गर्भपात ते गर्भाशय, स्कॅण्डलचा प्रवास

110

>> उदय जोशी

बीड जिल्हा ही जशी श्रीसंत वामनभाऊ, भगवानबाबा यांची भूमी तशीच वैद्यनाथाची, योगेश्वरी देवीची, शून्याचा शोध लावणाऱया भास्कराचार्यांची, पासोडी लिहिणाऱया दासोपंतांची, मराठी भाषेला दर्जा मिळवून देणाऱया आद्यकवी मुकुंदराजाचीसुद्धा. मात्र या भूमीला बदनाम करण्याचे काम काही वर्षांपूर्वी गर्भपाताच्या स्कॅण्डलने केले. या स्कॅण्डलच्या काळय़ा सावल्या दूर गेल्या असे वाटत असतानाच बीड जिह्यात मध्यंतरी नव्या स्कॅण्डलने उच्छाद मांडल्याचे उघड झाले. गर्भपाताची जागा गर्भाशय शस्त्र्ाक्रियांनी घेतली. आजाराचा बागुलबुवा उभा करत शेकडो महिलांचे गर्भाशय काढण्याचे उद्योग केले गेले. गर्भपात ते गर्भाशय शस्त्रक्रिया असा हा बीड जिह्यातील स्कॅण्डलचा दुर्दैवी प्रवास आहे.

गेल्या दहा वर्षांपासून बीड जिल्हा वादग्रस्त विषयांमुळे ऐरणीवर आहे. बीड जिह्याची संपूर्ण देशात बदनामी झाली ती काही वर्षांपूर्वी घडलेल्या गर्भपाताच्या भयंकर घटनांनी. वंशाला दिवा पाहिजे ही मानसिकता त्यासाठी कारणीभूत ठरली. ऊसतोड कामगारांचा जिल्हा असणाऱया बीड जिह्यात प्रत्येकाला मुलगा असावा असे वाटू लागले आणि त्यातूनच स्त्र्ााrभ्रूण हत्या करण्याचे उद्योग जन्माला आले. गावागावात गर्भपाताचे कारखाने उघडले गेले. बिनदिक्कतपणे हा गोरखधंदा तेजीत चालू लागला. एका गर्भपातासाठी 25 हजार ते 50 हजार रुपयांची कमाई होऊ लागल्याने वैद्यकीय व्यवसाय करणारे काही डॉक्टर कसाईच झाले. यात आघाडीवर होती वैद्यनाथाची परळी. देवाच्या दारात दैत्यांचा बाजार सुरू झाला. रोज पन्नासपेक्षा जास्त भूणहत्या होऊ लागल्या. जून 2011 मध्ये परळीमध्ये गर्भपाताची धक्कादायक घटना उघडकीस आली आणि या घटनांना तोंड फुटले. गर्भपाताच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला. प्रशासन आणि राज्य सरकार खडबडून जागे झाले. या गर्भपातामुळे बीड जिल्हा मुलीच्या जन्मदरात राज्यात नीचांकावर आला. एक हजार मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर 779 वर आला. या आकडेवारीनंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने कारवाईला सुरुवात केली. रुग्णालयाची झाडाझडती घेतली गेली. सोनोग्राफी मशीन तपासल्या गेल्या, पथके नेमली. या झाडाझडतीमध्ये माणुसकीला काळिमा फासणाऱया घटना समोर आल्या. एका वर्षात परळीमध्ये गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱया विप्रेडील या इंजेक्शनच्या विक्रीत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले. एका अंदाजानुसार हा इंजेक्शनचा आकडा सुमारे 2800च्या घरात होता. त्यातील 65 टक्के इंजेक्शनची विक्री परळीतील डॉ. सुदाम मुंडे हॉस्पिटलजवळ असणाऱया गणेश मेडिकलमधून विक्री झाल्याचे स्पष्ट झाले. गर्भपाताच्या या बाजारात केवळ डॉक्टर, मेडिकल दुकानदारांनीच नव्हे तर औषध कंपन्यांनीही तुमडय़ा भरून घेतल्या. काही औषध दुकानदार ‘डॉक्टर’ बनले. ही स्थिती केवळ परळीमध्ये नाही, तर बीडमध्येही होती.

