अष्टावधानी विज्ञान प्रसारक

>> प्रदीप म्हात्रे 

ज्येष्ठ वैज्ञानिक आणि विज्ञान लेखक डॉ. बाळ फोंडके यांनी अलीकडेच वयाची ऐंशी पार केली. त्यानिमित्ताने नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स या मराठी विज्ञान परिषदेच्या भगिनी संस्थेनं डॉ. फोंडके यांच्या सन्मानार्थ 22 नोव्हेंबर 2019 रोजी वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रात एका परिषदेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये विज्ञान प्रसारासंबंधीचे विविध पैलू चर्चिले जाणार आहेत. 

विज्ञानकथा लेखनाच्या आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात ज्येष्ठ वैज्ञानिक आणि विज्ञान लेखक डॉ. बाळ फोंडके यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. विज्ञान कथालेखनासारख्या नव्या दालनात त्यांनी यशस्वी मुशाफिरी केली. 22 एप्रिल 1939 रोजी जन्मलेल्या फोंडकेंचं शालेय शिक्षण सांगलीत तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झालं. 1960 मध्ये ‘आण्विक भौतिकी’त मुंबई विद्यापीठाची स्नातकोत्तर पदवी घेतल्यानंतर भाभा अणुसंशोधन केंद्रात जीव-वैद्यकीय विभागात शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. तेथील नोकरीपूर्व प्रशिक्षणात त्यांना प्रा. भा. मा. उदगावकर, राजा रामण्णा यांच्यासारख्या दिग्गजांचे मार्गदशन लाभले. दरम्यान, 1967 मध्ये त्यांनी जीवभौतिकी विषयात लंडन विद्यापीठाची डॉक्टरेट प्राप्त करत तेथील चेस्टर बिट्टी इन्स्टिटय़ूट ऑफ कॅन्सर रिसर्च संस्थेत अभ्यागत शास्त्रज्ञ व अमेरिकेतील कॅन्सास विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांचे जवळपास शंभर शास्त्राrय शोध निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आहेत.

डॉ. फोंडके यांनी मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात 23 वर्षे काम केले. पुढे त्यांना विज्ञान लेखन आणि पत्रकारितेचे क्षेत्र खुणावू लागले. त्यातून त्यांनी व्यावसायिक जोखीम पत्करत त्या क्षेत्रात उडी घेतली. परिणामी समकालीन शास्त्रज्ञांचा रोष ओढवला. तथापि प्रा. भा. मा. उदगावकर यांनी मात्र त्यांना प्रोत्साहन देत समाजाच्या सर्व थरांमध्ये विज्ञान प्रसार करण्याचा गुरुमंत्र दिला, जो बाळ फोंडकेंनी आजतागायत तंतोतंत पाळला आहे. ‘सायन्स टुडे’ मासिकाचे संपादक, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ समूहाचे वैज्ञानिक संपादक अशी भूमिका पार पाडताना वैज्ञानिक शोध पत्रकारिता जन्माला घातली. त्यांनी लिहिलेले लेख वर्तमानपत्रे, मासिके व नियतकालिकांतून गेल्या काही दशकांपासून प्रसिद्ध होत आहेत. बोजड शब्द न वापरता संवादात्मक लिखाणाच्या माध्यमातून दैनंदिन उदाहरणे देत विषयाची मांडणी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. वि. गो. कुलकर्णी यांच्यासोबत त्यांनी लिहिलेली ‘संधीप्रकाश’, ‘तिसरे पाऊल’, ‘गाथा शोधांची’ ही वैज्ञानिक सदरे विशेष गाजली. दैनिकांमध्ये त्यांनी केलेल्या स्तंभ लिखाणात ‘दै. सामना’चाही समावेश आहे. त्याशिवाय डॉ. फोंडके यांच्या सुमारे 300 विज्ञान कथा व 10 नाटके प्रसिद्ध झालेली आहेत. डॉ. फोंडके यांनी लिहिलेली ग्रंथसंपदाही समृद्ध आहे. मराठी, इंग्रजी व हिंदी मिळून त्यांची जवळपास 80 पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या पुस्तकांना मिळालेल्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारांचाही समावेश आहे. डॉ. फोंडके यांना विज्ञान नियतकालिकांच्या संपादनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामध्ये सायन्स टुडे, सायन्स रिपोर्टर, मराठी विज्ञान परिषद पत्रिका यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या मासिकांचे संपूर्ण स्वरूप बदलून ते आकर्षक व अधिक वाचनीय करण्यात डॉ. फोंडके यांचा सिंहाचा वाटा आहे.

हे करत असताना अनेक जणांना लिहितं केलं. जे मराठीत विज्ञान लेखन करत होते अशा लोकप्रिय लेखकांना इंग्रजीतूनही लिहिण्याचा आग्रह धरला. याबाबतचा एक अनुभव फार बोलका आहे. लक्ष्मण लोंढे यांनी लिहिलेली ‘दुसरा आइन्स्टाईन’ ही विज्ञान कथा डॉ. फोंडकेंनी ‘सायन्स रिपोर्टर’करिता इंग्रजीत लिहून घेतली. अमेरिकेतील कॅन्सास विद्यापीठाने या विज्ञान कथेची निवड सर्वोत्कृष्ट जागतिक विज्ञान कथासंग्रहासाठी झाली ती त्यामुळेच. हिंदुस्थानी भाषांमधून निवडलेली ती एकमेव कथा ठरली. डॉ. फोंडकेंमुळे हे शक्य झाल्याचं लोंढे यांनी अनेकदा बोलून दाखवलं होतं. सीएसआयआर, नवी दिल्ली यांच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स कम्युनिकेशनचे (निस्कॉम) संचालक व प्रमुख संपादक म्हणून 1989 ते 1999 दरम्यान कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात जी पन्नासेक विज्ञानविषयक पुस्तके प्रकाशित झाली, ती लोकप्रिय ठरली. त्यातील काही त्यांनी स्वतः लिहिली होती. त्यांनी त्यावेळी निवडलेले विषय आजच्या काळाशीही सुसंगत असून ती सर्वसामान्य वाचकांनी वाचावीत यादृष्टीने उपयुक्तआहेत. अ. पां. देशपांडे यांच्यासह विज्ञान आणि तंत्रज्ञान कोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ) आणि शिल्पकार चरित्र कोश (साप्ताहिक ‘विवेक’) या कोशांचे संपादन केले असून मराठी विश्वकोशाच्या अद्ययावतीकरण प्रकल्पात व्यस्त आहेत. उदयोन्मुख विज्ञान लेखकांना मार्गदर्शन करण्यातही डॉ. फोंडके नेहमीच अग्रेसर असतात.

 डॉ. बाळ फोंडके यांना मिळालेल्या पुरस्कारांमध्ये मराठी विज्ञान परिषद आदर्श विज्ञान प्रसारक पुरस्कार (1986), एनसीएसटीसीचा राष्ट्रीय पुरस्कार (1991), इन्सा ‘इंदिरा गांधी पारितोषिक’ (1992), वीर सावरकर पुरस्कार (1994), महाराष्ट्र साहित्य परिषद व इंडियन सायन्स काँग्रेसचा पुरस्कार (1995), सह्याद्री वाहिनी रत्नदर्पण पुरस्कार (2010), गोदा गौरव पुरस्कार (2012) यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या