
>> रजनीश राणे
लेखकाचे नाटक दिग्दर्शक जेव्हा दिग्दर्शित करायला घेतो तेव्हा नाटकाचा एक साचा त्याच्या डोक्यात तयार झालेला असतो. नाटकाच्या सादरीकरणात इतर सर्व घटकांसोबत महत्त्वाचं ठरतं नेपथ्य. वेशभूषा, रंगभूषा, प्रकाशयोजना यांसह एकसंध होत गेलेलं नेपथ्य नाटकाचा विषय, काळ, स्थळ याची योग्य ओळख करून देतं. रंगमंचीय अवकाशात नेपथ्याचं महत्त्व किती आहे हे सांगणारा हा लेख.
रंगमंच… म्हणजे नाटय़कला सादर करण्याचं ठिकाण. या रंगमंचाचा पडदा उघडल्यावर रंगमंचावर आपल्याला पहिल्यांदा दिसतं ते नेपथ्य…या नेपथ्यावरून आपल्यासमोर सादर होणाऱया नाटकाचा विषय, नाटकाचा काळ, नाटकाचं स्थळ आपल्याला कळतं… आणि ते कळलं की मग आपल्याला नाटक समजायला सोप्पं जातं. म्हणून नाटकात नेपथ्याला फार महत्त्व आहे… लेखक-दिग्दर्शकानंतर नेपथ्यकाराचं नाव घेतलं जातं. नेपथ्य हे दिसताना जरी सोप्पं वाटत असलं तरी ते सुचण्याची आणि रंगमंचावर सादर होण्याची प्रक्रिया फार मोठी असते.
लेखकाचे नाटक दिग्दर्शक जेव्हा दिग्दर्शित करायला घेतो तेव्हा नाटकाचा एक साचा त्याच्या डोक्यात तयार झालेला असतो. मग तो भेटतो एका नेपथ्यकाराला. नेपथ्यकार ती नाटकाची संहिता वाचतो. पुनः पुन्हा वाचतो… त्याच्यावर विचार करतो… मनात आराखडा तयार करतो… कागदावर अंदाजे रेखाटतो… नंतर दिग्दर्शकासोबत विचार करतो… तो दिग्दर्शकाला संपूर्ण आराखडा समजावून सांगतो. दोघांमध्ये चर्चा होते… आणि नेपथ्य कसं असावं हे नक्की होतं… आणि मग नेपथ्यकार पुन्हा अंतिम विचार करून कागदावर आराखडा साकारायला सज्ज होतो. आराखडा तयार झाला की, तो रंगमंचावर कसा बसेल याचा विचार होतो… कारण प्रेक्षकांना संपूर्ण नाटक आणि नेपथ्य दिसेल वा प्रेक्षक त्या कलाकृतीचा आस्वाद घेईल याचा विचार नेपथ्यकार करतो… (नाटकाचं नेपथ्य करणं सोप्पं असतं, पण ते प्रेक्षकांना समजाणारं… निर्मात्यांना परवडणारं आणि वाहतुकीस सोप्पं आणि मुख्य म्हणजे… जे बनवणारे आणि हाताळणारे ‘रंगमंच कामगार’ आहेत त्यांना झेपणारं असावं.)
या विचाराअंती एक अंतिम आराखडा तयार होतो. मग जसं ज्या नेपथ्यकाराला जमेल तसं तो कागदावरच रंग भरतो किंवा त्याची प्रतिकृती तयार करतो… हल्ली संगणकाच्या युगात सगळेच नेपथ्यकार संगणकातच आपली कलाकृती व त्याचा आराखडा तयार करतात… माझ्या मते संगणकावर आराखडा तयार करणं सोप्पं असतं… त्यात सगळंच तयार मिळतं, पण नेपथ्याची प्रतिकृती तयार करणं हे कठीण असतं… मी आतापर्यंत नेपथ्य केलेल्या सगळय़ाच नाटकांची प्रतिकृती तयार केलीय. त्याचा फायदा मला स्वतःला, दिग्दर्शकाला आणि ते नेपथ्य घडवणाऱया रंगमंच कामगारांना होतो. त्यांना ते सोप्पं जातं. रंगमंचावर नेपथ्य उभं राहतं आणि मग जाहिरातीत नाव झळकू लागतं… नेपथ्य – सुनील देवळेकर.
