चळवळ होती. आता व्यावसायिक आणि प्रायोगिकमधील अंतर भौगोलिकदृष्टय़ा वाढले आहे. ‘आविष्कार’ माहीमला गेली आहे, मात्र गेली 50 वर्षे ‘आविष्कार’च्या प्रयोगशाळेतील बिकरमध्ये रंगकर्मी घडविण्याचे रसायन उकळतच आहे… त्याच प्रयोगशाळेविषयी…
राम गणेश गडकरी यांना एकदा नाटय़संस्थेच्या उद्घाटनासाठी बोलावले. उद्घाटन केल्यावर गडकरी म्हणाले, ‘संस्थेच्या उद्घाटनाचा नारळ फुटला, आता संस्था कधी फुटणार?’… यातील विनोद विखारी आहे. मराठी माणसांच्या एकत्र येण्यातील ‘अडचणीं’वर नेमके बोट ठेवणारा आहे आणि म्हणून तो बहुतांशी खरा आहे. मात्र गडकरींच्या या प्रश्नाला शिवाजी पार्कातील चौकातच सोडून देऊन गेली 50 वर्षे… तब्बल 50 वर्षे ‘आविष्कार’ नामे एक संस्था, एक चळवळ, एक विद्यापीठ नाटय़धर्माचे पालन करत आहे. खरे तर या संस्थेची स्थापना झाली तोच मुळी एक ‘प्रयोग’ होता. संस्थेचे कार्यवाह रवी सावंत याविषयी अधिक माहिती देतात…
काही कारणास्तव विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, अरुण काकडे आणि काही रंगकर्मी ‘रंगायन’मधून बाहेर पडले आणि 9 फेब्रुवारी 1971 रोजी ‘आविष्कार’ची स्थापना झाली. 50 वर्षे झाली या गोष्टीला. एका संस्थेतून बाहेर पडलो, दुसरी स्थापन केली. आता नव्या संस्थेचा पहिला ‘प्रयोग’ तर जबरदस्त व्हायलाच हवा या निर्धाराने खल सुरू झाला. मग उभे राहिले गिरीश कर्नाड यांचे भव्य-दिव्य ‘तुघलक.’ त्या वेळचे सर्वात व्यस्त अभिनेते अरुण सरनाईक मुख्य भूमिकेत होते आणि त्यांनी चक्क सिनेमाचे चित्रीकरण, व्यावसायिक नाटक यांना चार महिने सुट्टी दिली आणि तालमी करून पहिला प्रयोग केला. दामू केंकरे यांनी नेपथ्य केले होते. प्रकाश योजनेसाठी कोलकात्याहून तापस सेन यांना आणले होते. 17 ऑगस्टला रवींद्र नाटय़मंदिरात प्रयोग रंगला आणि ‘आविष्कार’चा खऱया अर्थाने पडदा उघडला.
संस्थेच्या मदतीला नंतर छबिलदास प्रशासन आले आणि शाळेच्या दुसऱया मजल्यावरील छोटेखानी हॉलचे रूपांतर नाटय़गृहात झाले. 13 जून 1974 रोजी येथे चिं. त्र्यं. खानोलकर यांचे ‘प्रतिमा’ हे नाटक सादर झाले. छबिलदासमधील ‘आविष्कार’ चळवळ सुरू झाली. नंतर या रंगमंचावर अनेक प्रयोग होत गेले. म्हणजे नीलकांती पाटेकर यांनी ‘एक डोह अनोळखी’चा प्रयोग केला तेव्हा नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी सभागृहाच्या खिडक्याच घराच्या खिडक्या म्हणून वापरल्या. दरम्यानच्या काळात अनेक लहान-मोठे कलावंत या चळवळीत सहभागी झाले. नाना पाटेकर, ऊर्मिला मातोंडकर, शफाअत खान, विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी असे अनेक जे आता थोर्थोर झाले. ‘आविष्कार’ने लहान मुलांसाठी ‘चंद्रशाला’ ही संस्थाही स्थापन केली, त्याचे नामकरण ‘गदिमां’नी केले होते. या संस्थेचे ‘दुर्गा झाली गौरी’ हे बालनाटय़ तब्बल 28 वर्षे सुरू होते.
छबिलदासच्या त्या रंगमंचावर आविष्कारने केवळ आपलेच प्रयोग केले नाहीत तर इतर संस्थांनाही प्रायोगिक रंगभूमीवर भरभक्कमपणे उभे केले. या चळवळीत अनेक प्रयोग झाले, अनेक रंगकर्मी तयार झाले. मराठी रंगभूमीला खऱया अर्थाने सशक्त करण्याचे कार्य आविष्कारने केले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. 1992 मध्ये आविष्कारला छबिलदास सोडावे लागले आणि मुंबईसह महाराष्ट्रातील प्रत्येक नाटय़कर्मी, नाटय़रसिक हळहळला. माहीमच्या शाळेत पुन्हा ‘आविष्कार’ उभी राहिली… नव्या उमेदीने… तितक्याच जोमाने.
गेल्या 50 वर्षांत संस्थेने अनेक धक्के पचवले. संस्थेचे आधारस्तंभ उन्मळले, मात्र तरीही ‘प्रयोग’ होतच राहिले. पन्नास वर्षांपूर्वी घेतलेला वसा असा टाकायचा नव्हता. आता रोहिणी हट्टंगडी, रवी सावंत, क्षमा साखरदांडे, अजित भगत, विश्वास सोहोनी अशी टीम आविष्कार चळवळ पुढे नेत आहे. कुठलीही चळवळ थांबत नाही. ‘दिंडी’ पुढे जातच असते.
आविष्कार चळवळ थांबणार नाही, ती अव्याहतपणे सुरूच राहील… एखाद्या प्रवाहाप्रमाणे. खरे तर ही संस्था म्हणजे एक प्रयोगशाळाच आहे. या प्रयोगशाळेत अनेक प्रयोग झाले, होत राहतील. या प्रयोगशाळेतील बिकरमध्ये रसायन उकळतेच आहे… त्या बिकरखालील ज्वाळा जोपर्यंत धगधगत्या आहेत तोपर्यंत ते उकळतच राहील. ज्वाळा विझता कामा नये, रसायन थंड होता कामा नये…!
तुमच्या घरात नाटक होईल
सुवर्ण महोत्सवी वर्षात संस्था काय करणार, यावर रवी सावंत म्हणतात, कोविडमुळे सुवर्ण महोत्सव साजरा करणार नाही. 51 वे वर्ष साजरे करणार. नाटक प्रेक्षकांपर्यंत कसे जाईल याचा विचार सुरू आहे. कदाचित आम्ही प्रेक्षकांच्या घरात जाऊनच नाटक करू. अभिनयाची कार्यशाळा घेतो, पण दिग्दर्शकाची कार्यशाळा घेण्याचेही नियोजन आहे. एक मोठा संगीतकार आणि एक मोठा नर्तक यांना एकत्र करून वेगळा प्रयोग करता येईल का, याचाही भुंगा डोक्यात वळवळतो आहे. बालरंगभूमीने कधीकाळी प्रेक्षक तयार केले, पण आता ती रंगभूमीच संपत चालली आहे. त्यासाठी काय करता येईल याचीही चर्चा सुरू आहे. गेल्या 50 वर्षांत संस्थेने मोठय़ांची 170 आणि लहानांची 30 नाटके केली. यातील कोणती नाटके नव्या संचात करता येतील का, याचीही चाचपणी सुरू आहे. गेल्या 50 वर्षांतील संस्थेने केलेल्या नाटकांचा दस्तावेज तयार करावा लागेल, असे सावंत म्हणाले.





























































