
>> सई वाळींबे (बैरुत)
बैरुतमध्ये 4 ऑगस्टच्या संध्याकाळी जे घडले ते खूप भयंकर होते. हादरवून सोडणारे होते, पण त्या काचेच्या तुकडय़ांमधून, दगडांच्या भग्न अवशेषातून, रक्ताच्या धारांमधून, मोडलेल्या घरांमधून वाहणारा स्फटिकासारखा शुभ्र, निर्मळ, निःस्वार्थी झराही आम्ही पाहिला; तो झरा होता मानवतेचा…माणुसकीचा… बैरुतमधील ही आँखो देखी!!!
2020 मध्ये खूप काही घडले आहे, घडत आहे. संपूर्ण जगच विचित्र परिस्थितीतून जात आहे. त्यात आता बैरुतमधली ही घटना. पण तशातही लोक स्वार्थ बाजूला ठेवून एकमेकांना मदत करत होते. इथले सरकार, रेडक्रॉस संघटना व मेडिकल सर्व्हिसेस यांचे मदतकार्य अविरतपणे सुरू आहे, अखंडपणे चालू आहे. स्वतः संकटात असूनही रक्तदान कुठे व कसे करता येईल, याची चौकशी लोक करत आहेत.
स्थळ : लेबनॉन (बैरुत) तारीख 4 ऑगस्ट 2020. वेळ : साधारण संध्याकाळचे 6. माझे मिस्टर नुकतेच ऑफिसमधून आले होते. नेहमीप्रमाणे दिवसभराचा आढावा घेत चहापाणी झाले व मी पुन्हा माझ्या आध्यात्मिक लिखाण-वाचनात मग्न झाले. श्लोक सुरू करणार तेवढय़ात एक भयंकर, कानठळ्या बसवणारा धमाका ऐकू आला! तीव्र कंपनांनी घराचा ताबा घेतला. माझ्या हातातले पेन, कागद अस्ताव्यस्त विखुरले. आम्ही जोरात किंचाळलो ‘भूकंप? ब्लास्ट? फायरिंग?..की आणखी काही?..’
एव्हाना हॉलमधल्या मोठमोठय़ा काचेच्या खिडक्या, तावदाने निखळून खाली कोसळली होती. जमिनीवर तुकडे नव्हे; तर काचेचा चुराच अंथरला गेला. मला तर रडूच कोसळले. काय झालंय तेच समजेना. लक्ष सारखे छताकडे लागलेले; पण ते शाबूत दिसले. बाजूला फर्निचरचे सांगाडे चिरनिद्रेत पहुडलेले. काही मिनिटांतच ‘नॉर्मल’ दृश्य ‘भीषण’ झाले.
बाहेर रस्त्यावरून लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. खिडकीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असलेल्या मिस्टरांना मी जोरात ओढले. म्हंटले, ‘थांबा, कुठेही जाऊ नका. काय होतंय माहीत नाही. काही बरे-वाईट असेल तर आपण बरोबर राहू. आमची दोन्ही मुले दिल्लीत. त्यांना तक्षणी फोन लावला. न जाणो, काही घडले तर एकदा त्यांना पाहून घेऊ, त्यांच्याशी बोलून घेऊ असे वाटले. आई-बाबा आणि सासुबाईंच्या वयाचा व प्रकृतीचा विचार करून त्या क्षणी त्यांना फोन करणे टाळले. एव्हाना माझ्याभोवती अध्यात्मात शिकलेले सारे काही फेर धरू लागले होते. आत्मा अविनाशी असतो, तो केवळ शरीर बदलतो, वगैरे वगैरे. लांब कुठेतरी यमदेव प्रकट झाले की काय असा भासही झाला.
महाभयंकर काहीतरी घडले होते. हिरोशिमा-नागासाकीचे सगळे तपशील मनात हजेरी लावून गेले. मन आकलनाच्या प्रयत्नात; तर डोकं सुन्न, अशी अवस्था!
तेवढय़ात फोन घणघणू लागले. शेजारचे, वरच्या मजल्यावरचे सगळे धावत, ओरडत खाली आले. फ्रेंच, इंग्लिश, अरेबिक सगळ्या भाषांमध्ये परस्परांची विचारपूस झाली. लिफ्ट टाळून आम्ही सगळे जिन्याने खाली उतरलो. फोनवर बोलणारी आमची दोन्ही मुले त्यावेळी खरं तर काळजीत होती, घाबरलेली होती; पण ती आमच्यापेक्षाही मोठी आणि समंजस होऊन धीर देत होती. असं करा, तसं करू नका सांगत होती.
खाली अजूनही गोंगाट चालूच होता. अंशतः किंवा पूर्णतः उजाड झालेली घरे, दुकाने, मोडलेल्या गाडय़ांच्या काचेच्या चुराड्यामुळे चकाकणारा रुपेरी रस्ता, रडत रडत आपल्या ‘नियर्स ऍण्ड डियर्सशी’ संपर्क साधण्याच्या प्रयत्नात असलेले लोक, असे दृश्य असूनही सगळे एकमेकांशी बोलत होते, धीर देत होते, शक्य तेवढी मदत करत होते.