पण माझं हे नाव जाहिरातीत झळकण्यासाठी त्या मागे कितीतरी हात असतात… दिग्दर्शक व निर्माते आलेच, पण नेपथ्य घडवणारे सुतार, ते रंगवणारे पेंटर आणि ते सांभाळणारे व हाताळणारे रंगमंच कामगार यांना काय वाटत असेल एकूण रंगमंचावर साकारणाऱया नेपथ्याबद्दल. काय वाटत असेल त्यांना आपल्या या रंगसेवेबद्दल. नेपथ्यकार ते रंगमंच कामगार व्हाया सुतार, सजावटकार आणि ठेकेदार असा हा नेपथ्याचा प्रवास… जो अंतिम टप्प्यातला प्रवास प्रेक्षकांना आनंद देतो आणि नेपथ्यकाराला समाधान… या समाधानात ज्यांचा ज्यांचा वाटा आहे ते सगळेच रंगमंचावर काम करणारे ‘रंगमंच कामगार’ आहेत. त्यांना मी सलाम करतो. कारण नेपथ्य सुनील देवळेकर हे नाव लागतं त्यात या सर्व ‘रंगमंच कामगारां’चा वाटा असतो. रंगमंच कामगार मराठी रंगभूमीचा कणा आहे. हा कणा जर चांगला असेल तर मराठी रंगभूमी मजबूत होईल. मुलुंड येथे साजरे झालेले 98 वे अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन यशस्वी झाले… ‘रंगमंच कामगार’ आणि ‘रंगमंच कामगार संघटना’ याच्या साथीने… म्हणून मी सलाम करतो… रंगमंच कामगारांना आणि त्यांच्या रंगसेवेला…
l आमच्याकडे नेपथ्याचा आराखडा आला की आधी नेपथ्यकाराकडून ते समजून घेतो… नेपथ्यकाराला काय अपेक्षित आहे विचारून घेतो… नेपथ्यातले बारकावे समजून घेतो. त्यांची मापं विचारून घेतो… पेपरवरचा आराखडा असेल तर थोडी जास्त चर्चा करतो, पण प्रतिकृती (मॉडेल) असेल तर आम्हाला बनवायला सोप्पं जातं. त्यांची मापं आपोआप त्या प्रतिकृतीत असतात. लेव्हलची मापं आणि त्यांचा आकार… दारं, खिडक्या यांचे आकार हे सहज समजतात. कधी कधी आपण असं केलं तर आपल्याला आणखी सोप्पं जाईल अशी चर्चा नेपथ्यकाराबरोबर करून काही बदल नेपथ्य बनवताना मी करतो.
– रमेश मेस्त्री (नेपथ्य बनविणारा सुतार)
l नाटकाचा सेट नेपथ्यकाराकडून नक्की झाला की निर्माते किंवा त्यांचे व्यवस्थापक आमच्याशी नेपथ्याच्या खर्चाबद्दल चर्चा करतात आणि मग खर्चाचा मेळ बसला की मग मी सुताराकडे ते बनविण्यासाठी लागणाऱया खर्चाची चर्चा करतो… आणि मग नेपथ्य बनविण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होते. माझ्या मते नाटकाचं नेपथ्य हे सुटसुटीत असावं… आणि एका टेम्पोमधून जाणारं असावं… कामगारांना व्यवस्थित हाताळता येणारं असावं. मी माझ्या रंगमंच कामगारांना जितका कमी त्रास होईल याची काळजी घेत असतो.
– प्रकाश परब (नेपथ्य ठेकेदार)
l माझ्याकडे नेपथ्य सजावटीचं काम आलं की नेपथ्यकाराशी चर्चा करतो. त्याला अपेक्षित असलेल्या रंगविषयी चर्चा करतो… कधी कधी कागदावर असलेले रंग आणि नेपथ्याच्या कपडय़ावरचे रंग यात फरक होतो. कारण माध्यम बदललं की रंग बदलतो. यावरून कधी कधी नेपथ्यकाराबरोबर वादही होतात, पण ते तात्पुरते. मग एकमेकांच्या संगनमताने सगळं व्यवस्थित होतं. नेपथ्याचे रंग हे आल्हाददायी असावेत. नेपथ्य सुटसुटीत व अनुकूल असावं अशाप्रकारे सजावट रंगमंचावर केली जाते आणि मग एक सुंदर असे नेपथ्य प्रेक्षकांसमोर येते.
– अजय पुजारे (नेपथ्य सजावटकार)





























