अखेर 17 जून 2012 रोजी डॉ.सुदाम मुंडे यांनी शरणागती पत्कारली. गर्भपाताच्या या प्रकरणात डॉ.सुदाम मुंडे यांना बीडच्या न्यायालयाने सजाही ठोठावली. बीडमध्ये गर्भपात करणाऱया डॉक्टरांना मोक्का लावण्याचे आदेश दिले गेले. बीडमध्येही बेकायदा गर्भपात करणाऱया तीन डॉक्टरांना सक्तमजुरीची सजा बीडच्या न्यायालयाने दिली. पुढे मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जिल्हाभर जनजागृती अभियान राबवले गेले. राज्य सरकार, आरोग्य विभाग आणि जिह्यातील सामाजिक संघटना जनजागृतीसाठी पुढे सरसावल्या. वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारांनीही हे शिवधनुष्य खांद्यावर घेतले. आपल्या कीर्तनातून ते मुलींचा गर्भपात करू नका असा संदेश देऊ लागले. दोन-चार वर्षांत मुलींचा जन्मदर पुन्हा एकदा स्थिर झाला.

अर्थात या स्कॅण्डलच्या काळय़ा सावल्या दूर गेल्या असे वाटत असतांनाच बीड जिह्यात नव्या स्कॅण्डलचा उगम झाला. काही वर्षांपूर्वी हा जिल्हा गर्भपाताच्या दुकारदारीने बदनाम झाला होता. आता गर्भपाताची जागा गर्भाशय शस्त्र्ाक्रियांनी घेतली. पैशाला लालचावलेल्या लोकांनी नवी शक्कल लढवली. गर्भाशय काढण्याचा ‘बाजार’ सुरू करण्यात आला. दुर्दैवाने तो देखील तेजीत आला. आजाराचा बागुलबुवा उभा करत शेकडो महिलांचे गर्भाशय काढण्याचे उद्योग केले गेले. बीड जिह्यातील स्त्राr रुग्णालये भरू लागली. कॅन्सरची भीती दाखवून गर्भाशयाची शस्त्रक्रिया करण्याचा नवा कारखाना बीड जिह्यामध्ये सुरू झाला. ज्या महिलांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया झाली, त्या महिलांना ऊसतोडीसाठी प्राधान्य दिले जाऊ लागले. केवळ ऊसतोड महिलांचेच गर्भाशय काढले गेले असे नाही, तर सामान्य गृहिणींनाही या स्कॅण्डलचा फटका बसला. बीड शहरामध्ये 30 आणि संपूर्ण जिह्यात 100 खासगी स्त्राr रुग्णालये आहेत. यातील 70 खासगी रुग्णालयांमध्ये गर्भाशय काढण्याचे पाप केले जात होते. बीडमधील प्रसारमाध्यमांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. मात्र सरकारला जाग आली नाही. अखेर इंग्रजी दैनिकात ‘बीड जिह्यातील महिलांना गर्भच राहिले नाही’ अशी स्टोरी प्रकाशित झाल्यानंतर केंद्र सरकारने थेट राज्य सरकारला नोटीस बजावली आणि राज्य सरकार हादरले. बीड जिह्यात कारवाईला सुरुवात झाली. गर्भाशय नसलेल्या महिलांच्या तपासण्या केल्या गेल्या. सात गावांमध्ये सर्वेक्षण राबवले गेले. त्यात धक्कादायक बाबी समोर आल्या. महिलांवर गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया मोठय़ा प्रमाणावर झाल्याचे स्पष्ट झाले. खासगी रुग्णालयांची झाडाझडती घेतली. मात्र गर्भाशयाच्या शस्त्रक्रियांवर कायद्याचा वचक नसल्याने खासगी रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियांची नोंद ठेवली गेली नाही. ज्या रुग्णालयांनी नोंदी ठेवल्या, त्या कमी आकडेवारीच्या होत्या. आकडेवारी लपवली गेली हे स्पष्ट झाल्याने बीड जिह्यातील 1320 गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम हाती घेण्याचे आदेश दिले गेले. आता गावागावामध्ये महिलांच्या गर्भाशयाची शस्त्रक्रिया झाली आहे का, कोणत्या रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली, शस्त्रक्रिया करण्याचे कारण काय होते हे तपासले जाणार आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांचे धाबे दणाणले. मात्र या प्रकारच्या शस्त्र्ाक्रियांवर नियंत्रण कसे मिळवणार? असा प्रश्न उपस्थित होतो. एकंदरीत गर्भपात ते गर्भाशय शस्त्रक्रिया या स्कॅण्डलने बीड जिह्याची वैभवशाली परंपरा काळवंडली गेली. महिलांना विकलांग करण्याचे काम झाले. अर्थात उशिरा का होईना, पण कायद्याच्या चौकटीत हे स्कॅण्डल आल्याने काहीतरी नियंत्रण या कुप्रवृत्तींवर मिळविता येईल असा विश्वास वाटू लागला आहे.

