लेख – समृद्ध जैवविविधता धोक्यात

766

>> डॉ. मधुकर बाचूळकर

‘जागतिक तापमान वाढ व बदलते हवामान’ यांचे गंभीर संकट आज माणसासमोर उभे आहे. या संकटातून मुक्त होण्यासाठी ‘जगा आणि जगू द्या’ ही विचारसरणी आत्मसात करावी लागेल. जंगलांचा आणि जैवविविधतेचा होणारा अनियंत्रित र्‍हास थांबवावा लागेल. तसेच निसर्ग-पर्यावरण आणि जैवविविधता यांचे प्रचंड नुकसान करणार्‍या विकास प्रकल्पांविषयी गांभीर्याने विचार करावा लागेल.

चित्ता हा वन्यप्राणी हिंदुस्थानातून कायमचा नामशेष झाला आहे. गिधाडेदेखील आपल्या देशातून पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. माळढोक हा पक्षी महाराष्ट्रातून जवळपास नामशेष झाला आहे. वाघ, सिंह, हत्ती हे वन्यप्राणी अतिसंकटग्रस्त बनले आहेत. आपल्या देशात दरवर्षी 30 हत्ती व 50 वाघांची चोरटी शिकार केली जाते. सन 2018 मध्ये हिंदुस्थानात 102 वाघ, 57 हत्ती व 473 बिबट्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आज आपल्या देशातील सपुष्प वनस्पतीच्या 1500 प्रजाती व 120 वनौषधी संकटग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. हिंदुस्थानातील सस्तनधारी प्राण्यांच्या 90 प्रजाती, पक्षांच्या 75, सरपटणार्‍या प्राण्यांच्या 25, उभयचर प्राण्यांच्या 25 व माशांच्या 39 प्रजाती संकटग्रस्त असून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जंगलांवरील मानवी हस्तक्षेप असाच सुरू राहिल्यास पुढील 30 वर्षात आपल्या देशातील 43 ते 50 टक्के जैवविविधता नष्ट हाईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

जैवविविधतेचे सर्वाधिक प्रमाण उष्ण कटीबंध प्रदेशात आहे. या प्रदेशातील ‘वर्षावने’ जैवविविधतेने सर्वाधिक समृध्द आहेत. अशी ही वर्षावने पृथ्वीवरील फक्त सात टक्के जमिनीवर पसरलेली असुन, सुमारे 65 टक्के जैवविविधता कमी प्रमाणात आहे, तर ध्रुवीय प्रदेशात जैवविविधतेचे प्रमाण अतिअल्प आहे.

पृथ्वीतलावर अस्तित्वात असणार्‍या एकूण जैवविविधतेपैकी केवळ 20 टक्के जैवविविधता आज अखेर शास्त्रीयदृष्ट्या अभ्यासलेली आहे. म्हणजेच विज्ञान-तंत्रज्ञान युगातही, पृथ्वीवरील 80 टक्के जैवविविधता मानवास अपरिचित आहे. आज अखेर सजीवांच्या 18 लाख प्रजाती अभ्यासल्या गेल्या आहेत. त्यापैकी 11 लाख प्रजाती प्राण्यांच्या, 4 लाख वनस्पतींच्या, तर उर्वरित प्रजाती सुक्ष्मजीवांच्या आहेत.

पृथ्वीवरील 17 देश जैवविविधतेने अत्यंत समृध्द असून त्यातील बहुतांश देश उष्ण कटिबंधातील आहेत. या देशांना ‘जागतिक महाजैवविविधता देश’ असे संबोधले जाते. विशेष बाब म्हणजे आपला देश यापैकी एक आहे. जागतिक स्तरावर हिंदुस्थान सरपटणार्‍या प्राण्यांचा विविधतेत सहावा, पक्षांच्या विविधतेत सातवा, उभयचर व सस्तन प्राण्यांच्या संख्येत आठवा असून सपुष्प व वनस्पतींच्या विविधतेत बाराव्या स्थानावर आहे. ही आपल्या देशासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असली तरी, सर्वसामान्य हिंदुस्थानीयांना याबाबत कोणतीही माहिती नाही, ही मात्र वस्तुस्थिती आहे. हिंदुस्थानातून प्राण्यांच्या 81 हजार तर वनस्पतींच्या 48 हजार प्रजाती नोंदविल्या आहेत. हिंदुस्थानात सस्तन प्राण्यांच्या 372 प्रजाती, पक्षांच्या 1228, सरपटणार्‍या प्राणांच्या 428, उभयचर प्राण्यांच्या 210 प्रजाती, तर माशांच्या 2546 प्रजाती आढळतात. तसेच कीटकांच्या 50 हजार तर इतर अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या सुमारे 26 हजार प्रजाती आपल्या देशात आहेत. हिंदुस्थानातून अपुष्प वनस्पतींच्या 30 हजार 500 तर सपुष्प वनस्पतींच्या 17 हजार 500 प्रजाती नोंदविल्या आहेत. इतकी समृध्द जैवविविधता आपल्या देशात आहे.

