लोकविधा – भारूडाचे गारूड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. मुकुंद कुळे << [email protected]  >>

नाथांची भारुडाची लोकपरंपरा  गावाकडच्या माणसांनीच निकोपपणे जपली आहे. भारूड हा अतिशय लवचिक लोककला प्रकार आहे. तिथे वेशभूषेसाठी किंवा नेपथ्यासाठी पडद्यामागे काही करण्याची गरज भासत नाही. आपल्या सादरीकरणातून एक वेगळा अन्वयार्थ लावण्याची ताकद भारुडात आणि ते सादर करणाऱ्या लोककलावंतांमध्ये आहे.

‘अबक दुबक तिबक, त्रिभुवनी खेळ मांडू

भिऊ नको गांडू, आता खेळ इटीदांडू…’

पाच-सहा हजार प्रेक्षकांच्या घोळक्यात थेट असं म्हणत गंगूबाई जाधव आणि लक्ष्मीबाई गिराम या पन्नाशीच्या वयोमानातल्या दोन बायांनी काही वर्षांपूर्वी साऱ्यांची झोप उडवली होती. त्या दोघींचे ढालगज आवाज काळोखाला चिरत होते आणि पेंगुळतीला आलेल्या बाया-बाप्यांची झोप खर्रकन् उतरत होती. खरं तर त्या अगदी ठासून भारूड सादर करत होत्या. मराठमोळ्या मातीतलं अस्सल सोनं… कारण भारूड हाच इथल्या लोकपरंपरेतील रंगतत्त्वाचं दर्शन घडवणारा जातिवंत लोकाविष्कार!

प्रसिद्ध नाटय़ दिग्दर्शक प्रो. वामन पेंद्रे यांनी आपल्या वडिलांच्या (प्रसिद्ध भारूडकार माधवराव पेंद्रे) स्मृतिप्रीत्यर्थ आपल्या गावी (जिल्हा- बीड, तालुका- केज) दरडवाडीला पहिलाच राष्ट्रीय भारूड महोत्सव आयोजित केला होता. याच भारूड महोत्सवात सहभागी झालेल्या गंगूबाई जाधव आणि लक्ष्मीबाई गिराम या दोघींनी लोककलेचे अस्सल रंग दाखवले होते. केवळ या दोघींनीच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्वच भारूड पथकांनी त्यावेळी भारुडाचे एकेक पैलू उलगडून दाखवले होते. दोन दिवस चाललेल्या त्या महोत्सवात संपूर्ण महाराष्ट्रातून पन्नासेक भारूड पथपं सामील झाली होती आणि थंडीवाऱ्याची पर्वा न करता संध्याकाळी पाच वाजल्यापासून पहाटे तीनपर्यंत रसिक मायबाप त्यांच्या कलेला दाद होता. कारण ही भारुडं आपल्या मूळ रूपात, मूळ ढंगात आणि आपल्या मूळ रंगपीठावर सादर होत होती.

शहरांतून लोककलांना बरे दिवस आल्यावर आता तमाशासकट गोंधळ-जागरण आणि भारूडही आपलं मूळ ‘लोक’तत्त्व हरवत चाललेलं आहे, पण जे अस्सल आहे, जे लोकपरंपरेतून आलेलं आहे आणि जे परंपरेचं जुनेपण सांभाळूनही नवतेचं भान राखणारं आहे ते अद्यापही ‘लोकरंगभूमी’वर आपलं स्वत्व टिकवून आहे. अशा अस्सल खणखणीत प्रयोगात्म लोककलांचा रंगमंच अजूनही घरासमोरचं अंगण, देवळाचं प्रांगण आणि झाडाखालचा पारच आहे. विशेष म्हणजे दरडवाडीत भरलेल्या त्या ‘भारूड महोत्सवा’ने लोककलेच्या जपणुकीकरिता आवश्यक असलेली ही सारी (मातीच्या रंगमंचापासून झाडांनी वेढलेल्या परिसरापर्यंत) सामग्री उभी केली होती. त्यामुळे मराठीच नव्हे, तर मुस्लीम भारूड पथपंही यात आवर्जून सामील झाली. महाराष्ट्रीय, किंबहुना हिंदुस्थानी लोककलांनी सगळ्याच प्रवाहांना आपल्यात कसं सामील करून घेतलं आहे, त्याचं ते  उत्तम उदाहरण होतं. या साऱ्या वैशिष्टय़ांमुळेच तो भारूड महोत्सव केवळ रंगलाच नाही, तर त्याने उपस्थितांना झिंगवलं आणि प्रसंगी लोळवलंही. ती ताकद होती लोकरंगभूमीवरच्या अस्सल भारुडाची आणि त्याने केलेल्या गारुडाची!