काही लोकांची भाषा आम्हाला कळत नव्हती; पण त्यांची वेदना मात्र हृदयापर्यंत पोहोचत होती. भयानक घडले होते यात तिळमात्रही शंका नव्हती, पण नेमके काय हे कळायला थोडाथोडका नाही, तर खूप वेळ गेला. हे सगळे कसे झाले, कशामुळे झाले वगैरे तपशिलात मी जाणार नाही; कारण प्रसार माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचत असेलच आणि त्या घटनेवर टिप्पणी करण्याचा अधिकार मला नाही. त्यामुळे मी आता मूळ मुद्दय़ाकडे वळते.
तास-दीड तासाने आम्ही, आता आणखी काही घडत नाहीये नं याची खात्री करून वर घरी आलो. घरात पाऊल ठेवायलाही जागा नव्हती. मोठमोठी बारदाने, काचा सर्वत्र विखुरलेल्या होत्या. लाकडाची तुसं आणि सड्या हाताला लागत होत्या. हॉलची भिंत पूर्ण उजाड झाली होती. प्रचंड घोंघावता वारा आणि वेडेवाकडे हेलकावणारे पडदे भयावह दिसत होते.
आम्ही झाडू घेऊन, काचा बाजूला करून, छोटी पाऊलवाट करून घेतली व सर्वप्रथम आमची पावलं देवघराच्या दिशेला वळली. विनम्र भावाने देवापुढे डोके टेकले. काही बोलण्याची गरजच नव्हती; कारण कृतज्ञता अबोलच असावी. त्या सांध्य प्रकाशात देवाचे शांत, सगुण-साजिरे रूप ‘भिऊ नकोस,मी तुमच्या पाठीशी आहे’ असे सांगत होते. मघाशी दिसलेले यमराज आता लांब-लांब जात दिसेनासेच झाले होते.
हळूहळू मग या स्फोटाचे तपशील कळू लागले. आम्ही त्या घटना स्थळापासून कितीतरी दूर, पण जे जवळ असतील त्यांची अवस्था काय झाली असेल, याची कल्पनाही करवत नव्हती. आम्हालाही ऑफिसमधल्या लोकांचे, मैत्री-परिवाराचे, नातेवाईकांचे लहानांचे, मोठय़ांचे, अगदी सगळ्यांचे फोन आले. ‘बातमी बघितली आणि तुमचीच आठवण झाली’. सगळेजण हेच सांगत होते. शेवटी रात्री उशिरा कडक चहा पिऊन आम्ही पाठ टेकली. सगळे दिवे तसेच चालू ठेवले; कारण झाल्या प्रसंगाची जबरदस्त धास्ती मनात होती. पटकन पुन्हा खाली जावे लागले तर! या भीतीने आम्ही कपडे न बदलता तसेच झोपलो. मनात देवाचा अखंड धावा चालू होता.
दुसरा दिवस उजाडला. मन सुन्नच होते. काल घडलेले डोळय़ांपुढून हलतच नव्हते. हळूहळू आवरण्याच्या प्रयत्नात असतानाच घरमालकाने पाठवलेल्या हेल्परनेही येऊन साफसफाई केली व ‘काचा बसवायला संध्याकाळी आलो तर चालेल का?’असे विचारू लागला. त्याच्या घराचीही अवस्था काही वेगळी नव्हती. त्यामुळे आम्ही त्याला ‘तुझ्या घरचे ठाकठीक करून मग ये’ असे सांगितले.
आवराआवर करताना आमचा जीव अगदी मेटाकुटीस आला होता. तेवढय़ात ऑफिसमधली मुलगी दारात उभी, हातात खाण्याची पॅकेट्स (गरम-गरम मनुषे) घेऊन. म्हणाली, ‘दमला असाल नं, आज लंच बनवू नका.’ आम्हाला आपलेपणाचा आधार देऊन ती निघाली. एकूणच आमच्यावर फोन्स, मेसेजेस, मेल्सचा अगदी वर्षाव झाला, अजूनही होतोय. आपण केलेली काळजी, विचारपूस खूप धीर देऊन गेली. बैरुतमध्ये 4 ऑगस्टच्या संध्याकाळी जे घडले ते खूप भयंकर होते. हादरवून सोडणारे होते, पण त्या काचेच्या तुकडय़ांमधून, दगडांच्या भग्न अवशेषातून, रक्ताच्या धारांमधून, मोडलेल्या घरांमधून वाहणारा स्फटिकासारखा शुभ्र, निर्मळ, निःस्वार्थी झराही आम्ही पाहिला; तो झरा होता मानवतेचा…माणुसकीचा!!





























































