
>> वैजयंती कुलकर्णी
गीता तत्त्वज्ञान हे शास्त्र आहे. तसेच ते विज्ञानही आहे. हा महासिद्धांत आचार्य विनोबांनी मांडला. भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी समाप्तीसमर्पणाच्या उच्चारात ‘ब्रह्माविद्यायां योगशास्त्र’ असा उल्लेख येतो. भगवद्गीता ही ब्रह्मविद्येचा अविभाज्य भाग बनून राहिली आहे. आजचे विज्ञान प्राचीन ब्रह्मविद्येला कवेत घेऊनच अंतिम सत्याचा उलघडा करेल. आचार्य विनोबांचेसुद्धा हेच म्हणणे आहे. विज्ञानाच्या अनेक शाखांतून चाललेले संशोधन, फलिते, निष्कर्ष यांचा वेध घेत त्यांनी आपले विज्ञान आणि ब्रह्मविद्याविषयक प्रमेय मांडले आहेत. ज्याला आधुनिक विज्ञान म्हणतात. त्याचे आणि ज्या ‘ब्रह्मविद्या’ म्हणतात, म्हणजे अध्यात्म यांचे खरे तर उद्दिष्ट एकच आहे. ते म्हणजे जगाला आकलन करून घेणे.
भगवद्गीता हे भगवंताचे गीत आहे. तसेच सर्व शास्त्रांचे शास्त्र आहे. त्यामध्ये तत्त्वज्ञान तर आहेच, पण उपनिषदांचे तर सारच आहे.
‘सर्वशास्त्रमयी गीता सर्व देवमयो हरिः। सर्वतिर्थमयी मङग सर्व मेद मयो मनुः।।’ असं आपण शास्त्र वचन सांगतो. ‘सर्वशास्त्रमय म्हणजे सर्वशास्त्रांचे सार गीता आहे. सर्वदेवमय हरि आहे. सर्वतीर्थमयी गंगा आहे आणि सर्वमेदमयमनु आहे. ज्यामुळे आत्मोन्नतीचा सात्त्विक मार्ग आपल्याला दिसेल असं एकच शास्त्र म्हणजे गीता होय!
अन्य दुसऱ्या देशात ईश्वरांचे, भगवंताचे प्रेषित येतात. आपण तर खूप भाग्यवान आहोत, आपला देश खूप महान आणि सुंदर संस्कृतींनी भरलेला असल्याने आपल्या इथे प्रत्यक्ष भगवंतांनीच अवतार घेतला. म्हणूनच भारतवर्ष म्हणजे ‘देवघर’ आहे. बार्हस्पत्य संहितेत एक खूप चांगला, सुंदर असा श्लोक आहे.
“हिमालय समारभ्य यावदिन्दुरसोवरम्।
तं देवनिर्मितं देशं हिंदुस्थानं प्रचक्षते।।’’
ज्याचा प्रारंभ हिमालयापासून झालेला आहे आणि ज्याची सीमारेषा हिंदू महासागरापर्यंत आहे तो देश प्रत्यक्ष देवांनी निर्माण केलेला आहे. म्हणूनच पूर्वीपासून लोक या देशाला हिंदुस्थान म्हणत. कारण याच देशात भगवद्गीता जन्मली. जगातील प्राचीन वाङ्मय आपल्याकडे आहे. कारण वेद आपल्याकडे आहेत. त्याचं महत्त्व आपण जाणतोच! वेद हे अक्षर वाङ्मय होय. त्यामुळे पृथ्वीवर ते अखंड राहणार आहेत.
खरे तर गीतेला भगवद्गीतम् असे म्हणायला पाहिजे, पण भगवद्गीता असं म्हटल्यानं स्त्रीलिंगी संज्ञा झाली आहे. स्त्री ही निःसंशय श्रेष्ठ आहेच! जसे शिवापेक्षा शक्ती थोर. हे तर सत्यच आहे. तरीपण आपल्या समाजात स्त्रीला तसा मान कमीच आहे. तरीसुद्धा स्त्री म्हटले की, आईचे रूप डोळ्यासमोर येते. माऊलीच्या ठायी जे वात्सल्य आहे. ते कोणाकडे नाही. म्हणूनच गीता ही माऊली आहे. ही माता नेहमीच अमृताचा वर्षाव करते.
