ठसा- बासू चटर्जी

624

>> प्रशांत गौतम 

छोटीसी बात, चितचोर, रजनी गंधा, खट्टा मीठा, बातों बातों में… या सारख्या एकापेक्षा एक श्रेष्ठ आणि अभिजात हिंदी चित्रपटांचे प्रतिभावंत व्यासंगी दिग्दर्शक बासुदा म्हणजे बासू चटर्जी यांच्या निधनाने आपण एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व गमावले आहे. मध्यमवर्गीयांच्या आयुष्यातील मध्यम, सामान्य स्वप्ने ‘छोटीसी बात’द्वारे सांगणारे बासुदा असामान्य दिग्दर्शक होते. 1970 चे दशक  गाजले, ते त्यांच्या अभिजात दिग्दर्शनातील श्रेष्ठ चित्रपटांनी. छोटीसी बात, चितचोर, रजनी गंधा, पिया का घर, खट्टा मीठा, बातो बातों में, हमारी बहु अल्का, चमेली की शादी या सारख्या अनेक हिंदी चित्रपटांनी व त्यातील अजरामर गाण्यांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. बासुदांच्या चित्रपट दिग्दर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या चित्रपटात त्यांच्यासमोर मध्यमवर्गीय समाज असे. त्याचे सुख-दु:ख, भाव-भावना मांडत असताना हलक्या फुलक्या विनोदांनी कथानक सजलेले असायचे. अमोल पालेकर यांच्या करिअरच्या प्रवासात त्यांना भूमिका करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली ती बासुदांच्या चित्रपटात. अमोल पालेकरांनी अशा कितीतरी चित्रपटांमधून मध्यमवर्गीयांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या भूमिका साकारल्या. ‘तीसरी कसम’ या चित्रपटात सहायक दिग्दर्शक म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. बासुदांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष असा की, ते उत्तम दर्जाचे व्यंगचित्रकारही होते. अठरा वर्ष  व्यंगचित्रकलेच्या माध्यमातून ते व्यक्त झाले. तीच दृष्टी, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बंगाली, हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन करीत असताना उपयोगी पडला. प्रियतमा, मंझिल, मनपसंद, चक्रव्यूह, जीना यहाँ, अपने-पराये, शौकीन, एक रूका हुआ फैसला, कमला की मौत असे काही जे चित्रपट निर्माण झाले ते चौकटीबाहेरचे चित्रपट म्हणून ओळखले गेले.

बासुदा मोजक्या दिग्दर्शकांमध्ये अव्वल होते. चित्रकार, व्यंगचित्रकार, लेखक, पटकथाकार, संवाद लेखक अशा सर्वच आघाड्यांवर त्यांनी आपल्या कार्यकौशल्याची छाप उमटवली. हिंदीप्रमाणेच त्यांचे बंगाली चित्रपट निर्मितीत महत्त्वाचे योगदान होते. नव्या कलाकारांना घेऊन त्यांनी जे चित्रपट निर्माण केले, ते हिट ठरले.

दूरदर्शनवर ‘रजनी’ ही मालिका बरीच गाजली होती. त्यात प्रिया तेंडुलकर आपल्या भूमिकेतून सर्वदूर पोहोचली. दूरदर्शनवर आणखी एक डिटेक्टिव्ह मालिका गाजली ती म्हणजे व्योमकेश बक्षी. यासह दर्पण, काकाजी कहीन, या मालिकांचे  दिग्दर्शन बासुदांनी केले. मोठा पडदा असो, की दूरदर्शनचा छोटा पडदा असो, बासुदांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट किंवा मालिका रसिक पे्रक्षकांच्या मनात घर करीत असे. बंगाली, हिंदी चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका त्यांनी आपल्या कसदार दिग्दर्शनातून वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्या.

दहा जानेवारी 1930 रोजी अजमेर येथे जन्मलेल्या बासुदांचा प्रवास मुंबईत 90 व्या वर्षी विसावला. हिंदुस्थानी चित्रपटांचे दिग्दर्शक आणि पटकथा लेखक म्हणून ते सर्वसुपरिचित होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात ‘ब्लिट्झ’ या साप्ताहिकामधून केली. चित्रकार आणि व्यंगचित्रकार या माध्यमातून त्यांनी आपला प्रवास सुरू केला. बासुदांना ‘दुर्गा’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार व ‘स्वामी’साठी फिल्मफेअरचा उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सन्मान लाभला होता. ‘जीना यहाँ’ व ‘रजनीगंधा’साठी बेस्ट फिल्म क्रिटिक्स अवॉर्ड असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले. 1969 ते 1997 पर्यंत बासुदांनी 33 चित्रपटांचे दिग्दर्शन केले. नव्वदी पार करणारे बासुदा तृप्त जीवन जगले व आज तमाम चित्रपटरसिकांच्या मनाला चटका लावून गेले…

आपली प्रतिक्रिया द्या