‘तरु’णाई – आधार‘वड’

440

>> डॉ. सरिता विनय भावे

वडाची हिरवी पाने, लालचुटूक फळे ही आकर्षक रंगसंगती पाहून कालिदासाला ते पाचूंच्या राशीतील लालमणी वाटले तर निसर्गकन्या बहिणाबाईंना ‘हिरवे हिरवे पानं, लाल फय जशी चोच, आलं वडाच्या झाडाले, जसं पीक पोपटाचे’असे गोड काव्य सुचले!

भव्य, प्रचंड, विराट अशी विशेषणे एखाद्या वृक्षासाठी वापरायची असतील तर आपल्या डोळय़ासमोर हटकून वटवृक्षच येतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जास्तीत जास्त जागा व्यापण्यात कोलकाताजवळ असलेल्या ‘प्राचार्य जगदीशचंद्र बोस इंडियन बोटॅनिक गार्डन’मधील 250 वर्षे जुन्या वटवृक्षाचा पहिला क्रमांक लागतो. हिंदुस्थानात ‘देववृक्ष’ म्हणून जे पाच वृक्ष मानले जातात, त्यात वटवृक्षाचा समावेश होतो. (इतर चार आहेत ते पिंपळ, औदुंबर, आंबा आणि बेल). वटवृक्षाचे हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मात खूप महत्त्वाचे स्थान आहे. असे म्हणतात की, प्रलयाच्या अखेरही वटवृक्ष टिकून राहतो, म्हणून याला ‘अक्षयवट’ असेही संबोधतात. भगवान बुद्धांनी कैलाश पर्वताजवळ वटवृक्षाचे रोपण केले होते तसेच जैन धर्मात तीर्थंकर ऋषभदेव यांनी वटवृक्षाखाली तपस्या केली होती असे मानले जाते. आयुर्वेदात वटवृक्षाचे अनेक उपयोग असल्यामुळे याला ‘संसारवृक्ष’ही म्हणतात. या झाडाचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे फांद्यांनाही ठराविक अंतरावर मुळे फुटतात. त्यांना पारंब्या म्हणतात. पारंब्या खाली जमिनीकडे जात असल्यामुळे संस्कृतमध्ये याला ‘न्यग्रोध’ (न्यक म्हणजे खाली आणि रुह, रुध म्हणजे वाढणे)असे नाव आहे. जमिनीलगत पोहोचल्यावर पारंब्यांना खोडाचा आकार येतो व मुख्य खोडाभोवती इतर खोडांची समांतर वाढ होते. वारंवार ही प्रक्रिया होऊन वडाच्या झाडाचा विस्तार प्रचंड वाढतो. या भारदस्त रूपामुळे वटवृक्ष एखाद्या जटाधारी ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वासारखा भासतो तर याच्या विशाल बुंध्याला बिलगलेल्या नाजूक लतावेली बघितल्या की तो लाडक्या लेकीचे रक्षण करणारा कुटुंबवत्सल ‘आधारवड’ वाटतो!

पूर्वी या वृक्षाच्या विस्तीर्ण सावलीत बसून व्यापारही केला जायचा. म्हणून हिंदीतील ‘बनिया’(वाणी) शब्दावरून याला इंग्रजीतील `Baniyan tree’ नाव मिळाले. बड (हिंदी), बरगद (उर्दू) अशी नावे असलेल्या वडाचे वनस्पती शास्त्र्ाात Ficus benghalensis असे नामकरण केले आहे. वड हा आपला ‘राष्ट्रीय वृक्ष’ असून मध्य प्रदेशचा ‘राज्यवृक्ष’ आहे.

वडाचे खोड गुळगुळीत असून चीकयुक्त असते. त्याच्या वाळलेल्या काटक्या यज्ञ, होमात समिधा म्हणून वापरल्या जातात. पाने मऊ, गडद हिरव्या रंगाची, रुंद, वाटोळी असतात. पानांपासून द्रोण, पत्रावळी बनवतात. जोडीजोडीने लागणारी लाल फळे वास्तवात फळे नसून ‘पुष्पाशय’ असतो. कीटक, वटवाघळे, पक्षी, माकडे ती खातात. वडाची ‘हिरवी पाने लालचुटूक फळे’ही आकर्षक रंगसंगती पाहून कालिदासाला ते ‘पाचूंच्या राशीतील लालमणी’ वाटले तर निसर्गकन्या बहिणाबाईंना ‘हिरवे हिरवे पानं, लाल फय जशी चोच, आलं वडाच्या झाडाले, जसं पीक पोपटाचे’असे गोड काव्य सुचले!

वडाचे झाड सदापर्णी असून इतर झाडांपेक्षा प्राणवायू सोडण्याचे याचे प्रमाण खूप जास्त आहे. म्हणूनच असे मानले जाते की, सत्यवानाला लवकर बरे वाटावे म्हणून सावित्रीने त्याला वडाच्या झाडाखाली ठेवले होते. आजही ज्येष्ठ महिन्यात येणाऱया वटपौर्णिमेला सुवासिनी ‘वटसावित्री’च्या व्रतात वडाची पूजा करून त्याच्याकडे अनंत विस्तारासारख्याच अखंड सौभाग्याची कामना करतात.

वडाने पूर्वीपासूनच आपल्या आडनावात गावात (पंचवटी/वडोदरा), म्हणींतही (वडाची साल पिंपळाला) शिरकाव केलेला आहे. हा लहान मुलांच्या आवडत्या ‘सुरपारंब्यां’च्या खेळातील महत्त्वाचा भिडू असतो; आबाल वृद्धांना मित्रांबरोबर दिलखुलास गप्पा मारायला आणि गावातील पंचायतींचा न्यायनिवाडा करायला याचाच पार सोयीचा वाटतो; सणासुदीला लेकीसुनांसाठी झोपाळे बांधण्यासही याचीच निवड केली जाते. आयुष्यात असे मोलाचे स्थान असलेल्या या ‘पुराणवृक्षा’ची पाळेमुळे हिंदुस्थानीयांच्या हृदयात खोलवर रुजलेली आहेत आणि ती तशीच त्याच्या नावाप्रमाणे ‘अक्षय’ राहतील!

आपली प्रतिक्रिया द्या