भारुडात असलेल्या या गारुडाची ताकद एकनाथांनी ओळखली होती. म्हणूनच समाज प्रबोधनासाठी कीर्तनाऐवजी त्यांनी या कला प्रकाराला जवळ केलं आणि वासुदेव, नंदीबैलवाला, पैकाडीण, वैदू अशा लोकसंस्कृतीतील भटक्यांच्या माध्यमातून 125 विषयांवर तब्बल तीनेकशे भारुडं लिहिली. एकनाथांच्याही आधी नामदेव-ज्ञानदेवांनी भारुडं लिहिली. पण ती आध्यात्मिक होती. मात्र नाथांना समाजमनाची नस कळलेली होती. म्हणूनच अलुतेदार-बलुतेदारांसह साऱ्यांना सामावून घेत त्यांनी भारुडं रचली. नाथांच्या भारुडांचं वैशिष्टय़ म्हणजे ती लिहिताना त्यांनी शैलीही बहुजन समाजाला जवळची अशीच निवडली.

भारुडाचे साधारणपणे भजनी भारूड, सोंगी भारूड आणि कूट भारूड असे तीन प्रकार मानले जातात. पैकी भजनी भारूड हे कीर्तनाच्या अंगाने गेलं. कूट भारूड म्हणजे संतांच्या ‘चिंचेच्या पानी एक देवालय उभारिले, आधी कळस मग पाया रे’ किंवा ‘मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती…’सारख्या कूट रचना. या कूटरचनांबद्दल आकर्षण वाटलं तरी बहुजन समाज त्यांच्या वाटय़ाला फार गेला नाही. मात्र सोंगी भारूड थेट नाथांच्या काळापासूनच समाजमनात रुजलं नि वाढलंदेखील! यामागचं प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या विषयात सादरीकरणात नाटय़ात्मकतेला असलेला वाव. या भारूड रचनांमध्ये नाटय़ तत्त्वं ठासून भरलेली असल्यामुळे पुढे कालौघात भारुडं, आख्यानांसारखी नाटय़रूपानेच सादर व्हायला लागली. उदाहरणार्थ नाथांनी रचलेल्या भारुडांमध्ये पात्ररचना, संवाद यांसारख्या गोष्टींना भरपूर वाव होता. त्या आधारानेच नंतरच्या काळात महाराष्ट्रात भारुडं ‘नाटकीय’ अंगाने सादर व्हायला लागली. महाराष्ट्रात अलीकडच्या काळात लोकनाटय़-वगनाटय़ ही संकल्पना चांगलीच रुजलेली आहे. पण या लोकनाटय़-वगनाटय़ाची गंगोत्री नाथांची. ही सोंगी भारुडंच असल्याचं म्हणायला भरपूर वाव आहे. कारण लोकनाटय़ात ज्याप्रमाणे विनोदाची पेरणी करत मूळ गंभीर विषयाला हात घातला जातो. तद्वतच नाथांनी भारुडांमध्ये विनोदाची पखरण करतच समाजातील वाईट रूढींवर, अपप्रवृत्तींवर ताशेरे ओढले आहेत. आज लोकरंगभूमीवर होणारी सोंगी भारुडं पाहिली की, आपण लोकनाटय़ पाहतोय असंच वाटतं.

