समाजभान – बर्ड फ्लू… समज, गैरसमज

>> सतीश गोगटे

कोरोनानंतर आपल्यासमोर उभे राहिलेले नवे संकट म्हणजे ‘बर्ड फ्लू’. या संकटाने पुन्हा एकदा नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात बर्ड फ्लू’चा धोका वाढतानाच अनेक अफवांचे पीकही आले आहे. अशा परिस्थितीत आपण सामाजिक आणि मानसिक भान जपणे जास्त गरजेचे आहे.

कोरोनाच्या संकटातून अजून सुटका नाही झाली आणि बर्ड फ्लूचे संकट ओढवले. बर्ड फ्लू हा आजार तसा काही नवा नाही. गेल्या दशकात त्याने 2 ते 4 वेळेस तरी डोके वर काढले होते. पण त्यामुळे शासकीय आणि निमशासकीय यंत्रणेवर अजून बोजा येऊन पडला हे खरे आहे. कोरोनासंदर्भात जेवढे शोधप्रयोग झाले त्याहून बर्ड फ्लूसंदर्भात मात्र कमी झाले असावेत. कारण सोपे आहे की, हा तितकासा तीव्र रोग नाही आहे आणि मनुष्यहानी पण अत्यल्प आहे. पण म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही.

बर्ड फ्लूबद्दल सध्यातरी खूप मतभिन्नता आहे. तो रोग आहे याबद्दल नव्हे तर तो कोठून येतो, नुकसान काय होते, त्यासंबंधी उपचार काय आहेत तसेच त्यावर प्रतिबंध कसा घालावा यासंबंधी मतभिन्नता आढळते. यासंदर्भातच या लेखामध्ये ऊहापोह केला आहे. अगदी प्राथमिक स्वरूपाच्या प्रश्नांची उकल येथे केली आहे. जसे की, बर्ड फ्लू म्हणजे काय? तो कोठून आला? कशामुळे उत्पन्न झाला? कसा ओळखावा? उपचार काय आहेत? प्रतिबंधात्मक बाबी काय असतील इत्यादी.

बर्ड फ्लू म्हणजे काय? बर्ड फ्लू हा पक्ष्यांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे. ज्याला बर्ड फ्लू वा एवियन एन्फ्लुयेन्झा (avian influenza) असंही म्हणतात. जो पक्ष्यांच्या लाळेवाटे, विष्ठsवाटे किंवा त्यांच्या डोळ्यांवाटे इतर पक्ष्यांमध्ये पसरतो. पक्ष्यांनी पंख जरी झटकले तरी हा विषाणू इतरत्र पसरू शकतो. ज्या पक्ष्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते ते पक्षी यामुळे दगावतात. पक्ष्यांद्वारेच हा रोग माणसांपर्यंत पोहचतो. जे पक्षी हिवाळ्यात युरोप, सैबेरिया किंवा चीनमधून हिंदुस्थानात येतात त्यांच्याद्वारे बर्ड फ्लूचा प्रसार होतो असा सर्वसाधारण समज आहे. यात कितपत तथ्य आहे हे अजून सिद्ध झाले नाही. आणि त्यामुळे स्थानिक पक्षी आणि पाळीव पक्षी कसे काय मोठय़ा प्रमाणात मरण पावतात हे एक कोडेच आहे. आतापर्यंत 2 ते 4 वेळेस हिंदुस्थानात बर्ड फ्लू मोठय़ा प्रमाणावर येऊन गेला पण त्यात वाईल्ड बर्डस्ची संख्या अगदी त्रोटक आहे. जे पक्षी मुळातच हजारो किमी अंतर पार करून उडून येतात ते कमजोर कसे, हा वादाचा मुद्दा ठरू शकतो.

