
>> मनमोहन रो. रोगे
ज्ञान जेथून घेता येईल तिथून घ्यावे आणि त्यात आपण अनुभवाने भर घालावी व आपले वेगळे वैशिष्टय़ बनवावे, वेगळी ओळख बनवावी, असे पंडितजी म्हणत आणि खरोखरच हिंदुस्थानी शास्त्र्ााrय संगीतात पंडित भीमसेनजींनी आपली वेगळी, अजरामर, अढळ ओळख बनवली. स्वर्गीय आवाज लाभलेले गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी ही परमेश्वराकडून आपल्याला मिळालेली अनमोल भेटच होय. आज 4 फेब्रुवारी रोजी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त…
‘मन…राम रंगी रंगले’ हे सूर कानी पडताच कोणत्या माणसाचे मन रामनामात रंगून जात नाही? ‘मिले सूर मेरा तुम्हारा…’ इतके ऐकताच, ‘तो सूर बने हमारा’ असे न म्हणणारी व्यक्ती तुम्ही सांगू शकाल का? ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची’ या ओळी ऐकताच समाधी न लागणारा श्रोता शोधूनही सापडणार नाही. असे शेकडो अभंग – भक्तिगीते सांगता येतील, जी ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध होतात, परमात्म्याशी तादाम्य पावतात. हे अभंग, गीते गाणाऱया आवाजाची ती जादू आहे खरी. असा स्वर्गीय आवाज लाभलेले गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी ही परमेश्वराकडून आपल्याला मिळालेली अनमोल भेटच होय. आज 4 फेब्रुवारी रोजी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष पूर्ण होत आहे.
पं. भीमसेनजींचा जन्म कर्नाटकातील धारवाड जिह्यात गदग येथे 4 फेब्रुवारी 1922 रोजी झाला. त्यांचे आजोबा भीमाचार्य हे त्याकाळी प्रसिद्ध गायक आणि कीर्तनकार होते. वडील गुरुराज हे पेशाने शिक्षक होते. तसेच वेदांत पारंगत होते. त्यांची आईही कानडी भजने उत्तम गायची. भीमसेनजीही आईसोबत भजने गात असत. बुद्धीने तल्लख असूनही त्यांचे मन अभ्यासात रमले नाही. संगीत आणि गाणे याचे त्यांना विलक्षण वेड. त्यांचे हे वेड त्यांच्या वडिलांना आवडत नसे. भीमसेनजींनी वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असे त्यांचे मत होते, पण नियतीला ते मान्य नव्हते. वडिलांची मते न पटल्याने त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडले. खिशात पैसा नाही, ना पोटात अन्न, अशा अवस्थेत त्यांनी विजापूर, धारवाड, पुणे, ग्वाल्हेर, कोलकाता, दिल्ली, लखनौ, रामपूर अशी रेल्वेने कधी विनातिकीटही भटकंती केली. घर सोडलेल्या भीमसेन यांचा शोध त्यांचे वडील घेतच होते. शेवटी जालंदर येथे त्यांची वडिलांशी भेट झाली. वडील त्यांना घरी घेऊन आले आणि त्यांचे संगीताचे व गायनाचे वेड, तळमळ लक्षात घेऊन त्यांना धारवाड येथील रामचंद्र गणेश कुंदगोळकर (सवाई गंधर्व) यांच्याकडे पुढील शिक्षणासाठी पाठवले. उत्तम गाता यावे यासाठी त्यांनी 14 – 14 तास मेहनत घेतली. गुरूने शिकवले तितकेच लोकांपुढे ठेवले तर ती पोपटपंची होईल. ज्ञान जेथून घेता येईल तिथून घ्यावे आणि त्यात आपण अनुभवाने भर घालावी व आपले वेगळे वैशिष्टय़ बनवावे, वेगळी ओळख बनवावी, असे पंडितजी म्हणत आणि खरोखरच हिंदुस्थानी शास्त्र्ााrय संगीतात पंडित भीमसेनजींनी आपली वेगळी, अजरामर, अढळ ओळख बनवली. त्यांची संगीत, गायनाची लालसा इतकी होती की, खास ‘ठुमरी’ शिकण्यासाठी त्यांनी लखनौ येथे एक वर्ष वास्तव्य केले. हिंदुस्थानी शास्त्र्ााrय संगीत, नाटय़ संगीत, अभंग, भक्तिगीतांप्रमाणे ते ठुमरीही उत्तम गात असत. त्यांनी काही कन्नड, मराठी व हिंदी चित्रपटांसाठीही पार्श्वगायन केले होते. पंडितजींनी ‘संतवाणी’ या नावाने मराठी अभंग गायनाचे हजारो कार्यक्रम केले असे म्हटल्यास चूक होणार नाही.
