बलुचिस्तानमधील मानवाधिकांरावर पाकिस्तानी रणगाडे

136

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

विश्वचषक स्पर्धेमध्ये 29 जूनला पाकिस्तान व अफगाणिस्तान हा सामना सुरू असताना क्रिकेट मैदानाच्या परिसरात ‘जस्टिस फॉर बलुचिस्तान’ असा संदेश लिहिलेलं एक विमान उडवण्यात आले. यावरून चिडलेल्या पाकिस्तानी फॅन्सनी अफगाणिस्तानच्या फॅन्सना लक्ष्य करत त्यांच्यावर हल्ला चढवला. त्याला अफगाणिस्तानच्या फॅन्सनी जशास तसे उत्तर दिले. या हाणामारीमुळे बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्य मानवाधिकारांवर कसे रणगाडे फिरवत आहे हे पुन्हा ऐरणीवर आले आहे.

पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये दहशतवादविरोधी मोहिमेच्या नावाखाली रणगाडे, हेलिकॉप्टर आणि विमानांचा वापर करत आहे. अशा प्रकारची कुठलीही कारवाई हिंदुस्थानी सैनिक कश्मीरमध्ये करत नाहीत. पाकिस्तान कश्मीरचा प्रश्न जागतिक पातळीवर उठवण्याचा नेहमीच प्रयत्न करते. त्याला प्रत्युत्तर देण्याकरिता आपणही गिलगीट आणि बाल्टिस्तान, पाकव्याप्त कश्मीर आणि बलुचिस्तानमधल्या मानवाधिकाराचे हक्कभंग हे जगासमोर मांडले पाहिजेत. एवढेच नव्हे तर, जिथे जिथे पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य चळवळी सुरू आहेत, त्यांना आपण आर्थिक, सामरिक, संरक्षण मदत करून त्यांचे हक्क जिंकण्याकरिता मदत केली पाहिजे.

सिंध, खैबर-पख्तूनख्वा व पंजाब या पाकच्या तीन प्रांतांच्या जोडीला चौथा भौगोलिकदृष्टय़ा सर्वात मोठा प्रांत म्हणजे बलुचिस्तान. पाकच्या एकूण भूभागाच्या 44 टक्के भाग या प्रांतानं व्यापला आहे. मात्र पाकच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त पाच टक्केच वस्ती या प्रांतात आहे. नैसर्गिक वायू, सोने, तांबे इत्यादी खनिज संपत्तीने हा प्रांत समृद्ध आहे. बलुचिस्तानच्या उत्तरेस व वायव्येस अफगाणिस्तान आहे. या प्रांताची नैऋत्य सीमा इराणला भिडलेली आहे. पंजाब, सिंध, खैबर-पख्तूनख्वा व ‘फाटा’ हे विभाग बलुचिस्तानच्या ईशान्येला आहेत. बलुचिस्तानातील स्थानिक नेतृत्वाला (कलातच्या खानाला) आपला प्रांत ‘स्वतंत्र’ ठेवायचा होता. 1948 साली पाक सैन्यानं या प्रांतातील ‘स्वतंत्र’ राहू इच्छिणारा प्रदेश ताब्यात घेतला आणि नंतर 1955 साली तो पाकिस्तानात विलीन करून टाकला.