बर्ड फ्लूचा इतिहास काय? 1900च्या दशकात इटलीमध्ये सर्वात आधी हा फ्लू आढळला होता. त्यानंतर 1961मध्ये दक्षिण आफ्रिकेत या फ्लूमुळे लाखो पक्षी संक्रमित झाले. डिसेंबर 1983ला पेन्सिलवेनिया आणि व्हर्जिनियात या फ्लूने थैमान घातले. त्यानंतर 50 लाख कोंबडय़ा आणि बदकांना मारण्यात आले. 1997 मध्ये हाँगकाँगमध्ये 18 लोकांना हा फ्लू झाला. त्यातील 5 लोकांचा मृत्यू झाला. बर्ड फ्लूमुळे मृत्यू होण्याची ही जगातील पहिलीच घटना होती. हिंदुस्थानात 2006 साली पहिल्यांदा महाराष्ट्रातच बर्ड फ्लूने संक्रमित पक्षी आढळले होते. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असणाऱया नवापूरमध्ये बर्ड फ्लूची नोंद झाली होती. त्यावेळी राज्यभरात तब्बल अडीच लाख कोंबडय़ा मारल्या गेल्या. तर 5 लाखांहून अधिक अंडी नष्ट करण्यात आली.

बर्ड फ्लूवर उपचार काय? बर्ड फ्लूवर औषध उपलब्ध आहेत. टॅमी फ्लूच्या गोळ्यांद्वारे हा रोग बरा होतो. त्यामुळे बर्ड फ्लू आल्यानंतर सरकार टॅमी फ्लूच्या (tamiflu) गोळ्यांचा साठा करणे सुरू करते. याशिवाय रेलेन्झा (relenza), रॅपीवॅप (Rapivab) याही गोळ्या डॉक्टरांकडून दिल्या जातात. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ नये.

दरवर्षी कुठल्या ना कुठल्या राज्यात बर्ड फ्लूच्या अफवा उठतात. त्याचा परिणाम थेट पशुपालन आणि पोल्ट्री उद्योग करणाऱया शेतकऱयांवर होतो. कारण अस्मानी-सुलतानी संकटानंतर शेतकऱयाचे सर्वाधिक नुकसान कुठली गोष्ट करत असेल तर ती आहे अफवा. कोंबडय़ांचे दर पडतात. लाखो कोंबडय़ा मारल्या जातात आणि लाखो शेतकऱयांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान होते. बर्ड फ्लूमुळे होणाऱया मृत्यूचे प्रमाण पाहिले तर ते अतिशय कमी आहे. मात्र त्याचा प्रसार होऊ न देणेही गरजेचे आहे. त्यामुळेच या सगळ्यामध्ये सुवर्णमध्य साधणे गरजेचे आहे. खरंच आपल्यापर्यंत बर्ड फ्लू आला आहे का आणि आला असेल तर कुठली काळजी घ्यायला हवी हे पाहणे जास्त महत्त्वाचे ठरते.

बर्ड फ्लूबाबतच्या अशा अफवेमुळे शेतकरी आणि पोल्ट्री व्यवसायिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. एका व्यक्तीकडून दुसऱया व्यक्तीला या विषाणूचा संसर्ग होण्याची भीती नसली, तरी याआधीच्या बर्ड फ्लूच्या साथींनी कुक्कुटपालन उद्योगाचे मात्र प्रचंड नुकसान केले आहे. संपूर्ण देशाचा विचार करता देशात दरमहा सरासरी 30 कोटी कोंबडय़ा आणि 900 कोटी अंडी खाली जातात. कोविड साथीच्या सुरुवातीच्या काळातही कुक्कुटपालन आणि त्यावर आधारित उद्योगांना मोठा फटका सहन करावा लागला होता. या नुकसानीतून कुक्कुटपालन व्यवसाय कसाबसा पुन्हा उभा राहिला, मात्र आता पुन्हा बर्ड फ्लूने डोके वर काढले आहे.

बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर मानवाची लक्षणे काय? बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ताप येणे, घशात खवखव होणे वा जास्त इन्फेक्शन होणे, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, पित्त वा कफाचा त्रास आणि रोग जास्त पसरला असल्यास न्यूमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. ही सगळी लक्षणे सध्याच्या कोरोना विषाणूंच्या लक्षणांशी मिळतीजुळती आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात हा विषाणू धोकादायक ठरू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या