पंडितजींनी वयाच्या 19 व्या वर्षी पहिला जाहीर कार्यक्रम केला, तर वयाच्या 22 व्या वर्षी त्यांच्या गाण्याच्या कानडी व हिंदी ध्वनिफिती तयार झाल्या. 1943 मध्ये ते मुंबई येथे आकाशवाणी केंद्रात नोकरीस लागले. हळूहळू त्यांच्या गाण्यांच्या मैफली देश-विदेशात वाढू लागल्या. त्यांना उदंड प्रसिद्धी आणि अमाप लोकप्रियता लाभली. आर्थिक सुबत्तेबरोबरच अनेक पुरस्कार मिळाले. पैकी ‘संगीताचार्य’, ‘पुण्यभूषण’, ‘संगीतरत्न’, ‘स्वरभास्कर’, ‘तानसेन’ संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार या काही महत्त्वाच्या पुरस्कारांसोबतच हिंदुस्थान सरकारने त्यांना पद्मश्री (1972), पद्मभूषण (1985), पद्मविभूषण (1999) आणि 2008 मध्ये ‘भारतरत्न’ या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले. त्याचबरोबर गुलबर्गा विद्यापीठ, सावित्रीबाई फुले-पुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ इत्यादींनी भीमसेनजींना सन्मान्य डी.लिट. पदवी प्रदान केली होती. याशिवाय आणखी एक खास उपाधी त्यांना मिळालेली आहे आणि ती दस्तुरखुद्द पुलंकडून. पंडितजींना त्यांच्या कार्यक्रमामुळे देश-विदेशात जाण्यासाठी सतत विमान प्रवास करावा लागे, हे पाहून पुल त्यांना ‘हवाई गंधर्व’ असे म्हणत.
पंडितजींना परिचित ‘अण्णा’ तसेच ‘भीमण्णा’ या नावानेही संबोधत असत. त्यांचे गुरू ‘सवाई गंधर्व’ यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भीमसेनजींनी पुण्यात 1953 सालात ‘सवाई गंधर्व महोत्सव’ सुरू केला, जो आजपर्यंत सुरू आहे आणि आता त्या महोत्सवाच्या नावात आता सवाई गंधर्वांसोबत त्यांचे शिष्य-जगप्रसिद्ध शास्त्र्ााrय गायक आणि या महोत्सवाचे निर्माते पंडित भीमसेन जोशी यांचेही नाव जोडले गेले आहे. इतकी कीर्ती, नावलौकिक मिळूनही त्यांचा साधेपणा व नम्रपणा कमालीचा होता. याचे एक उदाहरण म्हणजे, एकदा पंडितजी विमानाने कोलकाता येथे जात असताना त्यांनी सर्वांच्या लाडक्या सचिनला विमानात पाहिले आणि ते त्याच्या जवळ जाऊन हात जोडून म्हणाले, ‘मी भीमसेन जोशी. आपला खेळ मला खूप आवडतो. आपली भेट झाली, आनंद झाला.’ हा इतका साधेपणा इतकी नम्रता भीमसेनजींच्या नखाचीही सर नसलेल्या एखाद्या आजच्या सेलिब्रेटीकडे पाहावयास मिळेल का?
अशा या महान अद्वितीय गायकाचे पुणे येथे 24 जानेवारी 2011 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी वृद्धापकाळाने देहावसान झाले. पंडितजी देहरूपाने जरी आपल्यात नसले तरी दररोज जीवनातील प्रत्येक प्रसंगात ते त्यांच्या गायकीने, त्यांच्या भारदस्त स्वर्गीय आवाजाने ते पुढील पिढय़ान्पिढय़ा आपल्यासोबत असतील. ते अमरच राहतील यात शंकाच नाही.





























