बलुचिस्तानचा थोडक्यात इतिहास असा – 1947 मध्ये हिंदुस्थानची फाळणी होत असताना तो इंग्रजांच्या ताब्यात होता. तेव्हा त्याचे नाव होते ‘कलाट’. त्याचा काही भाग आता इराण आणि अफगाणिस्तानमध्ये आहे आणि मोठा भाग पाकिस्तानमध्ये. बलुचिस्तानची तेव्हा हिंदुस्थानात सामील होण्याची इच्छा होती. बलुचिस्तानच्या राजा खान ऑफ कलाट मीर अहमद यार खान यांनी हिंदुस्थानात विलीन होण्याची विनंती केली होती, परंतु जवाहरलाल नेहरू यांनी बलुचिस्तानला हिंदुस्थानात सामील करून घेण्यासाठी कोणतीही हालचाल केली नाही. ज्याप्रमाणे पख्तुनिस्तानची मागणी हिंदुस्थानने स्वीकारली नाही आणि खान अब्दुल गफार खान ऊर्फ सरहद्द गांधी यांचा विश्वासघात केला तसेच बलुचिस्तानबाबत घडले. सरहद्द गांधी यांनी जळजळीत उद्गारांत प्रतिक्रिया व्यक्त केली ‘‘आम्हाला लांडग्यांच्या तावडीत देण्यात आले आहे.’’ बलूच लोकांनादेखील आपण लांडग्यांच्या तावडीत ढकलले.

बलुचिस्तानचे स्वातंत्र्य जिना यांनी त्या प्रांतात पंजाबी सैन्य घुसवून हिरावून घेतले. 28 मार्च 1948 हा बलुचिस्तानच्या पारतंत्र्याचा दिवस आहे. बलुची लोक हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करतात. 1948 पासून आजपर्यंत बलुचिस्तान अस्थिर राहिला आहे. आतापर्यंत बलुचिस्तानात 1948, 1957-58, 1963-69, 1973-77 आणि 2004 ते आजपर्यंत असे उठाव होत आले आहेत. मात्र आधीच्या उठावांपेक्षा सध्या चालू असलेला संघर्ष हा गुणात्मकरीत्या वेगळा आहे. देशोदेशी पसरलेला बलूच मध्यमवर्ग या संघर्षाला आर्थिक व इतर प्रकारचे बळ पुरवत आहे. त्यातील एक नेते तारीक फतेह सध्या हिंदुस्थानातील वृत्तवाहिन्यांवर आले आहेत. या संघर्षाचे 79 वर्षांचे नेते नवाब अकबर खान बुगती यांना 2006 साली पाक सैन्याशी उडालेल्या चकमकीत मारण्यात आले. 2009 साली मीर सुलेमान खान यांनी ‘स्वतंत्र बलुचिस्तान’ची घोषणा केली होती.

पाकविरोधात वाढता असंतोष
बलुचिस्तानात पाकिस्तानी दडपशाहीच्या विरोधातील सामान्यांचा आवाज बुलंद होत आहे. बलुची जनता जात्याच हिंमतबाज असल्याने पाकिस्तानी बंदुका, तोफांची पर्वा न करता जमेल तेव्हा आणि जमेल त्या मार्गाने पाकिस्तानला झिडकारतच आली आहे, पण शेवटी त्यांची ताकद किती पुरी पडणार? पाकिस्तानी लष्कराने त्यांच्याभोवती फास आवळून दहशत निर्माण केली. बलुची नेत्यांविरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले. दुसऱया-तिसऱया फळीतील बलुची नेत्यांवर तसेच सामान्य बलुची नागरिकांवर दबाव टाकायचा, त्यांच्यात दहशत निर्माण करायची आणि त्यांचे पाकिस्तानी दडपशाहीविरोधात, स्वातंत्र्यासाठी चाललेले आंदोलन मोडून काढायचे अशी पाकिस्तानची रणनीती आहे. त्यामुळेच ब्रह्मदाग बुगती, हरबियार मारी, बारूक करिमा बलोच आदी ज्येष्ठ बलूच नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तथापि पाकिस्तान सरकारच्या विरोधात बलुचिस्तानमध्ये जनता रस्त्यावर उतरली असून तिथे मोठय़ा प्रमाणावर स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी आंदोलने सुरू आहेत. त्यात हजारो नागरिकांचे बळी गेले आहेत. आजवर जम्मू-कश्मीरातील कथित मानवाधिकाराच्या उल्लंघनाविरुद्ध संयुक्त राष्ट्रसंघाचे दरवाजे खटखटवणाऱया पाकिस्तानविरुद्ध आता बलुचिस्तानची जनता न्याय मागत आहे. पाकिस्तानचे खरे स्वरूप हिंदुस्थानी प्रसारमाध्यमांनी उघडे करून जगासमोर मांडण्याची गरज आहे.