वीर अर्जुनाचा तीव्र विषादामुळेच गीतारूपी प्रसाद निर्माण झाला. अंधःकारातून एकदम तीव्र प्रकाशात यावे आणि ते चैतन्य पहावे असं गीतेकडे पाहिल्यावर प्रत्येक मनुष्याला वाटते. आपल्या एकनिष्ठ भक्ताला निमित्त करून अखिल मानवजातीला केलेला तो दिव्य ‘हृदय संदेश’ आहे. एकच सत्त्व-एकच परमार्थ श्रीकृष्ण निप्रियसखा अर्जुन दोन रूपात प्रकटले. श्रीकृष्णार्जुनाची अलौकिक जोडी जगाच्या वाङ्मयात अतुलनीय ठरली. एकच सर्व ऐश्वर्यसंपन्न नारायण आणि दुसरा सर्व गुण संपन्न नर! एकमेव गुरू-शिष्य आपल्याला गीतेत मिळतात.
भगवद्गीतेची उभारणी शुद्धभावना-बुद्धी आणि विश्वास या तीन आधार शीलांवर अधिष्ठत आहे. अर्जुनाचे अंतःकरण हे नितांत शुद्ध, सरळ आणि लोककल्याणकारी भावनांनी ओतप्रोत भरलेले आहे. पुरुषोत्तम श्रीकृष्णाची परम तेजस्वी बुद्धी नितांत सत्त्वयुक्त, शुद्ध धर्माधिष्ठत, ईश्वरीय ऐश्वर्य संपन्न आणि सर्वभूतहितेरज आहे. या दोन परम मित्रांचा परस्परांवर असलेला विश्वास अवर्णनीय आहे. हा गुरू-शिष्यातला सुसंवाद आहे. अर्जुनाची भूमिका सर्वार्थाने शरण आलेल्या निष्कपट शिष्योत्तमाची आणि श्रीकृष्णाची भूमिका, समस्तज्ञान, वैराग्य, संपूर्ण उपासना आणि समग्र कर्माचे अंतिम रहस्य जाणणाऱ्या योगयोगेश्वर भगवंताची आहे.
यच्छ्रेयःस्यांन्निश्चितंबु ब्रूहितन्मे
शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम।। (2.7)
ही प्रामाणिक आणि परमोत्कट भावना घेऊनच अर्जुन भगवंतांच्या चरणी शरणागत झालेला आहे. या व्याकूळ अर्जुनाला लक्ष्य करूनच भगवंतांनी गीता सांगितली. अमृतमयी गीतेची गंगा प्रवाहित झाली.
मानवी जीवनांचे अनेक पापुद्रे उलघडून दाखविताना योगेश्वर श्रीकृष्णांनी विषादयोग, सांख्ययोग, कर्मयोग, आत्मसंयमयोग, राजविद्या राजगुह्ययोग, विभूतीयोग, भक्तियोग, पुरुषोत्तमयोग असे अनेक गोष्टींचे दर्शन घडविले आहे. हे सारे तत्त्वज्ञान समजावून घ्यायला, ते आत्मसात करायला, आपल्या जीवनात उतरावयाला त्याची यथार्थ अनुभूती घ्यायला गीता अभ्यासायला हवी, वाचायला हवी. अगतिक अर्जुनाला कृष्णाने जीवनाचे सार समजावून सांगून युद्धाला प्रवृत्त केले. मनाचा दुबळेपणा माणसांनी सोडून द्यावा. आपल्या कर्तव्याला दिलेल्या किंवा मिळालेल्या कर्माला कसे सामोरे जावे, हे कृष्णांनी आपल्याला सांगितले. “स्व-धर्मात भला मृत्यू, पर-धर्माहुनी बरा।।’’ हे तत्त्व सांगताना ‘माणुसकी’ हाच मानवाचा खरा धर्म आहे हेच गीतेत भगवंत सांगतात. मनुष्य तत्त्वाचा त्याग करणारा केवळ रानटी पशूच बनेल.