भारुडाच्या ठिकाणी असलेली ही रंगमंचीय ताकद दरडवाडीचा भारूड महोत्सव पाहताना जाणवत होती. किंबहुना नाथांची भारुडाची लोकपरंपरा या गावाकडच्या माणसांनीच निकोपपणे जपली आहे. महत्त्वाचं म्हणजे एखाद्या परिपूर्ण नाटकासाठी आवश्यक असणाऱ्या साऱ्या गोष्टी भारुडात आहेत. यात विषय आहे, पात्ररचना आहे, संगीत आहे आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं तर भारूड हा अतिशय लवचिक लोककला प्रकार आहे. तिथे वेशभूषेसाठी किंवा नेपथ्यासाठी पडद्यामागे काही करण्याची गरज भासत नाही. जे काही घडतं ते प्रेक्षकांसमोर. मग कपडे बदलायचे असोत किंवा बुवाची बाई करायची असो… आपल्या सादरीकरणातून एक वेगळा अन्वयार्थ लावण्याची ताकद भारुडात आणि ते सादर करणाऱ्या लोककलावंतांमध्ये आहे.

महाराष्ट्रात अलीकडच्या काळात दिवंगत निरंजन भाकरे, चंदाबाई तिवाडी आणि मीराबाई उमप या लोककलावंतांनी भारूड हा लोककला प्रकार पुन्हा एकदा लोकप्रिय केला आहे. त्यामुळेच चंदाबाई तिवाडी यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे, तर दिवंगत निरंजन भाकरे यांनी ‘तुला बुरगुंडा होईल बाई गं’ किंवा ‘महादेवाचा नंदी आला’सारख्या भारुडांनी नागर रसिकांना भारावून टाकलं होतं. नव्या पिढीतही शेखर निरंजन भाकरे, हमीद सय्यद यांच्यासारखे अनेक तरुण लोककलावंत आहेत, जे आवर्जून भारूड लोककला प्रकार जपून आहेत. मात्र भारुडच नाही, तर कुठलीही लोककला नागर रंगमंचावर सातत्याने सादर केली गेली की, तिला एक प्रकारचं साचलेपण येतं. अर्थात नागर जनांसाठी ते कायमच नवं असल्यामुळे ते त्याला दाद देत राहतात. पण त्यामुळे लोककलांमधली लवचिकता हरवण्याची शक्यता असते. त्या मानाने आजही ग्रामीण भागात भारूड करणाऱ्या मीराबाई उमप यांच्या सादरीकरणाची नाळ अद्याप लोकपरंपरेशी जोडलेली आहे. मीराबाई रांगडय़ा भारूडकार आहेत. त्यांच्या अस्सल खणखणीत आवाजातल्या भारुडाचं सादरीकरण एकदा तरी पाहायला-ऐकायलाच हवं. त्यांना रंगमंचावर पाहताना त्या परक्या वाटत नाहीत. कलावंताने असं आपल्यातलं वाटणं ही लोकरंगभूमीची एक ताकद आहे.

…आणि लोकरंगभूमीची हीच ताकद आता साऱ्यांनाच कळायला हवी. विशेषतः नागर रंगभूमीवर प्रयोगात्म लोककला सादर करणाऱ्यांना. कारण लोककलांचा खरा रंगमंच अनागर रंगभूमीच आहे. जेव्हा भारूड लोकरंगभूमीवर सादर होतं, तेव्हा सादर करणारा आणि त्याचा आस्वाद घेणारा त्या मातीतूनच आलेला असतो. इथल्या सादरीकरणाला जसा कलावंत बुजत नाही तसाच प्रेक्षकही. मात्र तेच नागर रंगभूमीवर सादर करताना भाषेपासून पेहरावापर्यंत साऱ्याच गोष्टींचं व्यवधान पाळावं लागतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकरंगभूमीवर सादर होणाऱ्या लोककलांमध्ये कुणीही सहभागी होऊ शकतो. याला लिखित संहिता नसते. त्यामुळेच लोकरंगभूमीवरील रोजचा प्रयोग वेगळा आणि नित्यनूतन असतो. कुठल्याही कलेत ही नित्यनूतनताच तर महत्त्वाची असते!