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱया दोन महत्त्वाच्या संघटना आहेत. एकीचे नाव आहे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि दुसरीचे नाव आहे लष्करे बलुचिस्तान. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱया नेत्याचे नाव नएला कादरी बलोच. पाकिस्तानच्या दास्यातून आम्हाला हिंदुस्थानने मुक्त केले पाहिजे अशी त्याने हिंदुस्थानला विनंती केली आहे. अमेरिकेला पाकिस्तान आहे त्या स्थितीत जिवंत ठेवायचा आहे. चीनलादेखील पाकिस्तान आहे त्या स्थितीत ठेवायचा आहे. बलुचिस्तानच्या समुद्रकिनाऱयावर ग्वादर बंदर बांधण्यात चीन मग्न आहे आणि या बंदरापासून हिंदुस्थानच्या टोकावरील चीनपर्यंत रस्त्याचे बांधकामदेखील झाले आहे. बलुचिस्तान हिंदुस्थानपासून शेकडो मैल दूर आहे. त्यामुळे एका मर्यादेपलीकडे हिंदुस्थान बलुचिस्तानमध्ये गुंतू शकत नाही. कश्मीरमध्ये हिंसाचार पसरवण्याच्या पाकिस्तानच्या कूटनीतीला ‘जशास तसे’ उत्तर देण्याचे नीतीधैर्य हिंदुस्थान आतापर्यंत दाखवू शकलेला नाही. दहशतवादाचा अवलंब करणे हिंदुस्थानसारख्या लोकशाहीभिमुख आणि नैतिक मूल्यांची कदर करणाऱया देशाच्या परराष्ट्र धोरणाला वर्ज्य होते. किंबहुना, छुप्या युद्धाची नीती पाकिस्तानविरुद्ध वापरण्याचा हिंदुस्थानने कधीच गंभीरपणे विचार केला नाही.

याआधी पूर्व पाकिस्तानवर (आताचा बांगलादेश) होणाऱया अन्यायाचे निराकरण करण्यासाठी हिंदुस्थानने त्यांना उघडपणे मदत केली होती. असंतोषाच्या भांडवलावर हिंदुस्थान पाकिस्तानला काटशह देऊ शकतो आणि त्या संकल्पनेची आता ‘वेळ आली’ आहे. एक हात मागे बांधून पाकिस्तानशी लढणे आता थांबवले पाहिजे. कश्मीरमध्ये ‘आयएसआय’मार्फत सुरू असलेल्या फुटीरतावादाची किंमत मोजावी लागेल, हे पाकिस्तानला सांगणे गरजेचे आहे. छुप्या युद्धाच्या या मार्गावर काळजीपूर्वक आणि परिपक्वपणे पावले टाकली पाहिजेत. पाकिस्तानला त्याच्या कूटनीतीपासून परावृत्त करण्याचा हा एक मार्ग आहे. सर्व राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे. कश्मीरमधील आपला खोडसाळपणा पाकिस्तान थांबवत नाही तोपर्यंत ही अभिनव रणनीती सुसूत्रपणे, साक्षेपाने आणि जिद्दीने तडीस नेणे आवश्यक आहे. सध्याच्या स्थितीत हिंदुस्थानचे आक्रमक धोरण गरजेचे आहे. अन्य देशांत राहणाऱ्या, पण बलुचिस्तानाचे मूळ रहिवासी असणाऱयांना एकत्र आणून त्यांच्या अडचणी जगासमोर मांडण्याची मोहीम हिंदुस्थानने राबवावी.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या