गावागावात टास्क फोर्स
गर्भाशयाच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण इतर जिह्यांच्या तुलनेत बीड जिह्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर आहे. या प्रकरणांकडे आरोग्य विभाग करडी नजर ठेवून आहे. संपूर्ण जिह्याचे सर्वेक्षणाचे काम हाती घेतले जाणार आहे. टास्क फोर्स नेमले जात आहेत. गावातील महिलांचे पथक गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया रोखतील. हे पथक गर्भाशयाचा आजार झालेल्या महिलांना योग्य सल्ला आणि उपचार देण्याचा प्रयत्न करतील.
– डॉ. राधाकिसन पवार, आरोग्य अधिकारी, जि. बीड

भयंकर आणि अमानवी
महिलांमध्ये गर्भाशयाचे आजार साधारणतः वयाच्या चाळिशीनंतर सुरू होतात. अपवादात्मक परिस्थितीमध्ये चाळिशीच्या आत एखाद्या महिलेच्या गर्भाशयाची शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र बीड जिह्यामध्ये 22 ते 35 वयोगटातील महिलांची दिशाभूल करून त्यांचे गर्भाशय काढण्याचे प्रमाण इतर जिह्यांच्या तुलनेत मोठय़ा प्रमाणावर आहे. 46 टक्के ऊसतोड कामगार महिलांचे गर्भाशय काढले गेले. कमी वयामध्ये गर्भाशय काढले तर त्या महिलेच्या आयुष्यावर मोठा दुष्परिणाम होतो. मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा ती विकलांग होते. हे अमानवी आहे.
-मनीषा तोकले, अध्यक्ष, जागर प्रतिष्ठान, बीड

जिल्हाधिकाऱयांची नवी नियमावली
बीड जिह्यातील गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांसाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी तातडीने नियमावली जाहीर केली. ती अशी-
– बीड जिह्यामध्ये नियमबाह्य शस्त्रक्रिया झाल्याचे आढळून आले आहे. तेव्हा महिलांनी लगेच शस्त्रक्रियेसाठी होकार देऊ नये.
– रुग्णालयाने दर्शनी भागात ‘शस्त्रक्रिया नको’ असे प्रबोधन करणारे फलक लावणे गरजेचे आहे.
– गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया करण्यापूर्वी जिल्हा चिकित्सकांची पूर्वपरवानगी घेण्याचे बंधनकारक असेल. हे बंधन खासगी रुग्णालयांवरही असेल.
– महिन्याचा एक दिवस शस्त्रक्रियांसाठी निश्चित करण्यात यावा आणि त्याच दिवशी गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया केल्या जाव्यात. मात्र गरज असलेल्या रुग्णांची आणि जिल्हा शल्यचिकित्सकांच्या परवानगीने शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडे प्रत्येक महिन्याला सादर करण्यात यावी.
– नियमांचा भंग करणाऱया खासगी रुग्णालयाची मान्यता रद्द केली जाईल.

धडाकेबाज अधिकारी
काही वर्षांपूर्वी संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱया बीड जिह्यातील गर्भपाताच्या स्कॅण्डलचा हाय व्होल्टेज ड्रामा हाताळण्यात तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गौरी राठोड यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. अत्यंत कठोरपणे आणि जबाबदारीने त्यांनी कर्तव्य बजावले. त्यामुळे या प्रकरणातील बडे मासे गळाला लागले होते. केवळ गर्भपाताचे रॅकेटच उद्ध्वत झाले नाही तर जिह्यातील घटलेला मुलींचा जन्मदर वाढण्यासही मोठी मदत झाली. त्यांच्याच काळात मुलींचा जन्मदर 779 वरून 850 पर्यंत गेला होता.

प्रशासनाचा अहवाल धक्कादायक
बीड जिह्यातील ऊसतोड महिला आणि गृहिणी यांची दिशाभूल करून गर्भाशय काढून टाकण्याच्या घटना मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचे समोर आल्यानंतर केंद्र सरकार, राज्याचा आरोग्य विभाग आणि राज्य महिला आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली. चौकशीचे आदेश दिले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी चौकशीसाठी पाच सदस्यांच्या पथकाची स्थापना केली. बीड जिह्यात गेल्या तीन वर्षांमध्ये झालेल्या गर्भाशय शस्त्र्ाक्रियांची माहिती घेवून अहवाल सादर करण्यात आला. त्यात धक्कादायक तपशील समोर आला. मागील तीन वर्षांत तब्बल साडेचार हजार महिलांचे गर्भाशय काढल्याचे उघडकीस आले आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या