हिंदुस्थानात सर्वात जास्त जैवविविधता ‘हिमालय भूप्रदेशात’ व ‘पश्चिम घाट’ परिसरातील वनक्षेत्रात आढळते. हे दोन्ही भूप्रदेश ‘जागतिक अतिसंवेदनशील भुप्रदेश’ असून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत महत्वाचे भूप्रदेश म्हणून ओळखले जातात. हिंदुस्थानात अस्तित्त्वात असणार्‍या एकूण प्रजातींपैकी 63 टक्के प्रजाती हिमालय भूप्रदेशात आढळतात. दुसरा महत्वाचा भूप्रदेश आहे पश्चिम घाट. दख्खनचे पठार व पश्चिम किनारपट्टी यामध्ये पसरलेली पर्वतरांग म्हणजे पश्चिम घाट. सहा राज्यांत पश्चिम घाट पसरलेला असून यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.

जंगलात व सभोवताली असणारी जैवविविधता मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त मानली जाते. जैवविविधतेतील प्रत्येक घटक मानवासाठी महत्वाचा आहे. मानवी विकासासाठी आवश्यक सर्व प्रकारचा कच्चा माल जंगलातून उपलब्ध होतो. आरोग्यासाठी आवश्यक वनौषधी जंगलातून गोळा केल्या जातात. तसेच पिकांचे व पाळीव जनावरांचे जंगली वाणही जंगलातच आढळतात. पर्यावरण संतुलनाचे कार्य तसेच प्राणवायू व गोड्या पाण्याची उपलब्धता वनांकडून म्हणजेच पर्यायाने जैवविविधतेकडून पुरविली जाते. यामुळे पर्यावरणाबरोबरच जैवविविधतेचेही संरक्षण-संवर्धन करणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे.

जैवविविधता व वन्यजीवांच्या संरक्षण-संवर्धनासाठी शासनाकडून अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने तसेच संरक्षित राखीव वनांची निर्मिती करण्यात आली आहे. वाघ, सिंह, हत्ती, गेंडे, बिबटे, मगरी, पक्षी या वन्यप्राण्यांच्या संरक्षण-संवर्धनासाठी संरक्षित केंद्रे तयार करण्यात आली आहेत. पण दुसर्‍या बाजूस शेती व रस्ते विकास, शहरीकरण व औद्यागिकीकरण यांसारखे विकास प्रकल्प मोठ्या प्रमाणात, अनियंत्रितपणे उभारले जात असल्याने वनांचा र्‍हास होण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्याचा वेग प्रचंड वाढला आहे. हिंदुस्थानात दरवर्षी 14 लाख हेक्टरवरील जंगले तोडली जात आहेत. खासगी वने पूर्णपणे नष्ट झाली आहेत. देशात व राज्यात फक्त 20 टक्के वनक्षेत्र शिल्लक असून यामध्ये दाट वनक्षेत्र अत्यंत अल्प आहे. वन्यजीवांची चोरटी शिकार आणि तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सर्व कारणांमुळे आपल्या देशातील जैवविविधता धोक्यात आली आहे. अशीच स्थिती इतर देशांत आहे. अ‍ॅमेझॉन खोर्‍यातील तसेच ऑस्ट्रेलियातील जंगलांना लागलेल्या वणव्यामुळे तेथील जैवविविधतेचे अपरिमित नुकसान झाले आहे.

शहरे व गावांच्या परिसरात प्रामुख्याने निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाभूळ, ग्लिरिसिडीया, सुबाभूळ, सुरू, रेन ट्री, गुलमोहोर, चिकारी, पितमोहोर, निळमोहोर यांसारखे विदेशी वृक्षच दिसून येतात. यामुळे आपली स्थानिक जैवविविधता विस्कळीत झाली आहे. ‘रानमोडी’ या विदेशी तणाचा वनक्षेत्रात शिरकाव झाल्याने तसेच जंगलांचा विनाश आणि रस्ते विकास प्रकल्पांमधून होणारी वृक्षतोड यामुळे वनस्पती विविधताही धोक्यात आली आहे.

‘जागतिक तापमान वाढ व बदलते हवामान’ यांचे गंभीर संकट आज माणसासमोर उभे आहे. या संकटातून मुक्त होण्यासाठी ‘जगा आणि जगू द्या’ ही विचारसरणी आत्मसात करावी लागेल. जंगलांचा आणि जैवविविधतेचा होणारा अनियंत्रित र्‍हास थांबवावा लागेल. तसेच  निसर्ग-पर्यावरण आणि जैवविविधता यांचे प्रचंड नुकसान करणार्‍या विकास प्रकल्पांविषयी गांभीर्याने विचार करावा लागेल.

लेखक ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ आहेत

आपली प्रतिक्रिया द्या