गीतेमध्ये चित्ताची स्थिरता आणि एकाग्रता सांगितली आहे. त्यासाठीच तर यम-नियम, प्राणायाम-प्रत्याहार-धारणा या सर्व तद्विषयक पायऱयांनी जावे लागते.
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमव सादयेत।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरामैव रिपुरात्मेनः।। (6.5)
स्वतःचा उद्धार किंवा स्वतःचा सर्वनाश प्रत्येकाच्या हातात आहे. कारण हित करणारा किंवा शत्रू आपणच असतो. दोन्ही भूमिका आपणच करतो, पण ते लक्षात येत नाही. ‘तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस.’
जर्मन, इंग्लड, इस्लाम, पारशी आदी धर्मपंडितांनी आणि तत्त्ववेत्त्यांनी गीतेची महती त्यांच्या अनुभवानुसार त्यांना समजली तशी वर्णन केलेली आहे. महात्मा गांधींचे सत्याग्रही, तत्त्वज्ञानांचे गुरुदेव, अमेरिकेचे थोरो यांनी तर ‘सर्वभूतेषु चात्मानि, हा श्लोक माझ्या जीवनाचे सारसर्वस्व, संरक्षण, निरामय आनंद देणारे रसायनच मानला होता.
गीता तत्त्वज्ञान हे शास्त्र आहे. तसेच ते विज्ञानही आहे. हा महासिद्धांत आचार्य विनोबांनी मांडला. भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी समाप्तीसमर्पणाच्या उच्चारात ‘ब्रह्माविद्यायां योगशास्त्र्’ असा उल्लेख येतो. भगवद्गीता ही ब्रह्मविद्येचा अविभाज्य भाग बनून राहिली आहे. आजचे विज्ञान प्राचीन ब्रह्मविद्येला कवेत घेऊनच अंतिम सत्याचा उलघडा करेल. आचार्य विनोबांचेसुद्धा हेच म्हणणे आहे. विज्ञानाच्या अनेक शाखांतून चाललेले संशोधन, फलिते, निष्कर्ष यांचा वेध घेत त्यांनी आपले विज्ञान आणि ब्रह्मविद्याविषयक प्रमेय मांडले आहेत. ज्याला आधुनिक विज्ञान म्हणतात. त्याचे आणि ज्या ‘ब्रह्मविद्या’ म्हणतात, म्हणजे अध्यात्म यांचे खरे तर उद्दिष्ट एकच आहे. ते म्हणजे जगाला आकलन करून घेणे. विज्ञान हे सृष्टीला ‘जड’ मानते तर अध्यात्मविद्या सृष्टीला ‘चेतन’ मानते. त्यामुळे जडाचे म्हणजे भौतिक पदार्थाचे नियम आणि त्यामागील तत्त्व शोधून काढण्यात विज्ञानाला रस असतो व त्याला अनुरूप अशी त्याची पद्धती असते. या उलट मनाच्या म्हणजे चेतनद्रव्याच्या आतमध्ये वाकून चेतनशक्तीचा शोध आणि आकलन करून घेण्याचा मार्ग अध्यात्मविद्येने स्वीकारलेला असतो. भविष्यकाळात विज्ञान आपल्या ज्ञानाने आणि पद्धतीने ब्रह्मविद्येला सिद्ध करेल. ‘ब्रह्मविद्यायां योगशास्त्र्ाs’ म्हणजे प्रत्येक गीताध्यायाची समाप्ती करताना विज्ञानांचे भान ठेवूनच आपण गीता समजून घेऊ!





























































