
>> निलेश कुलकर्णी
ज्या बंगालमधून कधीकाळी स्वातंत्र्याचा ‘जय हिंद’चा नारा पहिल्यांदा घुमला, राष्ट्रगीताचे सूर ज्या भूमीत जन्माला आले, त्या भूमीत सध्या राजकीय ‘खूनखराब्याचे युद्ध’ पेटले आहे. विद्यमान केंद्र सरकारने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांना सत्तेतून बेदखल करायचा ‘विडा’ उचललेला दिसत आहे. ममतादिदींचा पक्ष फोडण्याचे सगळे डावपेच टाकले जात आहेत. भाजपच्या आक्रमणाला थोपविण्यासाठी बंगाली अस्मितेचा आधार घ्यायला सुरुवात केली आहे. ‘‘माझ्या जिवात जीव आहे, तोवर पवित्र बंगालला ‘गुजरात’ होऊ देणार नाही’’, अशी गर्जना त्यांनी केली आहे. ममता यांची ही चाल भाजपला महागात पडू शकते.
कोणत्याही राजकीय पक्षाला राजकीय विस्ताराची महत्त्वाकांक्षा असणे गैर नाही. बंगालच्या खाडीत ‘कमळ’ उमलावे ही तर भाजपची जुनी आकांक्षा आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे चुकीचे नाही. मात्र ज्या पद्धतीने पश्चिम बंगालच्या भूमीत सध्या राजकीय रण पेटले आहे, त्यात रोज दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांचे मुडदे पडत आहेत. हे चित्र भयंकर आहे. ममता बॅनर्जी यादेखील ‘बंगालच्या वाघीण’ आहेत, जाँबाज योद्धा आहेत. डाव्यांची सद्दी प्राण पणाला लावून त्यांनी संपुष्टात आणली. त्यांनी आता भाजपच्या आक्रमणाला थोपविण्यासाठी बंगाली अस्मितेचा आधार घ्यायला सुरुवात केली आहे. ‘‘माझ्या जिवात जीव आहे, तोवर पवित्र बंगालला ‘गुजरात’ होऊ देणार नाही’’, अशी गर्जना त्यांनी केली आहे. ममता यांची ही चाल भाजपला महागात पडू शकते. कारण बंगाली अस्मितेला दिल्लीवाले डिवचत आहेत, हे लक्षात आले तर साहित्य, कला, संस्पृती व मनोरंजनाच्या क्षेत्रात अव्वल असलेला बंगाल एकजुटीने ममता यांच्या पाठीशी उभा राहू शकतो. स्वांतत्र्यपूर्व काळापासूनची बंगालची ही ‘परंपरा’ आहे. त्यामुळे बंगालचे रण पेटवताना आपल्या शेपटाला आग लागणार नाही, याची काळजी भाजपने घेतलेली बरी.
हाडवैर वगैरे काय असते ते सध्या प. बंगालमध्ये अनुभवाला मिळत आहे. बंगालात रोज राजकीय हिंसाचार होतो आहे. डाव्यांचा बोलबाला असताना बंगालात त्यांच्याविरोधात बोलणाऱयांना थेट यमसदनी पाठविले जायचे. थोडय़ाफार फरकाने अजूनही तीच परंपरा सुरू आहे. तृणमूल काँग्रेसच्या सुवेंदू अधिकारी यांच्यासह अनेक मातब्बरांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. मात्र त्यामुळे एक वेगळीच अडचण भाजपपुढे निर्माण झाली आहे. केंद्रातले एक मंत्री व असनसोलचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी ‘हायकमांड’ला न घाबरता आपल्या व्यथेला फेसबुकद्वारे मोकळी वाट करून दिली आहे. ज्यांच्याशी वर्षानुवर्षे संघर्ष केला. ज्यांनी आमच्या कार्यकर्त्यांचे मुडदे पाडले त्याच लोकांना जर पक्षात वाजतगाजत घेतले जात असेल तर त्यासारखे दुर्दैव ते काय? सुप्रियोंनी अनेक निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांची भावना बोलून दाखविली आहे. मात्र ‘फोडा आणि झोडा’ या तंत्रावर भरवसा असलेले सध्याचे भाजपश्रेष्ठी सुप्रियोंच्या या ‘रडगाण्या’कडे कितपत लक्ष देतील, याबाबत साशंकताच आहे. बंगालचे रण पेटलेच आहे. ते लोकशाही पद्धतीने पेटावे. ‘कार्यकर्त्यांच्या आहुती’ त्यात राजकीय स्वार्थासाठी पडू नयेत, इतकेच.
