आयरिश कॉफी आणि काळी बिअर

1745

>> द्वारकानाथ संझगिरी

मला आयर्लंड पाहून चारएक वर्षे झाली. मी अर्थात ‘स्वतंत्र’ दक्षिण आयर्लंडबद्दल बोलतोय. उत्तरेच्या भागावर अजून ब्रिटिशांचा सूर्य उगवतो.

तिथल्या दोन गोष्टींची चव माझ्या जिभेवरून कधीच गेली नाही. एक ‘आयरिश कॉफी’, दुसरी ‘आयरिश बिअर’.

परवा मुंबईतल्या एका कॉफी हाऊसमध्ये मी विचारलं, ‘‘आयरिश कॉफी मिळेल?’’

तो म्हणाला, ‘‘हो.’’

मी म्हटलं, ‘‘व्हिस्की घालून?’’

तो म्हणाला, ‘‘नाही, आम्हाला व्हिस्की घालायला परवानगी नाही. आमच्याकडे मद्याचा परवाना नाही. वर क्रीम घालून मिळेल.’’

व्हर्जिन पिनाकोलाडाप्रमाणे ‘व्हर्जिन’ आयरिश कॉफीला काय अर्थ? पद्मिनीला आरशात पाहावं तसं. मद्याशी संबंध आल्याशिवाय ‘व्हर्जिन’ (कुमारी) ‘विवाहित’ होत नाही हे तत्त्व आवडलं.

असो, हिंदुस्थानात खरीखुरी ‘आयरिश कॉफी’ मिळत असेल तर नक्की घ्या. कुठेतरी नक्की मिळत असेल. आयर्लंडमध्ये किमान माझी दुपारची कॉफी ‘आयरिश’ असायची.

नाही नाही, घाबरू नका. ती कॉफी चढत नाही. त्यात व्हिस्की जास्त नसते. जेवणातल्या मिठाचं काम ती करते, पण ती नसेल तर कॉफी बाल्यावस्थेतली वाटते.

आधी आयरिश कॉफी काय असते ते सांगतो. ते एक कॉकटेल आहे. त्यात गरम कॉफी, आयरिश व्हिस्की आणि साखर असते आणि वर पृष्ठभागावर ‘क्रीम’ (‘मलई’ जरा अगदीच अंगणातला शब्द होतो) तरंगत असतं. ती कॉफी त्या क्रीममधून प्यायची. त्यात फक्त चार सेंटिलिटर मद्य असतं, आठ सेंटिलिटर कॉफी असते, तीन सेंटिलिटर क्रीम असतं आणि एक चमचा ब्राऊन साखर. ती उकळत नाहीत. कॉफी, व्हिस्की आणि साखर गरम करतात आणि त्यावर क्रीम टाकतात. तिचं वय शंभराहून अधिक आहे, पण तरीही ती तरुण आहे. तिथे ‘रिंग ऑफ केरी’ हा एक ‘रूट’ आहे, नागमोडी वळण घेणारा अफलातून सुंदर रस्ता आहे. त्यावर किल्ले दिसतात, किल्ल्यासारखी घरं दिसतात. निळा समुद्र पांढऱया वाळूच्या कुशीत लोळताना पाहता येतो आणि अर्थात डोंगर तर त्या 179 किलोमीटरच्या रस्त्यावर आहेतच आहेत. तिथे वाटेवर कुठेतरी मी पहिल्यांदा आयरिश कॉफी घेतली. दुपारचे ढळढळीत बारा वगैरे वाजले असावेत. आयर्लंडमध्ये सूर्य नेहमीच वस्तीला येतो असं नाही. मला तिथला टॅक्सी ड्रायव्हर सांगत होता की, आदल्या वर्षी चक्क उन्हाळय़ात त्यांना सत्तर दिवस सूर्यदर्शन झालं नव्हतं. तिथला सूर्य अत्यंत कामचुकार आहे. थंडीत हक्काची रजा घेतो आणि वर उन्हाळय़ात दांडय़ा मारतो, पण जर हवामान चांगलं असेल तर ‘रिंग ऑफ केरी’ हा नैसर्गिक रत्नहार आहे, हाराच्या आकाराचा! नैसर्गिक सौंदर्य कसं दाखवायचं, कसं जगापुढे ठेवायचं आणि कसं पर्यटकांना आकर्षित करायचं हे त्यांना नीट ठाऊक आहे. कोकण सौंदर्यात इंचभरही कमी नाही, पण ते जगाच्या शोकेसमध्ये कधी आपण ठेवलंच नाही. नुसत्या वल्गना ‘‘कॅलिफोर्निया करू आणि यंव करू!’’ तुम्ही तिथं गेलात आणि स्वतःची गाडी घेऊन गेलात तर गाडी चालवताना सावधान! रस्ते छोटे आहेत आणि सतत अजस्र टुरिस्ट बसेस अंगावर भडकलेल्या समुद्राच्या लाटांप्रमाणे येत असतात.

