प्रासंगिक – आचार्य बाळशास्त्री जांभेकर

>> डॉ.राजू पाटोदकर

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरुवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या कार्यामुळे मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. आज या घटनेस 188 वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या या महत्कार्याची आठवण आपणास राहावी म्हणून प्रतिवर्षी 6 जानेवारी रोजी राज्यात ‘दर्पण दिन’ साजरा केला जातो, त्यानिमित्त हा लेख.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी त्यांच्या काळात सुरू झालेल्या मुद्रणालयाचा यथार्थ उपयोग करून घेतला आणि ‘दर्पण’रूपी ज्योत समाजप्रबोधनासाठी तेवत ठेवली. ‘दर्पण’च्या माध्यमातून त्यांनी शिक्षण व मनोरंजन यांचा समन्वय साधला. ‘दर्पण’ हे इंग्रजी विद्येचा मराठी सार सांगणारे ठरले. 25 जून 1840 साली ‘दर्पण’चा शेवटचा अंक प्रकाशित झाला. ‘दर्पण’ वृत्तपत्राची निर्मितीच नव्हे तर समाजसुधारणेचे कार्यही बाळशास्त्री जांभेकरांनी केले. किंबहुना सामाजिक सुधारणेच्या बाबतीत ते आग्रही होते. समाज सुधारला तरच राजकीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होईल असे त्यांचे मत. सार्वजनिक जीवनात विचारमंथन करण्यासाठी वर्तमानपत्रासारखी मोठी शक्ती आहे. तिचा उपयोग समाजात बदलासाठी होऊ शकतो. याचा त्यांना अभ्यास होता. त्यामुळेच बाळशास्त्रीनी तत्कालीन चुकीच्या रूढी परंपरांवर प्रहार केला. धार्मिक व सामाजिक सुधारणांबाबत बाळशास्त्री जांभेकर हे प्रगमनशील व्यवहारवादी होते. म्हणूनच त्यांनी ‘दर्पण’ला समाज परिवर्तनाचे बाळशास्त्री व शस्त्र्ा म्हणून वापरले.

वयाच्या 11व्या वर्षी संस्कृतचे शिक्षण पूर्ण करून जांभेकरांनी मुंबई गाठली होती. मुंबईत इंग्रजी भाषेचा सखोल अभ्यास करून त्यांनी विविध विषयांचे ज्ञान मिळविले. या ज्ञानाचा उपयोग आपल्या समाजाला कसा होईल याकडे त्यांचा ओढा होता. तत्कालीन प्रमुख आठ भाषा व अनेक शास्त्र्ाात ते पारंगत होते.

आद्य मराठी पत्रकार, आद्य समाजसुधारक आणि आद्य प्रपाठक म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर ओळखले जातात. हिंदुस्थानातील पहिले प्रोफेसर म्हणजे प्रपाठक होण्याचा बहुमान 1834 साली बाळशास्त्रीना मिळाला. पुढे ते 1845 साली ते शिक्षण विभागाचे संचालक झाले. त्यांनी विविध विषयांवर ग्रंथ लिहिले. यात प्रामुख्याने भूगोल, इतिहास, भौतिकशास्त्र्ा, गणित, खगोलविद्या, मानसशास्त्र्ा आदी विषयांचा समावेश आहे. सोप्या आणि साध्या मराठी भाषेत सर्वांना समजतील, असे हे ग्रंथ आहेत. याच बरोबर त्यांनी बालव्याकरण, भूगोलविद्या, सारसंग्रह आणि नीतीकथा हे चार ग्रंथ लिहिले. एल्फिन्स्टनकृत हिंदुस्थानांच्या आधारे त्यांनी इतिहास रचला. ‘हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास’ हा ग्रंथ 1851 साली त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजसुधारणा, शिक्षण आणि वृत्तपत्र प्रसार यासाठी केलेले कार्य हे अलौकिक असे आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून मुंबईचे तत्कालीन गर्व्हनर सर जेम्स कॉर्नोक यांनी 1840 साली जस्टिस ऑफ पीस अशी पदवी देऊन बाळशास्त्रीचा गौरव केला. आज वर्तमानपत्राची भव्यता पाहता झालेली प्रगती लक्षात येते, परंतु त्याकाळी अत्यंत बिकट स्थितीत वर्तमानपत्र चालविण्याचे कार्य आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी केले.

वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण दिले जाते, असे सुप्रसिध्द माध्यम तज्ञ ए.ए. बेर्जर यांनी म्हटले आहे. त्यानुसार आचार्य जांभेकरांनी केवळ लोककल्याण आणि लोकशिक्षण असाच उदात्त हेतू नजरेसमोर ठेऊन ‘दर्पण’ प्रकाशित केले. 1832 चा काळ, अर्थातच इंग्रजांच्या अधिपत्याचा काळ होता. राष्ट्रभक्तीसाठी समाजास प्रबोधनाची मोठी गरज होती. इंग्रजांच्या हातात आपले राष्ट्र असताना आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करून, परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी एखादे वृत्तपत्र असावे, असे बाळशास्त्रीना वाटले आणि त्यांनी ‘दर्पण’ सुरू केले. ‘’दर्पण’मध्ये एकही जाहिरात त्यांनी छापली नाही. स्वतःचे पैसे टाकून जवळपास आठ वर्षे वृत्तपत्र सुरू ठेवले. भाऊ महाजन यांच्या सहकार्याने मराठी तर स्वतः इंग्रजी मजकुराची बाजू ते ‘दर्पण’साठी सांभाळत. त्यामुळे ‘दर्पण’मधील मजकुराचा दर्जा उच्च होता.

न्यायमूर्ती ना. ग. चंदावरकर यांनी म्हटले आहे की, बाळशास्त्री अव्वल इंग्रजी अमलातील एक थोर विद्वान तसेच ज्ञानाच्या विविध क्षेत्रांत लीलया संचार करणारे पंडित होते. न्यायमूर्तीचे उपरोक्त विधान बाळशास्त्र्ााRच्या शैक्षणिक कार्याचे संक्षिप्त वर्णन आहे तर आचार्य अत्रे यांनी बाळशास्त्री जांभेकरांबद्दल खूपच महत्त्वपूर्ण अशी टिप्पणी केली आहे. ते लिहितात की, बाळशास्त्री जांभेकर हे बोलके नव्हे तर कर्तेसुधारक होते. केवळ प्राध्यापक म्हणून अध्ययनच न करता बाळशास्त्र्ााRनी आपल्या ‘दर्पण’मधून सामाजिक सुधारणेवर भर दिला. दादाभाई नौरोजी हे आचार्य बाळशास्त्रीचे विद्यार्थी होते. सध्याची माध्यमक्रांती लक्षात घेता आपणास आचार्य जांभेकर यांच्या कार्याची साक्ष पटू शकते.

आपली प्रतिक्रिया द्या