काँग्रेसचे बाबूजी…
अहमद पटेलांच्या निधनामुळे काँग्रेसची अगोदरच अपरिमित हानी झालेली असताना मोतीलाल व्होरांसारख्या एका निष्ठावंताच्या जाण्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. व्होरांचे वैशिष्टय़ असे की, ते अखेरच्या श्वासापर्यंत पक्षासाठी जगले. काँग्रेसच्या ‘24 अकबर रोड’ या मुख्यालयात सुट्टीच्या दिवशी एकवेळ शिपाई यायचे नाहीत, पण व्होरा हे आपल्या कार्यालयात हिशेब तपासत बसलेले असायचे, अशी ती विलक्षण पक्षनिष्ठा. पक्षाच्या तिजोरीची चावी हाती असल्याने अनेक गरजू पेशंटसाठी विविध समाजोपयोगी कामासाठी त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची रीघ असायची. व्होरा कोणालाही सढळ हाताने मदत करत, मात्र हिशेबाच्या बाबतीत ते अत्यंत काटेकोर. दस्तरखुद्द राहुल गांधींनी त्याबद्दलचा कोटकोरपणाचा किस्सा सांगितला होता. हिशेब म्हणजे हिशेब. त्यात गोलमाल, झोलझाल त्यांनी कधी सहन केला नाही. पत्रकारांशी बोलताना ते भलतेच खुलायचे. हसतमुखाने स्वागत करायचे. अडचणीचा प्रश्न आला की कानातील श्रवणयंत्राचा खुबीने वापर करून ‘मुझे सुनाई नही दिया’ असे म्हणत पत्रकारांची गुगली परतवून लावायचे. पत्रकारांनाही त्यांची ही सवय माहिती झाली होती. मोतीलाल व्होरा यांच्यासारखे कमिटेड नेते ही कोणत्याही पक्षासाठी संपत्ती असते. काँग्रेसच्या तिजोरीची ‘प्रामाणिक चावी’ त्यांच्या जाण्याने हरवली आहे.
पंगा महागात पडला
मोदींच्या काळात देशात जलशक्ती मंत्रालय निर्माण झाले. (जुन्या खात्याचे नाव बदलणे हेच ते नवनिर्माण) या खात्याची जबाबदारी गजेंद्रसिंग शेखावतांवर सोपविण्यात आली. हे शेखावत एरव्ही देशात फारसे कोणाला माहीत झालेही नसते. मात्र संजीवनी व्रेडिट सोसायटीत झालेल्या नऊशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी जोधपूरच्या न्यायालयाने या सोसायटीचे कर्तेधर्ते असलेल्या शेखावत व त्यांच्या पत्नीला नोटीस बजावली आहे. ‘इमेज बिल्डिंग’ करणे आणि तसे ‘नेरेटिव्ह’ तयार करणे यात भाजपचा कोणी हात धरू शकणार नाही. या शेखावतांचे तसेच झाले. पाकिस्तानच्या सीमेलगत देशासाठी काम करणारा स्वयंसेवक म्हणून त्यांना पुढे आणले गेले. बरे त्यात पडले ते स्वच्छ चारित्र्याचे निष्कलंक वगैरे. मग 2014 मध्ये लोकसभेला तिकीट निवडून आल्यानंतर पक्षात जबाबदारी. आता मंत्री. मध्यंतरी राजस्थानात ‘ऑपरेशन लोटस’ करून अशोक गहलोतांची खुर्ची हिसकावून ती वसुंधरा राजेंना न देता याच शेखावतांना बहाल करण्याचे मनसुबे दिल्ली दरबारी रचले गेले होते. राजकारणात महावस्ताद असलेल्या गेहलोत व वसुंधरा राजेंनी छुपी युती करून शेखावतांचे हे संकट त्यावेळी अक्षरशः पिटाळून लावले. त्यांची छुपी युती किती महत्त्वाची होती हे आता नव्या घोटाळ्यामुळे उघड झाले आहे. राजस्थानच्या राजकारणात शेखावत ‘दिल्लीचे प्यादे’ बनले. गेहलोत व वसुंधरा राजेंशी उघडपणे घेतलेला पंगा त्यांना तसाही महागात पडणारच होता. आता घोटाळ्याप्रकरणी नोटीस आल्यामुळे एरव्ही ज्यांच्या निष्पंलकतेचे पोवाडे गायले जायचे ते शेखावत निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत आपल्या खुर्चीचा त्याग करतात का ते बघायचे.





























