आयर्लंडमध्ये कुठूनही फिरून परतल्यावर घ्यायचं पेय म्हणजे आयरिश बिअर. तिथे आपण पितो त्या बिअरला ‘लागर’, ‘एल’ आणि ‘बिअर’ असे शब्द वापरले जातात. ते समानार्थी नाहीत. तिन्ही पेये तयार करण्यात थोडा थोडा फरक आहे. साधारण आपल्या जिभेला सवय असलेल्या बिअरसाठी ‘लागर’ शब्द वापरायला हरकत नाही. लागर अति कडवट नसतेच असं नाही आणि सर्वच कडवट किंवा ‘डार्क’ गोष्टी वाईट नसतात. आयर्लंडमध्ये जाऊन ‘गिनिज बिअर’ न पिणं म्हणजे मालवणी रेस्टॉरंटमध्ये जाऊन जैन थाळी घेण्यासारखं आहे. जवळपास 260 वर्षे जुनी बिअर आहे. ती बुअरी पाहतानाच आपली अनेक कुतूहले शमतात. आयर्लंडमध्ये त्याच्या स्वतःच्या दहा बिअर्स आहेत. त्या तुम्ही एकत्रित टेस्ट करू शकता, पण माझ्यासाठी गिनिज ही पट्टराणी! तशी ती जगात पन्नास देशांत तयार होते. साधारण 120 देशांत ती मिळते. त्यात हिंदुस्थान हा एक देश असावा. आर्थर गिनिज नावाच्या रसिक बिझनेसमनने एक न वापरली जाणारी ब्रुअरी चक्क नऊ हजार वर्षांच्या लीझवर वार्षिक 45 पौंडांच्या लीझ रेंटने घेतली. त्याला दहा हजार वर्षांच्या लीझवर का घ्यावीशी वाटली नाही, देव जाणे! त्याच्याकडे जिभेला एक वेगळीच चव आणि डोक्याला मंद नशा देण्याचं पुण्य आहे, पण आधुनिक विज्ञान सांगतं की, ही बिअर हृदयाला चांगली. किती माणसांना या बिअरने हृदयरोगी होण्यापासून रोखले याचा विचार करा! त्यात ‘ऑण्टिऑक्सिडंट्स’ असतात. त्यामुळे रक्तवाहिनीवर कॉलेस्टेरॉलचे थर येणार नाहीत याची काळजी त्या ऑण्टिऑक्सिडंट्सकडून घेतली जाते. गिनिज काळपट असते. त्यात अल्कोहोलचं प्रमाण वेगवेगळं असतं. साधारण चार टक्क्यांपासून साडेसात टक्क्यांपर्यंत! तुम्हाला मस्त वाटण्यासाठी, श्रमपरिहारासाठी घ्यायचीय की झिंगण्यासाठी हे ठरवून तशी बिअर मागवावी. मी बिअर ही चवीसाठी आणि मन ‘अच्छे दिन’मध्ये आहे असं वाटण्यासाठी घेतो, दुसरा पर्याय काय!

दारू ही नखरेल असते. सोडा-लेमनची बाटली उघडली आणि टाकली ग्लासात असं दारूचं नसतं. प्रत्येक बिअरचे नखरे वेगळे. माझी लाईट बिअर 6 डिग्री सेंटिग्रेडवर ग्लासात ओतावी असा दंडक आहे. ती ओतताना बाटली ग्लासाच्या 45 अंश डिग्री कोनात असावी आणि ग्लास टय़ुलिप फुलाच्या आकाराचा असावा. ती बिअर ओतली की, बुडबुडे खाली चालले आहेत असं वाटतं. त्याला ड्रग इफेक्ट म्हणतात. कारण ग्लासाच्या काचेजवळचे बुडबुडे हळू हलतात. मधले बुडबुडे वर चालले आहेत आणि काचेजवळचे खाली असं दृश्य दिसतं आणि ते गडद रंगाची बिअर आणि लाईट रंगाच्या बुडबुडय़ाने मस्त दिसते.

पाहिलेत नखरे? एक राहूनच गेलं. आधी सांगितलेल्या कॉफीमध्ये जेमसन आयरिश व्हिस्कीच टाका. अगदी सिंगल माल्ट एकवीस वर्षांची असेल तरीही! कारकुनाच्या घरात ऐश्वर्या राय दिली तर संसार सुखाचा होत नाही आणि हो, आयर्लंडला अठरावं वर्ष ओलांडल्यावरच जा. तिथं आईस्क्रीम खायला जाण्यात अर्थ नाही, कळलं ना?

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या